सामाजिक कार्यकर्ते, व्यावसायिक, पत्रकार आदींचा पुढाकार
पुणे - कट्टयांचे पुणे, अशी या शहराची ओळख आहे. विविध सामाजिक विषयांवरील चर्चा, खेळीमेळीच्या वातावरणात निघणारा निष्कर्ष आणि विचारांची देवाणघेवाण ही या कट्टयांची खरी ओळख. मात्र, केवळ चर्चा व विरंगुळ्यापुरते हे कट्टे मर्यादित न राहता पुण्यातील टिळक रस्त्यावरील गिरीजा हॉटेल येथे भरणा-या गिरीजा कट्टयातर्फे पुणे महापालिकेच्या शाळांमध्ये असलेल्या भिक्षेकरी, मजूर यांसारख्या गरजू १ हजार आश्रितांना दररोज दोन वेळचे भोजन दिले जात आहे.
गिरीजा ग्रुप कट्टयातर्फे पुणे महापालिकेंतर्गत असलेल्या ९ शाळांमधील सुमारे १ हजार आश्रितांना दररोज दोन्ही वेळचे भोजन दिले जात आहे. महापालिकेचे कर्मचारी गिरीजा हॉटेल येथून हे भोजन दररोज दुपारी व सायंकाळी घेऊन जात असून, जेथे आश्रित राहतात, त्या शाळांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून वितरीत करीत आहेत.
गिरीजाचे दादा सणस, सुरेश सणस, निनाद पुणेचे उदय जोशी, रामलिंग शिवणगे, मावळ-मुळशीचे प्रांत अधिकारी संदेश शिर्के, धनजंय जाधव, मयूर पन्हाळे, अॅड.वैजनाथ विंचूरकर, श्रीकृष्ण पाटील, किशोर खैराटकर, नवाझ फैजखान, सुभाष दगडे, नरेश माळवे, राहुल पवार, राहुल कुलकर्णी यांसह सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते, व्यावसायिक, पत्रकारांच्या पुढाकाराने हा उपक्रम सुरु आहे. गिरीजा हॉटेलचे कर्मचारी दुपारी खिचडी भात व रात्री पोळी-भाजी असे भोजन तयार करतात.
दादा सणस म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरु होताना गिरीजा हॉटेलसमोर एक भिक्षेकरी रस्त्यावरील ठेवलेल्या कच-याच्या पिशव्यांमधील खरकटे अन्न खाताना आम्हाला दिसला. ते विदारक चित्र पाहून या लॉकडाऊनच्या काळात भिक्षेक-यांसाठी काहीतरी करावे, असे आम्ही ठरविले. त्यानुसार दररोज दुपारी व रात्रीचे भोजन महापालिकेच्या शाळांमध्ये ठेवण्यात आलेल्या गरजूंना पाठवित आहोत.
उदय जोशी म्हणाले, लॉकडाऊननंतर दिनांक २७ मार्च पासून उपक्रमाला सुरु झाली. कोथरुड, बावधन, हडपसर, धनकवडी, कात्रज, विश्रामबाग, कोंढवा, वानवडी, बिबवेवाडी, भवानी पेठ, घोले रस्ता भागांतील शाळांमध्ये हे भोजन दिले जात आहेत. आजपर्यंत २० ते २२ हजार गरजूंपर्यंत भोजन पोहोचविण्यात आले आहे. आम्ही महापालिका किंवा कोणाकडूनही याकरीता आर्थिक मदत घेतलेली नाही.
स्वत:च्या खर्चातून व दानशूरांनी दिलेल्या वस्तूरुपी मदतीने हे कार्य सुरु आहे. स्वच्छतेचे सर्व नियम पाळून हे अन्न तयार केले जात असून गरजूंची प्रतिकारशक्ती वाढविण्याच्या दृष्टीने भोजनामध्ये जास्तीत जास्त भाज्यांचा वापर केला जात आहे.
0 Comments