वादन आणि नृत्याच्या संगमातून साकारला अनोखा कलाविष्कार

भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या वतीने 

कार्यक्रमाचे आयोजन : डॉ.पंतगराव कदम यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजन



पुणे : वाद्य आणि नृत्यातील विविध रचनांचा मेळ घालत साकारलेला कलाविष्कार... पारंपरिक भरतनाट्यम नृत्यशैलीत सादर झालेली कृष्ण आणि कालिया नागाची कथा...आसामी भोरताल नृत्यातून सादर झालेली कंसवधाची गोष्ट...सुंदर पदन्यास आणि लयीतून साकारलेले कथक नृत्य...यासोबतच शास्त्रीय संगीत आणि कव्वालीचे अप्रतीम सादरीकरण अशा खिळवून ठेवणाऱ्या वादन आणि नृत्य सादरीकरणातून रसिकांना दर्जेदार कलेचा आस्वाद घेता आला.


निमित्त होते, भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्यावतीने भारती विद्यापीठाचे संस्थापक डॉ. पतंगराव कदम यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमाचे. एरंडवणे येथील संस्थेच्या मैदानावर कार्यक्रम संपन्न झाला.


यावेळी भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, कुलगुरू डॉ. विवेक सावजी, स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सचे संचालक प्रा. शारंगधर साठे, प्रवीण कासलीकर, देविका बोरठाकूर, स्वरदा कुलकर्णी तसेच व्यवस्थापन महाविद्यालय, विधी महाविद्यालय, वाय.एम. कॉलेज, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य उपस्थित होते.



कार्यक्रमात तेजस्विनी साठे, अरुंधती पटवर्धन, देविका बोरठाकूर यांनी रचलेल्या नृत्यांचे सादरीकरण झाले. तर नंदिनी गायकवाड, उज्जवल गजभर, शुभम खंडाळकर, अपूर्व पेटकर यांनी गीतांचे सादरीकरण केले. 


कार्यक्रमाची सुरूवात तेजस्विनी साठे यांनी रचलेल्या कथक नृत्यशैलीत 'एकदंत प्रथम नमन, प्रातः समय पुण्यस्मरण' या गणेश वंदनेने झाली. कलिंगनर्तन तिल्लाना या पारंपरिक भरतनाट्य नृत्यशैलीतून सादर झालेली कृष्ण आणि कालिया नागाच्या कथेने कार्यक्रमाची सुरूवात झाली.




'घेई छंद मकरंद' हे नाट्यगीत सादर करीत नंदिनी गायकवाड यांनी रसिकांना खिळवून ठेवले. उज्वल गजभार यांनी उस्तादी शैलीत केलेल्या याच गीताचे सादरीकरण हे कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. 


कार्यक्रमाच्या उत्तरार्धात सादर झालेल्या 'यार इलाही मेरे यार इलाही'  या मराठी कव्वालीला रसिकांनी भरभरून दाद दिली. शुभम खंडाळकर यांनी 'अवघे गरजे पंढरपूर' हा अभंग सादर केला. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी सह पखवाज वादन करत, रेला परन, दुर्गा स्तुतीपरन, गणेश स्तुतीपरन म्हणत कार्यक्रमाची बहारदार सांगता केली. 

Post a Comment

0 Comments