दररोज १ हजार मोफत भोजनाच्या डब्यांचे वाटप
पुणे - कोरोना चा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण भारत लॉकडाउन आहे. परंतु एक हात मदतीचा या नात्याने पतित पावन संघटना पुणे शहर व सहयोगी संस्थांतर्फे पुणे शहर व उपनगरांतील गरजूंना १ हजार मोफत भोजनाच्या डब्यांचे दररोज वाटप करण्यात येत आहे. याशिवाय कात्रज येथे हँडवॉश व फिरते बेसिन, शिवाजीनगर भागात चहा-नाश्ता आणि मध्यभागात साबुदाण्याच्या खिचडीचे वाटप करण्यात येत आहे.
पतित पावन संघटना पुणे शहर संस्थेसह मजदूर व कामगार संघटना,भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन, अखिल महाराष्ट्र कुमावत बेलदार सभा, गार्गी सेवा फाउंडेशन, जयहिंद मित्र मंडळ, फाईव्ह स्टार मित्र मंडळ धनकवडी यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
पतित पावन संघटनेचे स्वप्नील नाईक, निलेश जोशी, दिनेश भिलारे, विजय क्षीरसागर, विजय गावडे, अक्षय अभंग, भाग्येश मोरवेकर, ज्ञानेश्वर (अक्षय) नाईक, योगेश पाटील, विनोद बाळसाखरे,राजेश मकवान व राजू काळे यांच्या सहकार्याने ही मदत दिली जात आहे.
स्वप्नील नाईक म्हणाले, संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवेसाठी जे काम करीत आहे, त्या पोलीस बांधवांसाठी तसेच पेट्रोल पंपावरील कामगार, पुणे मनपा चे सफाई कामगार, रोजंदारीवर काम करणारे मजूर, बाहेरगावचे विद्यार्थी, नागरिक व गरजूंना ही मदत देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
बुधवार पेठेतील महिला व तृतीयपंथीयांना देखील भोजन दिले जात आहे. याशिवाय ही मदत देताना त्या ठिकाणी कोरोना व स्वच्छता विषयक जनजागृती देखील आम्ही करीत आहोत, असेही त्यांनी सांगितले.
0 Comments