दररोज केली जातेय १० हजार गरजूंच्या जेवणाची व्यवस्था

श्री मुकुंद भवन ट्रस्ट व इस्कॉन अन्नामृत तर्फे भागवली जातेय गरजूंची भूक

In case of lockdown Food is being distributed to 10 thousand people every day


पुणे - पुरुषोत्तम लोहिया, आदित्य लोहिया संचलित श्री मुकुंद भवन ट्रस्ट व इस्कॉन अन्नामृत फाउंडेशन यांच्या वतीने दररोज १० हजार गरजूंच्या जेवणाची व्यवस्था करण्यात येत असून लॉकडाऊन संपेपर्यंत सदर उपक्रम सुरु राहणार आहे. 

इस्कॉन अन्नामृत फाउंडेशनचे अध्यक्ष संजय भोसले यांबरोबर डॉ. जनार्दन चितोडे या उपक्रमाचे व्यवस्थापन पहात असून वितरण व्यवस्थेमध्ये किशोर चव्हाण, तुषार कुलकर्णी, शरद सारडा, युधिष्टिर बंधू, प्रभू व विश्वनाथ कृपा प्रभू आदी सहकार्य करीत आहेत.

लॉकडाऊनचा फटका हा मजूरांबरोबरच गरजू नागरिकांना मोठ्या प्रमाणात बसला असून त्यांच्या जेवणाची किमान व्यवस्था करावी या उद्देशाने दोन्ही संस्थाच्या वतीने हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या अंतर्गत शहराच्या विविध भागातील झोपडपट्टीतील नागरिक, दिव्यांग, कुष्ठरोगी नागरिक यांना मदत केली जात आहे.

यासाठी कात्रज- कोंढवा रस्त्यावरील श्री राधा वृंदावन चंद्र मंदिर या इस्कॉनच्या मंदिर परिसरात असलेल्या प्रशस्त स्वयंपाकघरात हे भोजन बनविले जाते. या भोजनात पूर्ण शाकाहारी बिर्याणी पुलाव व खिचडी (प्रत्येकी ४०० ग्रॅम) यांचा समावेश आहे. बिर्याणी व खिचडी बनविण्यासाठी लाल भोपळा, बटाटा, गाजर, सोयाबीन, कडधान्ये याचा वापर करण्यात येतो.  

शहरातील विविध भागात विश्व हिंदू परिषद, जनसेवा फाउंडेशन, माहेश्वरी समाज श्रीराम मंदिर, रविवार पेठ यांसारख्या विविध संस्थांचे कार्यकर्ते हे भोजन गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यरत आहेत. या भोजनाच्या वितरण व्यवस्थेमध्ये अनेक पोलिसांचा देखील सहभाग आहे हे विशेष.

Tags - In case of lockdown Food is being distributed to 10 thousand people every day

Post a Comment

0 Comments