इस्कॉन अन्नामृत व बजाज समूहाच्या वतीने गरजूंना भोजन

पुणे व पिंपरी चिंचवडमध्ये 60 ठिकाणी दररोज अन्नदान

Food for the needy on behalf of the ISKCON Annamrita and Bajaj group

पुणे - कोरोनामुळे देशभर लॉकडाऊन करण्यात आले आहे. अचानक उद्‌भवलेल्या या परिस्थितीमुळे शहरभागातील विद्यार्थी, गरीब, मजूर, झोपडपट्टीतील नागरिक, तृतीयपंथी व भिक्षेकरी यांचे अन्नपाण्यावाचून हाल होत आहेत.
या नागरिकांना किमान एकवेळचे तरी जेवण मिळावे या उद्देशाने बजाज समूहाच्या वतीने पिंपरी चिंचवडमधील अजमेरा कॉलनी येथील इस्कॉनच्या श्रीमती रुपा राहुल बजाज अन्नामृत केंद्रात रोज सुमारे 25 ते 30 हजार नागरिकांसाठी खिचडी वाटप करण्यात येत आहे.

बजाज समूहाचे चेअरमन राहुल बजाज यांच्या मार्गदर्शनाखाली सीएसआर फंडातून सुरु करण्यात आलेल्या अन्नदान केंद्रासाठी इस्कॉनचे अन्नामृत पुणेचे अध्यक्ष संजय भोसले श्वेत व्दीपदास यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न बनवणे व बजरंग दलाचे पुणे जिल्हा अध्यक्ष कुणाल साठे यांच्यासह सुमारे 800 कार्यकर्त्यांनी वितरण करण्याची जबाबदारी घेतली आहे.

बजाज समूहाचे पंकज त्रिपाठी, अरुण जोशी, इस्कॉनच्या अन्नामृत पब्लिकेशन हेड भक्ती भोसले, उपाध्यक्ष जनार्दन चितोडे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजित पवार उपमहापौर तुषार हिंगे, नगरसेवक समीर मासुळकर समन्वयक म्हणून जबाबदारी पाहत आहेत.

विश्व हिंदू परिषदेचे पुणे जिल्हा मंत्री नितीन वाटकर, किशोर चव्हाण श्रीगणेश देवी, सहमंत्री संजय शेळके, सीतापती तसेच विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आपत्ती निर्मूलन समिती, वंदे मातरम्‌ संघटना, जनसेवा फाऊंडेशन या संस्थांचे पदाधिका-यांचे अन्नदानात सहकार्य लाभले आहे.

इस्कॉनच्या या अन्नामृत केंद्रात इतरवेळी शालेय पोषण आहार बनविणे व वितरण केला जातो. त्यासाठी सर्व अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध आहे. लॉकडाऊनमुळे शहरातील सर्व शाळा बंद असल्यामुळे ही यंत्रणा या सामाजिक उपक्रमासाठी उपयोगात आणण्यात येत आहे.

हे किचन आयएसओ 21000 प्रमाणित आहे. पिंपरी चिंचवड मनपाच्या वतीने येथील सर्व कर्मचारी व कार्यकर्त्यांसाठी सॅनिटायझर, ग्लोव्ह्‌ज, मास्क उपलब्ध करून देण्यात आले आहेत. दहा मिनिटात तीनशे किलोची खिचडी पाण्याच्या वाफेवर बनविणारे चार बॉयलर दिवसभर सुरु असतात.

वीस मिनिटात 1200 किलो खिचडी डबे बंद करून वाहनात वितरणासाठी पाठविली जाते. पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी, चिंचवड, काळेवाडी, घरकुल चिखली, चिखली गावठाण, आकुर्डी, वाल्हेकरवाडी, मोशी, रुपीनगर, तळवडे, रहाटणी, दापोडी, वाकड, च-होली, कासारवाडी, थेरगाव, पिंपळेसौदागर, विशालनगर, संत तुकारामनगर, अजमेरा कॉलनी, दिघी, सांगवी, इंद्रायणीनगर या परिसरासह शहरातील बहुतांश झोपडपट्टीतील परिसरात खिचडीचे वाटप करण्यात येते, अशी माहिती बजरंग दलाचे पुणे जिल्हा अध्यक्ष कुणाल साठे यांनी दिली.

तसेच पुण्यामधील पेठा व झोपडपट्टीतील परिसरामध्ये खिचडीचे वाटप करण्यात येते अशी माहिती इस्कॉनचे अन्नामृत पुणेचे अध्यक्ष संजय भोसले व उपाध्यक्ष जनार्दन चितोडे यांनी दिली.

Tags - Food for needy people on behalf of ISKCON Annamarait and Bajaj group

Post a Comment

0 Comments