'फिनिक्स भरारी - स्लम टू मिल्यनेअर' पुस्तकाचे प्रकाशन
पुणे : 'फिनिक्स भरारी - स्लम टू मिल्यनेअर' या पुस्तकातून प्रतिकूलतेकडून अनुकूलतेकडे झालेला लेखकाच्या संघर्षगाथेची यशोगाथा आहे. आपण कुठून आलो आहोत ही बाबा स्मरणात ठेवणे ही खूप मोठी गोष्ट आहे, हे पुस्तक गायकवाड यांचे असले तरी याचा मूळ प्रकाशास्त्रोत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. आज बाबासाहेब असते तर त्यांच्या डोळ्यात पाणी आले असते, असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी केले.
डायमंड पब्लिकेशनच्या वतीने रामकृष्ण गायकवाड लिखित 'फिनिक्स भरारी - स्लम टू मिल्यनेअर' या पुस्तकाचे प्रकाशन प्रा. जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रसिद्ध उद्योजक आणि बिव्हिजी ग्रुपचे चेअरमन हनुमंतराव गायकवाड, प्रा. डॉ. वैभव ढमाळ, नोव्हेल स्कूलचे अमित गोरखे, प्रा. डॉ. राजाभाऊ भैलुमे, लेखक रामकृष्ण गायकवाड, संजना मगर, वासंती गायकवाड, डायमंड पब्लिकेशनचे निलेश पाष्टे आदि मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, आपण हीरो आणि आयडॉल यामध्ये गफलत करत आहोत, समाजाला आज पडद्यावरील हीरो नाही तर रामकृष्ण गायकवाड यांच्यासारख्या हीरोची आवश्यकता आहे. 'फिनिक्स भरारी - स्लम टू मिल्यनेअर’ पुस्तकात गायकवाड यांनी त्यांच्या संघर्षपूर्ण आयुष्यातील प्रत्येक बाब नमूद केली आहे, त्यात कुठेही आत्मप्रौढी दिसत नाही. या पुस्तकातून असे लक्षात येते की मराठी लोकांनी आता गरिबीची मानसिकता सोडून दिली पाहिजे, उद्योजक निर्माण कसे होतील यांचा विचार झाला पाहिजे. यातूनच मराठी भाषा टिकली जाईल कारण उद्योगांची भाषा झाली तर मराठी ही रोजगार देणारी सुद्धा भाषा होईल ही नक्की.
अमित गोरखे म्हणाले, कशाचीही तमा न बाळगता परिस्थिती पाहू झुंज दिली तर यश हमखास मिळते हे रामकृष्ण गायकवाड यांनी दाखवून दिले आहे. या पुस्तकात स्लम चे वास्तव मांडण्यात आले आहे.
प्रा. डॉ. राजाभाऊ भैलूमे यांनी समाजात संशोधक आणि उद्योजक घडण्याचीगरज असल्याचे नमूद केले.
बिव्हीजीचे चेअरमन हनुमंत गायकवाड म्हणाले, प्रत्येकाने समाजाच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. रामकृष्ण गायकवाड यांचा प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. एका झोपडपट्टीत राहून साध्या हमालाच्या मुलाने घेतलेली ही फिनिक्स भरारी कौतुकास्पद आहे. मला वाटते रामकृष्ण यांनी ती झोपडपट्टी दत्तक घ्यावी. त्यातून एखादा उद्योजक घडला तर हीच या पुस्तकाची फलश्रुती ठरेल.
लेखक रामकृष्ण गायकवाड म्हणाले, बालपण झोपडपट्टीत गेले, 10 बाय 10ची खोली. कॉलेजमध्ये ही मी शांतच असायचो, पण पायात ध्येय पूर्ण करण्याची जिद्द होती. आज प्रत्येकाने असेच वागायची गरज आहे. आपल्या ध्येय प्राप्तीसाठी नकळत आपले प्रयत्न झाले पाहिजेत. ते कोणाला दाखवण्यासाठी नाहीतर स्वतः साठी. मी जेकाही कमवेन ते स्वतः साठी कधीच नसतं. मृत्यू नंतर आपला देहदान करण्याचा संकल्प गायकवाड यांनी यावेळी बोलून दाखवला. तसेच किमान 100 उद्योजक आणि 500 कुटूंब करोडपती बनवण्याचे स्वप्न असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजना मगर यांनी केले. या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय मोरे यांनी केले.
0 Comments