चिमणी संवर्धनार्थ नगर जिल्ह्यात बर्ड फिडर व स्पॅरोहाऊस उपक्रमाचे उद्घाटन
अहमदनगर - अभ्यासपूर्वक प्रशासन पाहणारे अनेक जिल्हाधिकारी जिल्ह्याला आत्तापर्यंत लाभलेत, परंतु आपले प्रशासकीय काम चोखपणे पार पाडत असताना निसर्गाचेही संरक्षण व संवर्धन व्हायला हवे अशी सतत तळमळ मनात बाळगणारे जिल्हाधिकारी म्हणजे राहुल द्विवेदी. नुकताच याचा जिवंत प्रत्यय नगरवासीयांना आला.
काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी निवासात अज्ञात कारणामुळे जखमी झालेले एक पिंगळा प्रजातीचे घुबड भर दुपारी पाण्याच्या हौदात पडले. ही घटना तिथले कर्मचारी ज्ञानेश्वर ढेसले व पोलिस कॉन्स्टेबल अमोल घंगाळे यांच्या लक्षात आली.
नाकातोंडात पाणी गेलेल्या त्या जखमी घुबडाला कर्मचार्यांनी पाण्यातून वर काढले. ही घटना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांना माहिती होताच त्यांनी तात्काळ जिल्हा निसर्गप्रेमी तथा जैवविविधता संशोधन व संवर्धन केंद्राचे निसर्गअभ्यासक जयराम सातपुते यांना संपर्क करण्याचे निर्देश दिले.
कसलाही विलंब न करता सातपुते १० मिनिटांतच तेथे पोहचले. अगदी गंभीर स्थितीतील त्या पिंगळा घुबडाचे प्राण वाचणे तसे कठीण होते. मात्र सर्वांनीच प्रयत्नांची शर्थ केली आणि गंभीर जखमी असलेल्या घुबडावर प्रथमोपचार करून पहिल्या दिवशी द्रवरूप खाद्य, दुसर्या दिवशी घनरूप खाद्य देण्यात आले.
तिसर्या दिवशीपर्यंत ते बर्याच प्रमाणात ऊर्जावान झाले. त्याची उडण्याची चाचणीही यशस्वी ठरली. चौथ्या दिवशी कलेक्टर साहेबांच्या हस्ते त्यांच्याच प्रांगणात त्या पिंगळा घुबडाला मुक्त करण्यात आले. सोडण्यापूर्वी जिल्हाधिकार्यांनी त्याच्याशी ५ मिनीटे मनस्वी संवादही साधला.
विशेष म्हणजे या उपचारादरम्यान चार दिवसांच्या कालावधीत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी स्वत: जयराम सातपुते यांच्याशी व्यक्तीश: संपर्क करून घुबडाच्या तब्येतीमध्ये होणार्या प्रगतीबद्दल सातत्याने माहिती घेत प्रोत्साहनही दिले. मृत्युच्या मुखातून बाहेर पडलेल्या या घुबडाने पुन्हा एकदा निसर्गात भरारी घेताच तेथे उपस्थित सर्वांनी आनंदाने जल्लोष केला.
यानंतर जिल्हा निसर्गप्रेमी तथा जैवविविधता संशोधन व संवर्धन केंद्रातर्फे चिमणी तथा तत्सम पक्ष्यांच्या संवर्धनासाठी सुरू केलेल्या ‘स्पॅरो हाऊस’ व ‘बर्ड फिडर’ या राज्यातील पहिल्या जिल्हाव्यापी उपक्रमाचे उद्घाटनही जिलाधिकारी द्विदेवी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी निसर्गप्रेमी समुहाचे कृतिशील कार्यकर्ते संदीप राठोड, शिवकुमार वाघुंबरे, गणेश कांबळे आदी उपस्थित होते. या उपक्रमान्वये जिल्ह्यात अगदी अल्प दरात १००० स्पॅरो हाऊस बसवण्याचे कार्य सुरू केले असून, १००० बर्ड फिडरचे वाटपही केले जात आहे. यावेळी जिल्हाधिकारी निवासातही हे बर्ड फिडर व स्पॅरो हाऊस ठिकठीकाणी बसवण्यात आले.
गेल्या ११ वर्षांपासून संघटनेतर्फे केल्या जाणार्या पक्षी प्रगणनेमधून घुबडांच्या संख्येत कमालीची घट होताना दिसत आहे, त्यामुळे जिल्हाधिकारी साहेब व त्यांच्या कर्मचार्यांनी निसर्गाला केलेली ही मदत अमूल्य तर आहेच, पण यापूर्वीही द्विवेदी साहेबांनी आम्ही राबविलेल्या अनेक निसर्गसंवर्धन उपक्रमात वेळोवेळी सहकार्य करून सतत प्रेरणा दिल्याचे उद्गार या निमित्ताने जयराम सातपुते यांनी काढले.
पक्षीअभ्यासक. निसर्गा प्रति अतिशय संवेदनशीलतेची भावना असलेले जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी यापूर्वीही निसर्गप्रेमींच्या शहर पक्षी मानचिन्ह निवड उपक्रमात मोलाचे सहकार्य केले आहे. याबरोबरच या पक्षी अभ्यासकांसोबत जिल्हाधिकारी निवास उद्यानात शालेय विद्यार्थ्यांसोबत पक्षीनिरीक्षण उपक्रमाचे आयोजनही केले होते.
आपल्या प्रांगणात यापूर्वी त्यांनी पक्षी छायाचिञ प्रदर्शनही भरवले आहे. शिवाय निसर्गप्रेमींच्या विनंतीवर आपल्या घरासमोरील मोकळी जागा वनविभागास नर्सरीसाठी उपलब्ध करून दिली आहे.
अवैध वृक्षतोडीला प्रतिबंध असो किंवा नैसर्गिक ओढेनाले बुजवण्याला प्रतिबंध आत्तापर्यंत त्यांनी निसर्गप्रेमींच्या प्रत्येक हाकेस उत्फुर्त प्रतिसाद देवुन जिल्ह्यातील निसर्गसंवर्धनास मोठा हातभार लावला असल्याचे मत जिल्हा निसर्गप्रेमी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे.
0 Comments