श्री बहिरोबा देव ट्रस्ट, श्री काळभैरवनाथ मंदिर कसबा पेठ तर्फे आयोजन;
संपूर्ण मंदिरात ३०० पेक्षा जास्त पतंगांची सजावट
पुणे : कसबा पेठेतील पुण्याचे प्राचीन ग्रामदैवत व क्षेत्रपाल श्री काळभैरवनाथ मंदिरात मकरसंक्रांतीनिमित्त पतंगोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. श्री काळभैरवनाथ हे पुण्याचे जागृत ग्रामदैवत असून भैरवनाथ मंदिराचे गर्भगृह आणि मध्यगृह हेमाडपंथी बांधणीचे आहे. त्यामुळे मंदिर गाभा-यापासून ते प्रवेशद्वारापर्यंत ३०० हून अधिक विविधरंगी पतंगांची सजावट करण्यात आली.
श्री बहिरोबा देव ट्रस्ट, श्री काळभैरवनाथ मंदिर कसबा पेठ तर्फे मंदिरात मकरसंक्रांतीनिमित्त पतंगोत्सवाचे आयोजन करण्यात आले. मंदिराचे व्यवस्थापन आजपर्यंत लडकत घराण्याकडे असून वर्षभरात विविध उत्सव केले जातात. त्यातीलच एक असलेला मकरसंक्रांतीचा पतंगोत्सव हा अनेक वर्षे साजरा केला जातो.
कसबे पुणे ही बाराशे वर्षांपूर्वीची पुण्यातील वस्ती. याठिकाणी मुल:, मुक्ता आणि नाग या तीन नद्यांचा पवित्र त्रिवेणी संगम आहे. गाव तेथे मारुती आणि भैरवनाथाचे मंदिर ही आपल्याकडील परंपरा आहे. अशा कसबा पेठेतील पुण्याचे प्राचीन ग्रामदैवत व क्षेत्रपाल श्री काळभैरवनाथ मंदिरात आयोजित पतंगोत्सव पाहण्याकरिता भाविकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.
0 Comments