ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक यांची मागणी
पुणे - कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बनविण्यात आलेल्या नियमांच्या अंमलबजावणीमध्ये छोट्या व्यापा-यांना व काही प्रमाणात ग्राहकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
दिवसेंदिवस उन्हाळा वाढत असल्याने नागरिकांनी सकाळी १० नंतर लांबच लांब रांगांमध्ये उभे राहणे त्रासदायक होत आहे. त्यामुळे ग्राहकांच्या सोयीसाठी किरकोळ दुकानांची वेळ सकाळी ८ ते १० करण्यात यावी, अशी मागणी ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक व ग्राहक पंचायतीचे सूर्यकांत पाठक यांनी केली आहे.
किरकोळ व्यापारी, व्यावसायिक व ग्राहकांना लॉकडाऊनच्या काळात येत असलेल्या अडचणींसंदर्भात प्रशासकीय अधिका-यांना याबाबतचे निवेदन पाठविण्यात आले आहे. सध्या सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत किरकोळ विक्री केल्यानंतर, बारा वाजता दुकान बंद करुन व्यापारी वर्गाला मार्केटला जाऊन माल खरेदी करावा लागतो व टेम्पो आल्यानंतर सदर माल दुकानात उतरवून घेण्यासाठी दुकान उघडावे लागते. परंतु पोलीस त्यालाही मनाई करून खटले भरत असल्याचे दिसून येत आहे.
सूर्यकांत पाठक म्हणाले, कडक उन्हाळा असल्यामुळे दुकानांची वेळ सकाळी आठ ते दहा अशी ठेवल्यास नागरिकांना उन्हात फिरावे लागणार नाही. सोशल डिस्टन्सिंग पाळत नागरिकांना रस्त्यावर भर उन्हात रांगेत उभे रहावे लागत असल्याने ही वेळ अडचणीची होत आहे.
त्यामुळे ही वेळ बदलणे आवश्यक आहे. तसेच दुकानात आलेला माल उतरून घेण्यापुरती या वेळेव्यतिरिक्त परवानगी असावी. ग्राहकांना होम डिलीव्हरी देणा-या किरकोळ व्यापा-यांची अडवणूक न करण्याचे निर्देश देखील पोलीसांना देण्यात यावेत.
ते पुढे म्हणाले, स्वयंसेवी संस्थांकडून गोरगरीब व गरजूंना वाटण्यासाठी व्यापा-यांना मोठ्या प्रमाणावर वस्तूंचे कीट्स बनवण्याच्या आॅर्डर मिळत आहेत. परंतु दुकान बंद ठेवून आत मध्ये काम करण्यासाठी सुद्धा पोलिस मनाई करतात. त्यामुळे गरजूंपर्यंत हे किट पोहोचविणे कठिण जात आहे.
वैद्यकीय अधिकारी, नर्स, पोलीस यांच्याप्रमाणेच किरकोळ किराणा विक्रेते, दूध विक्रेते आपल्या जीवाची पर्वा न करता अत्यावश्यक सेवा देत आहेत. त्यामुळे त्यांना योग्य ती सुविधा देऊन प्रशासन व पोलिसांनी सहकार्य करणे गरजेचे आहे.
0 Comments