विश्व हिंदू परिषद, श्री खंडोबा मंदिर देवस्थान, इस्कॉन पुणे तर्फे आयोजन
![]() |
| Add caption |
पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन असला, तरी देखील अनेकांना कर्तव्यपूतीर्साठी घराबाहेर पडावेच लागते. त्याचप्रमाणे गोरगरीब, मजूर,रस्त्यावर राहून उपजीविका करणारे, हातावर पोट असणारे तसेच शिक्षणासाठी येथे आलेले आणि अडकलेले विद्यार्थी यांची संख्याही खूप मोठी आहे.
त्यांना दररोजचे भोजन व मास्क वाटप व्यवस्था विश्व हिंदू परिषद मध्य भाग, श्री खंडोबा मंदिर देवस्थान, सारसबाग आणि इस्कॉन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने केली जात आहे. बुधवार आठव्या दिवसाअखेर सुमारे १३ हजार ५०० भोजन किट देण्यात आले आहेत.
गुढीपाडव्याला सुरु झालेल्या उपक्रमाकरीता अनेकांना आर्थिक व वस्तूरुपी मदत दिली आहे. विश्व हिंदू परिषदेचे किशोर चव्हाण, श्रीकांत चिल्लाळ, गिरीश येनपुरे, संतोष बडदे, धनंजय गायकवाड, गणेश वनारसे यांसह अनेक कार्यकर्ते शक्य ती मदत करीत आहेत. कात्रज, कोंढवा, भारती विद्यापीठ, आंबेगाव, सहकारनगर, पर्वती, स्वारगेट, दांडेकर पूल यांसह शहरातील मध्य भागात रिक्षा व टेम्पोद्वारे हे वितरण करण्यात येते.
किशोर चव्हाण म्हणाले, रस्त्यावरील भिकारी व निर्वासितांना गोगटे प्रशालेसह विविध शाळांमध्ये ठेवण्यात आले आहे. तेथे देखील भोजन किट आम्ही देत आहोत. पुणे स्टेशन, ससून आवार, लोहियानगर, घोरपडी पेठ, कासेवाडी, गंज पेठ, नदीपात्र, मनपा व कॉंग्रेसभवन समोर भोजन किट देण्यात येत आहेत.
याशिवाय आवश्यकता असलेल्या घरांमध्ये शिधा दिला जातो. अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर पडणारे सफाई कर्मचारी, पोलीस प्रशासन यांनाही कामाच्या ताणामुळे वेळेवर दोन घास मिळावेत यासाठी भोजन किट तसेच सुरक्षित आरोग्यासाठी मास्क वाटप व्यवस्था केली जात आहे. दररोज ३ हजार ५०० जणांना दुपारचे भोजन किट दिले जात आहे. यापुढेही दररोज दिनांक १४ एप्रिल पर्यंत हा उपक्रम सातत्याने सुरु राहणार आहे.

0 Comments