पुणे सिक्युरिटी प्रोफेशनल्स फोरमचा उपक्रम
पुणे - पुणे शहर आणि आजूबाजूच्या परिसरात काम करणा-या मजुर व त्यांच्या कुटुंबियांना पुणे सिक्युरिटी प्रोफेशनल्स फोरमच्या वतीने मदत म्हणून किराणामालाचे वाटप करण्यात आले.
नुकतीच फोरमच्या वतीने पुणे आणि शिरूर परिसरातील १०० कुटुंबांसाठीची ही मदत पुणे शिरूर विभागाचे उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख (एसडीओ) यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली. यासाठी लायन्स आणि रोटरी क्लबचे सहकार्य देखील मिळाले.
पुणे सिक्युरिटी प्रोफेशनल्सचे मंगेश काटे, लॉईटस दास, कॅनेस्टेड फूड्सचे मिलिंद दातार, कीर्ती दातार, रोटरी क्लब लोकमान्यनगरच्या टीना रात्रा, लायन्स क्लब आकुर्डीचे हिरामण गवई या विविध क्षेत्रातील नागरीकांनी एकत्र येत गरजूंना मदत देण्याचे ठरविले. आता सदर मदत देशमुख यांच्या देखरेखीत पुणे शहर व शिरूर परिसरातील गरजू मजूरांपर्यंत पोहोचविण्यात येईल.
पुणे सिक्युरिटी प्रोफेशनल्स फोरमच्या पुढाकाराने व विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या सहकार्याने ‘डोनेट अ ॅमील’ [Donate a Meal(s)] या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली असून कोविड १९ च्या या लढ्यात सर्वसामान्य गरजू नागरिकांना मदत करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत.
या अंतर्गत आज पर्यंत १५०० गरजू नागरिकांना सॅनिटायझर, ६२५० नागरिक व अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींना मास्क, २०० जणांना ग्लोव्हज, १६, २९६ जणांना जेवण तर १०८७ कुटुंबांना किराणामालाच्या सामानाचे वाटप करण्यात आले आहे. एकूण ४६,००० हून अधिक जणांना किराणामालाचे सामान व जेवण देत मदतीचा हात देण्यात आला.
0 Comments