बांधकाम मजूर व त्याच्यासाठीच्या सुविधांवर तातडीने काम करण्याची गरज
पुणे - आज संपूर्ण जग कोविड १९ च्या विषाणूशी लढत असताना नजीकच्या भविष्यात बांधकाम क्षेत्राला अनेक स्थित्यंतरांना सामोरे जावे लागणार आहे. या काळात बांधकाम क्षेत्रात काम करणारे मजूर, त्यांची सुरक्षितता, त्यांना उपलब्ध सोयी सुविधा यांसारख्या बाबींवर तातडीने काम करण्याची गरज असल्याचे मत क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष सुहास मर्चंट यांनी व्यक्त केले.
आजचा महाराष्ट्र दिन व आंतरष्ट्रीय कामगार दिनाचे औचित्य साधत पुणे क्रेडाई मेट्रोच्या पदाधिका-यांनी कुशल क्रेडाईच्या पुढाकाराने एका ऑनलाईन चर्चासत्राचे आयोजन केले होते, त्यावेळी मर्चंट बोलत होते.
क्रेडाई पुणे मेट्रोचे उपाध्यक्ष रणजीत नाईकनवरे, सचिव आदित्य जावडेकर, क्रेडाईच्या बांधकाम कल्याण समितीचे अध्यक्ष जे. पी. श्रॉफ, क्रेडाईच्या व्यवस्थापकीय समितीचे सदस्य आय. पी. इनामदार यांनी यावेळी चर्चासत्रात सहभाग घेतला.
क्रेडाई पुणे मेट्रोचे पराग पाटील, अर्चना बडेरा, सपना राठी, यश भंडारी, समीर पारखी यांबरोबर अनेक सभासद यावेळी ऑनलाईन पद्धतीने यामध्ये सहभागी झाले.
या वेळी बोलताना सुहास मर्चंट म्हणाले, “बांधकाम मजूर हा बांधकाम व्यवसायाचा महत्त्वपूर्ण पाया आहे. आज कोविड १९ च्या संकटाला सामोरे जात असताना भविष्यात आपल्याला या महत्त्वाच्या घटकासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत.
मजुरांची सुरक्षितता, त्यांना कुशल बनविण्यासाठी करीत असलेल्या प्रयत्नांबरोबरच मजूरांसाठी खास डिझाईन केलेले लेबर क्वाटर्स, बांधकामाच्या ठिकाणी काम करणा-या महिला व पुरुष कामगारांच्या अंघोळी व शौचालयाची व्यवस्था, त्या ठिकाणची साफसफाई, महिन्यातून एकदा आरोग्य तपासणी, त्यांच्या मुलांसाठी बांधकाम ठिकाणी पाळणाघराची व्यवस्था आदी गोष्टींचा विचार या अंतर्गत व्हावा.
याशिवाय ज्याप्रकारे आपल्याकडे कस्टमर रिलेशन ऑफिसर असतो त्याप्रमाणेच आता बांधकाम मजूरांच्या अडीअडचणी समजून घेत त्या सोडविण्यासाठी लेबर रिलेशन ऑफिसर नियुक्त करण्याचा विचार झाला पाहिजे. या सर्व प्रयत्नांमधून बाहेरगावांहून, बाहेर राज्यांहून येणा-या मजुरांमध्ये कामाची ठिकाणाविषयी आत्मीयता निर्माण होईल, असा विश्वासही मर्चंट यांनी व्यक्त केला.
प्रत्येक बांधकामाच्या जागेच्या ठिकाणची लेबर क्वाटर्स, त्या ठिकाणच्या सुविधा, त्यांची होत असलेले सोय यांविषयी क्रेडाई कुशलने एक स्पर्धा आयोजित करून त्यासाठी विशेष बक्षिसे द्वावी याबरोबरच या ठिकाणी मजुरांच्या आरोग्याची वर्षातून दोनदा पूर्ण तपासणी व्हावी अशा सूचनाही मर्चंट यांनी या वेळी केल्या.
याशिवाय क्रेडाई पुणे मेट्रो आपल्या सभासदांच्या साईट्ससाठी देखील सुरक्षा उपक्रम हाती घेण्याबरोबरच कामाच्या ठिकाणी मजुरांना कुशल बनवून त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ करण्यासाठी त्यांना मदत करेल, जेणेकरून त्यांचे राहणीमान सुधारून त्याचा फायदा मजुरांना होईल, अशी माहिती मर्चंट यांनी दिली.
आज राज्य सरकारने मजुरांना आपापल्या राज्यात परत जाण्याविषयी सूचना केल्या आहेत. मात्र त्यासाठी आवश्यक पासेस, त्यासाठी करण्यात आलेली बसेसची सुविधा, ते परत गेल्यानंतर तिथे त्यांचे करण्यात येणारे विलागीकरण आदी बाबींची माहितीही सर्वांनी मजूरांपर्यंत पोहोचावी अशी विनंतीही मर्चंट यांनी क्रेडाईच्या सभासदांना केली.
लॉकडाऊन उठल्यानंतर रेड झोन मध्ये नसणा-या बांधकाम क्षेत्रांना सरसकट सूट द्यावी अशी विनंती क्रेडाईने सरकारला केली असल्याची माहिती मर्चंट यांनी यां वेळी दिली.
आजच्या कोविड १९ च्या या संकटसमयी क्रेडाई पुणे मेट्रो आपल्या सर्व कामगारांच्या मदतीस तत्पर आहे. मात्र मजुरांना राज्य सरकारकडून केली जाणारी मदत मिळावी या दृष्टीने प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरने आपल्या कामगारांची नोंदणी करणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे शक्य असले तितक्या लवकर ही नोंदणी करून घ्या, असा सल्ला रणजीत नाईकनवरे यांनी दिला.
कोविड १९ नंतर बांधकामाच्या ठिकाणी काय उपाययोजना असाव्यात, परत कामावर रुजू होण्यासाठी बांधकाम मजुरांचे प्रबोधन कशा पद्धतीने करावे आणि नजीकच्या भविष्यात बांधकाम व्यवसायात कोणते तांत्रिक बदल करावेत, याविषयी बांधकाम व्यवसायिकांना माहिती मिळावी या उद्देशाने क्रेडाई पुणे मेट्रोच्या वतीने अशाच पद्धतीची ऑनलाईन चर्चासत्रे घेतली जाणार आहेत असे नाईकनवरे यांनी सांगितले.
कोविड १९ नंतर या आधीचे बांधकाम क्षेत्र आणि नंतरचे बांधकाम क्षेत्र अशा पद्धतीने दोन भाग पडणार असून हा काळ बांधकाम व्यवसायिक, मजूर व क्षेत्राशी निगडीत अनेकांसाठी संकटाचा काळ असणार आहे. मात्र या मधून सर्वच जण फिनिक्स पक्षासारखी भरारी घेतील असा विश्वास जे. पी. श्रॉफ यांनी व्यक्त केला. आय. पी. इनामदार यांनी लॉकडाऊनच्या काळात क्रेडाई पुणे मेट्रो करीत असलेल्या सामाजिक उपक्रमांची माहिती सर्वांना दिली.
0 Comments