एआरएआयच्या वतीने कोरोना वॉरिअर्ससाठी खास फेस शिल्डची निर्मिती

आता दोन मिनिटांमध्ये स्वत: बनवा स्वत:चे फेसशिल्ड    

Production of a special face shield for the Corona Warriors on behalf of ARAI


पुणे - संपूर्ण जग कोरोना विषाणूचा सामना करीत असताना या संकटाच्या परिस्थितीत आरोग्य क्षेत्र, पोलीस यंत्रणा व सरकारी अधिकारी आपल्या सर्वांसाठी अहोरात्र कार्यरत आहेत. याच कोरोना वॉरिअर्सच्या संरक्षणासाठी भारतीय वाहन उद्योगातील नियामक संस्था म्हणून ओळखल्या जाणा-या पुण्यातील ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात एआरएआय या संस्थेच्या वतीने खास फेस शिल्डची निर्मिती करण्यात आली आहे.

हे फेसशिल्ड प्रोअॅक्टिव्ह पर्सनल इक्व्हिपमेंट म्हणजेच पीपीपी कीटचा एक मह्त्त्वाचा भाग म्हणून काम करेल इतकेच नाही तर याद्वारे कोरोना वॉरिअर्सला स्वत:चे फेस शिल्ड केवळ २ मिनिटांत स्वत: बनवता येणे शक्य होणार आहे.

या फेस शिल्डसाठी एआरएआयच्या संचालिका रश्मी उर्ध्वरेषे यांनी विशेष प्रयत्न केले याबरोबरच एआरएआयचे वरिष्ठ उपसंचालक नितीन धांडे यांचेही सहकार्य यावेळी लाभले. एआरएआयने अशा पद्धतीने २० हजार फेस शिल्ड बनविणार असून काही प्रातिनिधिक फेस शिल्डचे विनामूल्य वाटप गेल्या काही दिवसात यशस्वीपणे पार पडले आहे.

अत्यावश्यक सेवेतील नागरिकांना त्याचे वाटप व्हावे या दृष्टीने पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ यांकडे नुकतीच २००० फेस शिल्ड सुपूर्त देखील करण्यात आली. एआरएआयच्या जनरल मॅनेजर उज्ज्वला कार्ले, मॅनेजर आश्विन सुब्रमनिअम व  रविंद्र शहा, वरिष्ठ उपसंचालक व एचआर विभाग प्रमुख डॉ. मोहन उचगांवकर हे यावेळी उपस्थित होते. तर इंजिनीअर राजेश सैनी, रथिन शहा यांनी देखील यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. 

याविषयी अधिक माहिती देताना उज्ज्वला कार्ले म्हणाल्या, “कोरोना विषाणूचा धोका वाढत असताना ज्या व्यक्ती अत्यावश्यक सेवा बजावत आहे त्यांच्या संरक्षणाची काळजी घेणे एक समाज म्हणून आपली जबाबदारी आहे. मात्र असे असले तरी या सेवा बजावणा-यांना हॅण्ड सॅऩिटायझर, पीपीई किट्स, फेस शिल्ड यांची वाणवा भासते आहे.

हेच लक्षात घेत एआरएआयच्या वतीने सामाजिक जाणीवेमधून या फेस शिल्डची निर्मिती करण्यात आली आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे हे शिल्ड पीपीई कीटमधील एका महत्त्वाच्या  साधनाप्रमाणे उपयोगात येईल. याशिवाय बाजारात उपलब्ध असलेल्या इतर फेसशिल्डशी तुलना केल्यास हे शिल्ड मजबूत तरीही वजनाला हलके, १०० % पारदर्शक, जास्त काळ टिकणारे, अनेकदा पुनर्वापर करता येण्याजोगे, संपूर्ण चेहरा झाकणारे, उष्णता व रसायने यांचा प्रतिकार करू शकणारे,

स्क्रॅच प्रूफ इतकेच नाही तर स्टरलाईज व निर्जंतुकिकरण केलेले आहे. या फेस शिल्डसाठी रोबस्ट पॉलीकार्बोनेट शीटचा वापर करण्यात आला असून प्रत्येक व्यक्तीच्या चेह-या प्रमाणे ते अॅडजस्टही करता येऊ शकते.

Production of a special face shield for the Corona Warriors on behalf of ARAI


या फेस शिल्डद्वारे स्पष्ट दृश्यमानता येणे शक्य असून धुरामध्ये देखील त्याची परिणामकता इतर फेसशिल्डपेक्षा काही पटींनी जास्त आहे. विशेष म्हणजे कोणालाही स्वत:साठीचे हे फेस शिल्ड अवघ्या दोन मिनिटांत स्वत: तयार करून त्याचा वापर करणे शक्य आहे. हे बनविण्याची कृती आम्ही फेस शिल्ड सोबत पुरवीत असल्याने त्याचा फायदा या कोरोना वॉरिअर्सला होईल असा आमचा प्रयत्न आहे.”     

या फेस शिल्डचे डिझाईन व निर्मिती ही एआयएआयने केली असून आजपर्यंत तब्बल २ हजार फेस शिल्डचे वाटपही शहरातील डॉक्टर, पोलीस व महापालिका अधिकारी व कर्मचारी यांना करण्यात आले आहे. नजीकच्या भविष्यात दररोज दोन हजार या प्रमाणे पुणे महानगरपालिकेला आम्ही २० हजार फेस शिल्ड विनामूल्य पुरविणार आहोत.

याखेरीज या फेसशिल्डच्या डिझाईनवर आणखी संशोधन करून सुधारित व अधिक मजबूत फेसशिल्ड तयार करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. इतकेच नव्हे तर याचे डिझाईन इतर उत्पादकांना उपलब्ध करून देत जास्तीत जास्त फेस शिल्ड तयार करण्याच्या दृष्टीने एआरएआय कार्यरत असेल असे नितीन धांडे यांनी सांगितले.

Tags - Production of a special face shield for the Corona Warriors on behalf of ARAI

Post a Comment

0 Comments