शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीच्या वतीने पुण्यातील २५ लोककलावंत कुटुंबांना मदत
पुणे : जगभरात थैमान घातलेल्या कोरोनामुळे देशावर संकट आले आहे. यावेळी समाजातील अनेक संस्था पुढे येवून गरजूंना मदत देत आहेत. पुण्यातील शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीने पुढाकार घेत पुणे शहर व पिंपरी-चिंचवडमधील गरजू लोककलावंताना मदतीचा हात पुढे करीत कृतज्ञतेचा शिधा दिला आहे.
पुणे शहरातील कीर्तनकार, शाहीर, गोंधळी, तमासगीर अशा विविध लोककलावंतांच्या घरी जाऊन कै.शाहीर हिंगे स्मृती शिधा योजनेंतर्गत कृतज्ञतेचा शिधा देण्यात येत आहे. आतापर्यंत पुण्यातील ८ गोंधळी, १ कीर्तनकार, २ शाहीर, १ लोकनृत्य, ३ लावणी नृत्यांगणा, १ मुरळी, २ वादक आणि ६ लोककलावंत, १ पोतराज आदी २५ कलावंतांना आजपर्यंत मदत देण्यात आली आहे.
या उपक्रमाअंतरग्त एका कुटुंबाला १५०० रुपयांचे किराणा साहित्य ज्यामध्ये गहू १० किलो, तांदूळ ५ किलो, तूर डाळ १ किलो, हरभरा डाळ १ किलो, साखर २ किलो, गूळ अर्धा किलो, तेल २ किलो, पोहे १ किलो, रवा १ किलो, मटकी, मसूर, चवळी, मूग, हरभरा प्रत्येकी पाव किलो, असा शिधा देण्यात आला आहे.
प्रबोधिनीचे अध्यक्ष शाहीर हेमंत मावळे म्हणाले, कोरोनाचे संकट संपूर्ण देशावर आले असून समाजातील गरजूना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेक लोककलावंतांची उपजिवीका कलेवरच अवलंबून आहे.
अशावेळी अनेक कलाकारांना त्यांच्या अडचणी स्पष्टपणे सांगणे देखील अवघड जात होते. समाजातील अशा गरजू कलावंतांना प्रबोधिनीच्यावतीने कृतज्ञतेचा शिधा वाटप करण्यात येत आहे.
0 Comments