अखिल भारतीय ग्राहक पंचायत व ग्राहक पेठेतर्फे स.प.महाविद्यालय चौकात आयोजन
पुणे : हिंदू धर्म मानवतेचे नाते निर्माण करतो, असे स्वामी विवेकानंद नेहमी सांगायचे. संघटन, शिक्षण व अध्यात्माची जोड देऊन त्यांनी समाजाला दिशा दिली. हे राष्ट्र माझे आहे, ही भावना आपल्यामध्ये असायला हवी, अशी स्वामीजींची धारणा होती. त्यामुळे त्यांच्या विचारांचे अनुकरण करीत आपले राष्ट्र मोठे करण्याचा निर्धार आपण करुया, असे मत रा.स्व.संघाचे महाराष्ट्र प्रांत कार्यवाह डॉ.प्रविण दबडगाव यांनी व्यक्त केले.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत व ग्राहक पेठेतर्फे स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त स.प.महाविद्यालय चौकात अहिल्यादेवी प्रशाला, डी.ई.एस. प्रशालेतील विद्यार्थीनींनी घोषवादन करुन स्वामीजींना अभिवादन केले.
यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक, संचालक रमेश गोंदकर आदी उपस्थित होते. स्वामी विवेकानंदांच्या पूर्णाकृती पुतळ्याला यावेळी पुष्पहार अर्पण करण्यात आला.
सूर्यकांत पाठक म्हणाले, सन १९७४ ला ग्राहक पंचायत सुरु झाली. स्वामी विवेकानंदांना आदर्श मानून पंचायतीचे कार्य सुरु झाले. त्यामुळे दरवर्षी हा कार्यक्रम ग्राहक पंचायतीच्या शाखांमध्ये देशभर साजरा केला जातो, असेही त्यांनी सांगितले.
घोषवाद्यांवरील देशभक्तीपर गीतांच्या वादनाने आणि भारत माता की जय च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी सुधीर पाचपोर यांनी हे वीर विवेकानंद... हे गीत सादर केले. संचालक महेश जोशी यांनी सूत्रसंचालन केले.
0 Comments