बुलडाणा - 1 मे म्हणजे आंतरराष्ट्रीय कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन. या दिनानिमित्ताने अत्यंत तोकड्या आणि तेही सहा महिने विलंबाने मिळणा-या मानधनावर वर्षानुवर्षे काम करणा-या राज्यभरातील सार्वजनिक ग्रंथालयीन कर्मचा-यांनी एक दिवसाचे उपोषण करीत हा दिवस साजरा केला.
यासंदर्भात ग्रंथालय कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष काॅम्रेड पंजाबराव गायकवाड यांनी सांगितले की, ज्या कामगारांनी जीवनाची बाजी लावून जागतिक पातळीवर कामगारांना एक प्रतिष्ठा मिळून दिली. ज्यांनी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती करण्यासाठी हौतात्म्य पत्करले,
त्यांचा आदर्श समोर ठेवून मराठी भाषाचे सवंर्धन, विकास आणि ती टिकविण्यासाठी राज्यातील ग्रंथालय कर्मचारी अत्यंत अल्प मानधनावर काम करित आहे. त्याची मोठ्या प्रमाणात पिळवणूक आणि शोषण केल्या जात आहे.आपल्यावर होणाऱ्या अन्याया विरोधात तो सातत्याने लढा देत आहे. न्याय हक्कासाठी सरकारकडे दाद मागत आहे.ही फार मोठी शोकांतिका आहे.
आज महाराष्ट्र स्थापनेला ६० वर्ष पूर्ण झालीत. महाराष्ट्राची अस्मिता मराठी भाषा आहे. तिची जपणूक, विकास, आणि संवर्धन करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने १९६७ मध्ये ग्रंथालय कायदा अस्तित्वात आणला. त्यालासुद्धा आज ५३ वर्ष पूर्ण झाली, परंतु तेंव्हापासून सातत्याने आपल्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष करीत असलेल्या ग्रंथालय कर्मचाऱ्यांकडे सरकार दुर्लक्ष करित आहे.
आज एवढ्या वर्षानंतर सूद्धा ह्या कर्मचाऱ्यांना किमान वेतन सुद्धा मिळत नाही. दर महिन्याला मानधन मिळत नाही. पेंशन,प्रॉव्हिडंट फंड,आरोग्य विमा किंवा कुठल्याही सामाजिक सुरक्षितता मिळत नाहीत. कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन सेवेत कायम करावे ही त्यांची प्रमुख मागणी आहे.
मराठी भाषा आणि वाचनसंस्कृतीच्या नावाने गळा काढणारे राजकीय पक्ष निवडणूक जाहीरनाम्यात विषय घेऊन मताचे राजकारण करतात.आणि सत्तेतवर आल्यानंतर त्यांना ग्रंथालय चळवळीचा विसर पडतो. सहा-सहा महिने मानधन मिळत नसल्यामुळे त्याच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.
अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आपले संसार चालविताना त्यांना मोठी तारे वरची कसरत करावी लागते.या सरकाने तरी त्यांच्या मागण्याकडे गंभीरपणे बघून त्यांना न्याय देण्याची गरज आहे. आज शहीद कामगारांच्या स्मृतीला संपूर्ण राज्यभर आणि देशभर अभिवादन करित असतांना हे कर्मचारी मात्र ६० वर्षांपासून उपेक्षित आहेत.
कामगारांप्रती आपल्या संवेदना व्यक्त करण्यासाठी आज संपूर्ण राज्यभर महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघटनेच्या नेत्रुत्वात एक दिवशी उपोषण करण्यात आले आहे, असे गायकवाड म्हणाले.
या आंदोलनात संघटनेचे राज्य अध्यक्ष पंजाबराव गायकवाड यांच्यासह राज्य सचिव नंदू बनसोड, दर्शना म्हस्के, अनंतराव सातव, अमोल चरखे, राजू हिवाळे, गजानन अंभोरे, वसुदेवबाप्पा गायकवाड, निशिकांत ढवळे, विनोद ठोंबरे, चंद्रकांत सरोदे यांच्यासह जिल्हा आणि राज्यभरातील ग्रंथालय कर्मचारी सहभागी झाले.
0 Comments