जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी साधला डॉक्टरांशी संवाद
पुणे - जिल्हयातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या कमी करण्यासोबतच मृत्युदर शून्यांवर आणण्यासाठी नियोजन करण्याच्या दृष्टीने आज जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करणा-या शासकीय तसेच विविध खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांची नियोजन बैठक घेण्यात आली.
कोरोनावर उपचारासोबतच इतर आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यासाठी जिल्हा प्रशासन कायम डॉक्टरांच्या सोबत आहे. कोरोनामुळे वाढता मृत्युदर शून्यांवर आणण्यासाठी आपण सर्व मिळून प्रयत्नशील राहू व नक्कीच यात यश मिळवू, असा विश्वास जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी व्यक्त केला.
कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टारांशी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी मंगळवार 19 मे रोजी संवाद साधला.
या बैठकीस पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील, डॉ. दिलीप कदम, ससून रुग्णालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ भगवान पवार, पुणे मनपाचे आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे, केईएम रुग्णालयाच्या डॉ. लीना शहा, डॉ. आरती लोखंडे, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे डॉ. प्रदीप दळवी, डॉ. माधव भोज, भारती रुग्णालयाचे डॉ. जितेंद्र ओसवाल आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राम यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांशी झालेल्या चर्चेत कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करताना येणा-या अडचणी, कोरोनाबाधित रुग्णांचा मुत्यूदर शुन्यावर आणण्यासाठी रुग्णांवर उपचार पद्धती, शासकीय व खाजगी रुग्णालयातील समन्वय साधून रुग्णांची संख्या कशी कमी करता येईल यावर प्रामुख्याने लक्ष द्यावे.
चाचण्यांची स्थिती, सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या तसेच आवश्यक साधनसामुग्रीबाबत चर्चा झाली. कोरोनावर उपचार करणा-या डॉक्टरांची मते जाणून घेत नव्याने काही बदल करता येतील का, याबाबतही चर्चा झाली.
बारामती व जुन्नर तालुक्यात कोरोनाच्या अनुषंगाने चांगले काम झालेले आहे. याबाबतचा सूक्ष्म अभ्यास करुन संबंधित यंत्रणेशी समन्वय साधून जाणून घ्या, अशा सूचनाही जिल्हाधिकारी राम यांनी दिल्या. जिल्हा प्रशासनाकडून आलेल्या सूचनांचे स्वागत करून आपण अत्यंत काळजीने कोरोना बाधीत रुग्णांवर उपचार करत आहोत, यापुढेही कोरोना बाधीत रुग्णांवर उपचार करू, असा विश्वास डॉक्टरांनी व्यक्त केला.
0 Comments