एमआयटी-वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संयुक्त राष्ट्र संघ तथा पंतप्रधान मोदींना साकडे
पुणे - कोरोना या संसर्गजन्य विषाणूने जगभरात अनेक लोकांचा बळी घेतला आहे. अशा वेळेस जगभरातील जैविक व रासायनिक आयुधे (शस्त्र) निर्मिती व संशोधनास प्रतिबंध घालणे आवश्यक आहे, त्यामुळे संयुक्त राष्ट्र संघटना व जागतिक आरोग्य संघटनेने बायोलॉजिकल संशोधनावरही बंदी घालावी, यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा.कराड यांनी केली आहे.
याशिवाय एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या वतीने संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांना एक पत्र पाठवून विनंती केली की, युनायटेड नेशन्सच्या सुरक्षा समिती सदस्यांची विशेष बैठक बोलावावी आणि बायोलॉजिकल व केमिकल आयुधे (बीडब्ल्यूसी आणि सीडब्ल्यूसी) ज्यांच्याकडे आहेत, अशा सदस्यांची विशेष बैठक बोलावावी व ही सर्व आयुधे नष्ट करावीत, अशी मागणी विश्वनाथ कराड यांच्याकडून करण्यात आली आहे.
डॉ. कराड यांनी म्हटले आहे की, कोरोना या संसर्गजन्य विषाणूमुळे जगभरात 50 लाखांपेक्षा अधिक लोक बाधित झालेले आहेत, तसेच 3 लाखापेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झालेला आहे. या विषाणूला संपविण्यासाठी जगात कुठे ही लसीचे संशोधन झालेले नाही, त्यामुळे संपूर्ण मानव जातीमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
एक विषाणू माणसाचे जीवन संपवू शकतो असे भयानक वातावरण निर्माण झाले आहे. काही तज्ञांचे देखील असे म्हणणे आहे की करोना विषाणू नैसर्गिक नसून मानवनिर्मित आहे. यावर त्वरित निर्णय घेऊन जगात अशा प्रकारचे संशोधन होत असल्यास यावर बंदी घालावी.
मानवजातीच्या विनाशाला कारणीभूत ठरणारे बायलॉजिकल व केमिकल आयुधे निर्मितीस व संशोधनास जगभरात बंदी घालावी. त्या साठी जगातील सर्व देशांनी एकत्र यावे. समजा असे झाले नाही तर संपूर्ण मानव जातीचा विनाश होईल. हे सर्व थांबवण्यासाठी व जगात शांतता नांदावी याकरिता प्रयत्न केले पाहिजेत.
कोरोनासारख्या विषाणूचे चिनी येथील वुहान शहराच्या प्रयोगशाळेत संशोधन केले जात होते. त्याच व्हायरसचा परिणाम म्हणजे संपूर्ण जगात मानवजातीवर मोठे संकट आलेले आहे. संपूर्ण मानवजात अशा मानसिकतेत आहे की आपण या संसर्गापासून वाचू शकू का नाही. त्यामुळे अशा संशोधनाला आळा घालण्यात आले तरच मनुष्य हा वाचू शकतो. तसेच जगात सुख, समाधान आणि शांती नांदेल.
त्याकरिता जगातील सर्व राष्ट्रांनी एकत्र आले पाहिजे. यामध्ये संयुक्त राष्ट्र संघटना व जागतिक आरोग्य संघटनेची भूमिका महत्त्वाची असेल. सुदैवाने भारताचे आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची नुकतीच जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे . त्यामुळे अशा प्रकारची बैठक बोलवण्यासाठी त्यांचे सहकार्य देखील घेतले जाऊ शकते . तसेच यावर योग्य तो निर्णय घेतला पाहिजे. त्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःच्या नेतृत्वात जगाला एकत्र आणावे.
आज एका सूक्ष्म जीवाच्या संसर्गामुळे आपण 22 वे शतक बघू की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पण तुकाराम महाराजांनी म्हटल्या प्रमाणे अणू रेणू थोकडा तुका आकाशायेवढा या उक्ती प्रमाणे संपूर्ण मानवजातीला ईश्वरी कण किंवा देव कण वाचवू शकेल.
याशिवाय माऊलींनी म्हटल्या प्रमाणे विश्वात्मक शक्ती या सृष्टीला व्यापून टाकेल. अशा परिस्थितीत या विश्वाला ईश्वरी कणातूनच जीवसृष्टी जीवनाचे अस्तित्व निर्माण करू शकेल. त्यासाठी प्रत्येकाने आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे.
0 Comments