कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे गरजूंना मदत
पुणे - चैत्र अमावस्या म्हणजेच सत्तु अमावस्या, केवळ पुणे शहराचेच नाही तर जगभरातल्या असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिराच्या संस्थापिका कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई यांचा पुण्यस्मरण दिन. परंतु कोरोना विषाणुच्या उद्रेकामुळे उद््भविलेल्या गंभीर परिस्थितीमुळे हा वासंतिक पुष्पोत्सव व पुण्यतिथीचे इतर कार्यक्रम तसेच येत्या रविवारी (दि.२६ एप्रिल) येणा-या अक्षय्यतृतीयेची सजावट देखील रद्द करण्यात आली आहे.
बुधवार पेठेतील कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे या १२३ वर्ष पुरातन श्री दत्त मंदीरामध्ये पुण्यतिथीदिनी वासंतिक पुष्पोत्सव होतो. मात्र, हा पुष्पोत्सव यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला. याकरीता खर्च होणारा निधी गेले महिनाभर दैनंदिन सुरु असलेल्या विद्यार्थी भोजन सहाय्य योजनेस व कोरोना वैद्यकीय मदतीसाठी वापरण्याचा निर्णय ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाने घेतला आहे.
पुण्यतिथीनिमित्त मंदिरात ट्रस्टचे उत्सवप्रमुख शिरीष मोहिते व वंदना मोहिते यांचे हस्ते लघुरुद्र व कै. श्रीमती लक्ष्मीबाईंच्या प्रतिमेचे पूजन झाले. तसेच समस्त जगताची या कोरोनातून लवकर मुक्तता व्हावी ही प्रार्थना देखील करण्यात आली.
ट्रस्टचे अध्यक्ष अॅड.शिवराज कदम जहागिरदार म्हणाले, अवघे पुणेकर ही आकर्षक पुष्पसजावट पाहण्यासाठी व कैरीची डाळ, पन्ह्याचा प्रसाद घेण्यासाठी मंदिरामध्ये येण्याची परंपरा आहे. मात्र, यंदा हे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. तसेच मुंबईत काही पत्रकार कोरोना बाधित निष्पन्न झाल्यावर पुण्यातील ग्राऊंड रिपोर्ट साठी विविध ठिकाणी प्रत्यक्ष जाणा-या पत्रकारांना फेस प्रोटेक्शन शील्ड चे ट्रस्ट तर्फे वितरण करण्यात आले.
0 Comments