कोविड-19 रोखण्यासाठी फोर्ब्ज मार्शल ने घेतला पुढाकार
पुणे - कोविड १९ विषाणूचा संसर्ग फैलत असताना प्रत्येक जण आपापल्या परीने त्याला रोखण्यासाठी प्रयत्नशील आहे. या संसर्गाचा प्रसार रोखायचा असल्यास कोणत्याही पृष्ठभागाचे निर्जंतुकिकरण हे महत्त्वाचे आहे, हेच लक्षात घेत पुण्यातील फोर्ब्ज मार्शलने रसायनविरहित सरफेस डिसइंन्फेक्टंट अर्थात जंतुनाशक तयार केले आहे. शहरातील सरकारी आस्थापनांबरोबर प्रामुख्याने सरकारी रुग्णालयांना फोर्ब्ज मार्शलच्या वतीने दररोज एकूण ६०० ते ८०० लिटर जंतुनाशक विनामूल्य पुरविण्यात येणार आहे.
फोर्ब्ज मार्शलने सिंबायोस्विस या स्वित्झर्लंडमधील स्टार्ट अपच्या मदतीने ‘स्विस नेवॉटर’ या जंतुनाशकाची निर्मिती केली असून हे जंतुनाशक पूर्णपणे रसायन विरहीत आहे. हायड्रोक्लीनरटीएम मशीनमध्ये ९९.९ टक्के शुद्ध मीठ, नळाचे पाणी आणि वीज यांचा वापर करीत हे जंतुनाशक वतीने बनविण्यात येत असून यासाठी कोणत्याही मोठ्या औद्योगिक सेट अपची गरज भासत नाही. अशा पद्धतीने एका शिफ्ट मध्ये (८ तासात) तब्बल २०० ते २५० लिटर इतके जंतुनाशक तयार करणे शक्य आहे.
या जंतुनाशकामध्ये असलेल्या ऑक्साईडस व रॅडिकल्समुळे इतर जंतुनाशकांपेक्षा हे अधिक प्रभावी असून व्हॅसिनिया व्हायरस, पापोव्हा व्हायरस, अडेनो व्हायरस आणि पोलिओ व्हायरस वर देखील ते प्रभावी असल्याचे प्रयोगशाळेमधील चाचण्यांमध्ये सिद्ध झाले आहे. याशिवाय हे जंतुनाशक अनेक साथीचे आजार पसरविणारे विषाणू, अॅलर्जी यांचा देखील प्रतिकार करू शकते. सध्याच्या परिस्थितीत सर्व मिळून दररोज एकूण ६०० ते ८०० लिटर जंतुनाशक विनामुल्य पुरविण्याची तयारी फोर्ब्ज मार्शलने ठेवली असून यामुळे रुग्णालये, महानगरपालिका यांना आरोग्य सेवा देताना या काळात आलेला निर्जंतुकीकरणाचा ताण हलका होण्यास काही प्रमाणात मदत होऊ शकणार आहे.
फोर्ब्ज मार्शलच्या सामाजिक दायित्व उपक्रमा अंतर्गत या आधीच खेड पंचायत समितीमध्ये या जंतुनाशकाचा वापर करण्यास सुरुवात झाली असून खेड तालुक्यातील किमान दहा आरोग्य केंद्रांतील विलगीकरण कक्ष, पुण्यातील औंध चेस्ट हॉस्पिटल आणि विशाखापट्टणम व मुंबई येथील रुग्णालये यामध्ये देखील ते वापरण्यात येत आहे.
जगातील विकसित देशांबरोबरच इतर सर्व देशांमध्ये सामान्यांना परवडणारे व सहज उपलब्ध होऊ शकणारे जंतुनाशक तयार करणे हा हे जंतुनाशक तयार करण्यामागील आमचा उद्देश असल्याचे सिंबायोस्विसचे संस्थापक डॉ. क्लॉड बेग्ले यांनी सांगितले. संस्थेच्या माध्यमातून अनेक सामजिक उपक्रम आम्ही राबवीत असतो. या वेळीही सध्याची परिस्थिती लक्षात घेत समाजाप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करीत हा उपक्रम आम्ही राबवीत आहोत, असे फोर्ब्ज मार्शलचे सह अध्यक्ष फरहाद फोर्ब्ज यांनी नमूद केले.
सध्या कोविड १९ चा सामना करण्यासाठी उद्योग विश्वाने पुढे येण्याची गरज आहे. सिंबायोस्विसच्या मदतीने तयार करण्यात आलेले हे रसायन विरहित व पर्यावरणपूरक जंतुनाशक आपली सार्वजनिक आरोग्य सेवा व पायाभूत सुविधांचे रक्षण करून या साथीच्या फैलावास अटकाव करण्याचे काम करेल, असा विश्वास यावेळी फोर्ब्ज मार्शलचे सह अध्यक्ष व इंडस्ट्री बॉडी, सीआयआयचे माजी अध्यक्ष डॉ. नौशाद फोर्ब्ज यांनी व्यक्त केला.
हे जंतुनाशक फोर्ब्ज मार्शलच्या कासारवाडी येथील प्रकल्पाच्या गेट क्र. २ वर एप्रिल अखेरपर्यंत सोमवार ते शनिवार दरम्यान सकाळी ११ ते २ वाजेपर्यंत उपलब्ध असू शकेल. दर दिवशी एकूण ६०० ते ८०० लिटर इतके जंतुनाशक उपलब्ध होणार असून आगाऊ नोंदणी करायची असल्यास कृपया रवी प्रकाश (९०३००८८९८१) व योगेश गोठे (९८८१४७५६२८) या क्रमांकावर संपर्क साधावा अशी विनंती फोर्ब्ज मार्शल यांच्या वतीने करण्यात आली आहे.
0 Comments