36 वर्षीय मृत युवकाच्या कुटुबीयांनी जपली सामाजिक बांधिलकी
पुणे - एखाद्या व्यक्तीच्या मुत्युनंतरदेखील सामाजिक बांधिलकी जपता येते. याचे उत्तम उदाहरण वानवड़ी येथील 36 वर्षीय युवक ठरला. एका गंभीर आजारानंतर ब्रेनडेड झालेल्या या युवकाचे यकृत, मूत्रपिंड आणि नेत्रदान करीत कुटुंबीयांनी सामाजिक बांधिलकी जपली. या युवकाच्या अवयवदानामुळे अवयवांची आवश्यकता असलेल्यांना नवीन जीवन प्राप्त झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यातील सुप्रसिद्ध इनामदार हॉस्पीटलमध्ये एक 36 वर्षीय युवकाला गंभीर आजारावरील इलाजासाठी दाखल करण्यात आले. या युवकाला ‘एन्युरिझम’ हा आजारा होता. या आजारामध्ये शहरातील धमन्यांची भिंत अशक्त झाल्यामुळे त्यांचा आकार वाढून त्या फाटू लागतात, ज्यामुळे शरीरात प्राणघातक अशी गुंतागुंत निर्माण होते. इनामदार हॉस्पीटलला या युवकाला भर्ती केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला ‘ब्रेनडेड’ घोषित केले.
खरेतर या घटनेमुळे युवकाच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला होता. मात्र या शोगमग्न वातावरणातदेखील मृतकाच्या कुटुंबीयांनी या युवकाचे यकृत, मूत्रपिंड आणि डोळे दान करण्याचा निर्णय घेऊन समाजासमोर एक मोठा आदर्श निर्माण केला. कुटुंबीयांची संमती मिळाल्यानंतर तात्काळ इनामदार हॉस्पीटलची टीम कामाला लागली.
यकृताच्या प्रदीर्घ आजाराने त्रस्त असलेल्या एका 48 वर्षीय रुग्णाला या ब्रेनडेड झालेल्या युवकाचे यकृत देण्यात आले. ही शस्त्रक्रिया गुरुवारी इनामदार हॉस्पीटलमध्ये यशस्वीरित्या पार पाडली.
ही प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करणा-या इनामदार हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या टीममध्ये यकृत प्रत्यारोपण तज्ञ डॉ. बिपीन विभूते व डॉ हर्षल राजेकर, सहायक प्रत्यारोपण तज्ञ डॉ. अभिजीत माने, प्रत्यारोपण भूलतज्ञ डॉ. मनीष पाठक, डॉ. निखिल हिरेमठ आणि डॉ. संदीप पाटिल तसेच प्रत्यारोपण समन्वयक नितीन दुशिंग यांचा समावेश होता.
डॉ. बिपीन विभूते व डॉ. हर्षल राजेकर यांनी सांगितले की, प्रत्यारोपण केलेला रुग्ण हा क्रॉनिक लिव्हर डिसीजने ग्रस्त होता. त्याला गेल्या वर्षी कावीळ झाला होता. त्यामुळे हे यकृत त्याला योग्य वेळेवर मिळाले. प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करताना दोघांची म्हणजे दाता आणि लाभार्थी यांची कोविड -१९ साठी चाचणी करण्यात आली. ती निगेटिव्ह आल्यावर प्रत्यारोपण सुरु करण्यात आले.
सध्याच्या करोना व्हायरसच्या संकटात कुठल्याही प्रकारे संसर्गाचा धोका उद्भवू नये म्हणून कठोर उपाययोजना करण्यात आल्या. ज्यामध्ये डॉक्टरांच्या टीमसाठी पीपीई कीट, शस्त्रक्रियेच्या खोलीचे सॅनिटायझेशन वगैरे गोष्टींचा समावेश होता. या युवकाने दान केलेले नेत्र आणि मूत्रपिंड गरजू रुग्णांना देण्यासाठी संबंधित हॉस्पीटलमध्ये पाठवण्यात आल्याचे इनामदार हॉस्पीटल प्रशासनाने या वेळी सांगितले.
0 Comments