मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी दिले निर्देश
बारामती - प्रामुख्याने सुरळीत वीजपुरवठ्यासाठी तसेच वीजयंत्रणेतील संभाव्य धोके, अपघात टाळण्यासाठी बारामती परिमंडलात सुरु करण्यात आलेला ‘एक गाव-एक दिवस’ उपक्रम सर्वच विभागांमध्ये राबविण्यात यावा असे निर्देश बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी दिले आहेत.
अशाप्रकारचे उपक्रम राबविताना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आरोग्यविषयक खबरदारी घ्यावी, अशी सूचना त्यांनी केली आहे.
‘एक गाव-एक दिवस’ उपक्रमातून महावितरणचे अभियंते व जनमित्र थेट गावात जाऊन वीजयंत्रणेची देखभाल व दुरुस्ती करतात. वीजबिल दुरुस्ती आणि नवीन वीजजोडणीसाठी शिबिर घेतली जातात.
यावेळी महावितरणच्या विविध योजनांची तसेच ग्राहकसेवांसह वीजसुरक्षेबाबत दिली जाते. मात्र यंदा कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचे सावट असल्याने गावांमध्ये शिबिरांचे आयोजन करून ग्रामस्थांना एकत्रित करणे शक्य नाही.
त्यामुळे यंदाच्या उपक्रमातून गावे व परिसरातील वीजयंत्रणेच्या केवळ देखभाल व दुरुस्तीवर सध्या भर देण्यात येत आहे. मात्र या उपक्रमादरम्यान गावांमध्ये वैयक्तिक स्वरुपात प्राप्त झालेल्या वीजबिलांच्या तक्रारी किंवा नवीन वीजजोडणीचे अर्ज स्वीकारण्यात येत आहे.
पावसाळा सुरु होण्यापूर्वी प्रामुख्याने ग्रामीण भागामध्ये गारपीट, वादळ व अवकाळी पावसामुळे गाव परिसरातील वीजयंत्रणेचे मोठे नुकसान झालेले असते. पावसाळ्यामध्ये वीजपुरवठा सुरळीत राहावा तसेच वीज अपघाताचे संभाव्य धोके टाळण्यासाठी मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीसाठी बारामती परिमंडलमध्ये ‘एक गाव-एक दिवस’ उपक्रम सुरु करण्यात आला आहे.
गाव परिसरातील वीजयंत्रणेचे सर्वेक्षण करून उपक्रम घेण्यासाठी गावांचा प्राधान्यक्रम ठरविण्यात येतो. तसेच पालखी मार्गावरील गावांची यामध्ये प्रामुख्याने निवड करण्यात येते. मागील वर्षी सोलापूर जिल्ह्यातील 49, सातारा जिल्ह्यातील 60 आणि बारामती मंडलमधील बारामती, इंदापूर, दौंड, शिरुर, पुरंदर व भोर (जि. पुणे) तालुक्यांतील 33 अशा एकूण 142 गावांमध्ये हा उपक्रम घेण्यात आला होता.
यामध्ये वीजयंत्रणेची देखभाल व दुरुस्ती, वीजबिलांच्या तक्रारींचे निवारण व नवीन वीजजोडणीचे सुमारे 12300 कामे करण्यात आली होती.
यंदा कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे हा उपक्रम राबविण्यासाठी विलंब झाला असला तरी येत्या पंधरवड्यात सर्वच विभाग अंतर्गत गावांची निवड करून ‘एक गाव-एक दिवस’ उपक्रमाला वेग देण्याचे निर्देश मुख्य अभियंता श्री. सुनील पावडे यांनी दिले आहेत.
या उपक्रमासाठी मागणीप्रमाणे व आवश्यकतेनुसार तांत्रिक साहित्य पुरविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. महावितरणच्या कंत्राटदारांनाही या उपक्रमात सहभागी करून घ्यावे व पावसाळा सुरु होण्यापूर्वी अधिकाधिक गावांमध्ये हा उपक्रम राबविण्यात यावा.
कोणत्याही परिस्थितीमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी हयगय करू नये. प्रत्येत अभियंता व कर्मचाऱ्यांनी आरोग्याची काळजी व खबरदारी घ्यावी. तसेच महावितरणचे सर्व कार्यालय, उपकेंद्र, कंट्रोल रुम आदींची स्वच्छता व निर्जंतुकीकरण करण्यात यावे असे निर्देश मुख्य अभियंता श्री. सुनील पावडे यांनी दिले आहेत.
0 Comments