कोरोना रूग्णांसाठी 'ससून'च्या नव्या इमारतीला महावितरणकडून 36 तासांत उच्चदाब वीजजोडणी

High pressure electricity connection within 36 hours from convection to new 'Sassoon' building for Corona patients
File Photo

पुणे - कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेल्या रूग्णांच्या उपचारासाठी ससून रूग्णालयात उभारलेल्या 11 मजली इमारतीमध्ये अवघ्या 36 तासांत नवीन उच्चदाब वीज जोडणी देण्यात आली. महावितरणकडून नवी वीज यंत्रणा उभारण्याच्या सर्व कामांची जबाबदारी घेत या इमारतीसाठी 604 केडब्लू वीजभाराची नवीन उच्चदाब वीज जोडणी शुक्रवारी (दि. 3) सायंकाळी 5.45 वाजता कार्यान्वित करण्यात आली.

कोरोना रूग्णांच्या उपचारासाठी ससून रूग्णालयातील नवीन 11 मजली इमारतीचे काम पूर्णत्वास गेले आहे. या इमारतीमध्ये प्राणवायू पाईपलाईन, सक्शन काँम्प्रेसर, अद्ययावत व्हेंटीलेटर, मॉनिटर आदींसह अतिदक्षता विभाग उपचारासाठी सूसज्ज आहेत. 'ससून'च्या या नवीन इमारतीसाठी 604 केडब्लू वीजभाराच्या नवीन उच्चदाब वीजजोडणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून गुरुवारी (दि. 2) महावितरणकडे मागणी नोंदविण्यात आली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय सेवेची सध्याची निकड लक्षात घेऊन मुख्य अभियंता श्री. सचिन तालेवार, रास्तापेठ मंडलचे अधीक्षक अभियंता श्री. प्रकाश राऊत यांनी उच्चदाब वीजजोडणी त्वरेने देण्यासाठी थेट कार्यवाहीला सुरवात केली. जागेच्या सर्वेक्षणनुसार ससून रूग्णालयाजवळच असलेल्या उच्चदाब 22 केव्ही वीजवाहिनीवरून ही वीजजोडणी देण्याचे निश्चित करण्यात आले. यासोबतच महावितरण अंतर्गत उच्चदाबाच्या नवीन वीजजोडणीची सर्व अॉनलाईन प्रक्रिया पूर्ण करून त्याच दिवशी रात्री कोटेशन तयार करण्यात आले.

उच्चदाब वीजजोडणीसाठी वीजयंत्रणा उभारण्याचे काम नियमाप्रमाणे वीजग्राहकांना करावे लागते. मात्र कोरोनाची आपत्कालिन परिस्थिती पाहता सर्व वीजयंत्रणा महावितरणकडून उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याप्रमाणे कांचन टेली इन्फ्रा इंजिनिअर्सचे श्री. विक्रम शेंडगे यांच्या सहकार्याने शुक्रवारी (दि. 3) सकाळी वीजयंत्रणेच्या कामाला प्रारंभ झाला.

यामध्ये जेसीबीच्या सहाय्याने उच्चदाब भूमिगत वाहिन्यांचे काम करण्यातआले. सर्वांत महत्वाचे आव्हानात्मक मीटरिंग क्युबिकलचे काम वेगाने करण्यात आले. तसेच अर्थिंग, नवीन मीटर, संबंधीत विविध उपकरणे बसवून त्याची चाचणी घेण्यात आली. सायंकाळी 5 वाजेपर्यंत या नवीन उच्चदाब वीजजोडणी कार्यान्वित करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर आवश्यक पाहणी व चाचणी घेऊन सायंकाळी 5.45 वाजता ही वीजजोडणी कार्यान्वित करण्यात आली.

'ससून'च्या नव्या इमारतीसाठी नवीन वीजजोडणीची तातडीची गरज पाहता महावितरणच्या अभियंत्यांनी पुढाकार घेत शुक्रवारी केवळ 8 तासांत नवीन वीजयंत्रणा उभारण्याचे काम पूर्ण केले व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्राप्त झालेल्या अर्जावर वेगाने कार्यवाही करीत अवघ्या 36 तासांत उच्चदाबाची नवीन वीजजोडणी कार्यान्वित केली.

या कामगिरीमध्ये बंडगार्डन विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. सतीश राजदीप, अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. सतीश कुलकर्णी (वाडिया उपविभाग), श्री. अनिल कुराडे (चाचणी विभाग), सहाय्यक अभियंता श्री. सिद्धार्थ सोनसळे तसेच सर्वश्री अनिल चावके, सुनील सुरनार, अजय ठाकरे या कर्मचाऱ्यांनी योगदान दिले.

Tags - High pressure electricity connection within 36 hours from convection to new 'Sassoon' building

Post a Comment

0 Comments