शिरुर तालुक्यातील पाच गावांचा वीजपुरवठा सुरळीत
बारामती - महावितरणच्या टाकळी भिमा उपकेंद्रातील 24 टन वजनी व 10 एमव्हीए क्षमतेचा पॉवर ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाल्याने तो बदलण्यापासून कार्यान्वित करण्यासाठी कोरोना संकटाच्या सावटामुळे सलग 24 तासांचे तांत्रिक काम करण्यात आले व शिरूर तालुक्यातील पाच गावे व वाड्यावस्त्यांचा वीजपुरवठा शुक्रवारी (दि. 24) पूर्ववत करण्यात आला.
याबाबत माहिती अशी, की महावितरणने बारामती मंडल अंतर्गत केडगाव विभाग अंतर्गत शिक्रापूर उपविभागात टाकळी भिमा 33/11 केव्ही उपकेंद्र उभारले आहे. त्यातील 10 एमव्हीए क्षमतेच्या पॉवर ट्रान्सफॉर्मरमधून दोन उच्चदाब वीजवाहिन्यांद्वारे तसेच 62 वितरण रोहित्रांच्या माध्यमातून घोलपवाडी, सातकरवाडी, पारोडी, शिवतकरार म्हाळूंगी व इतर वाड्यावस्त्यांमधील 950 कृषीपंपांसह 1150 ग्राहकांना वीजपुरवठा केला जातो.
केवळ याच पाच गावांसह लगतच्या वाड्यावस्त्यांमध्ये योग्य दाबाच्या वीजपुरवठ्यासाठी महावितरणने हे उपकेंद्र उभारले आहे. मात्र, बुधवारी (दि. 22) पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये गंभीर बिघाड झाला व वीजपुरवठा देखील बंद पडला.
टाकळी भिमा उपकेंद्रात अतिरिक्त स्वरुपात पॉवर ट्रान्सफॉर्मर तसेच अन्य पर्यायी वीजपुरवठ्याची सोय उपलब्ध नसल्याने कोरोना संकटाच्या सावटामध्ये युद्धपातळीवर नवीन पॉवर ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे नियोजन तयार करण्यात आले.
बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. सुनील पावडे यांनी तातडीने नवीन पॉवर ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून दिला व तांत्रिक मार्गदर्शन केले. त्यानंतर अधीक्षक अभियंता श्री. चंद्रशेखर पाटील यांच्या नेतृत्वात तो बसविण्याचे काम सुरु झाले. यामध्ये कार्यकारी अभियंता श्री. राजेंद्र येडके (केडगाव विभाग), श्री. संजय वाघमारे (चाचणी विभाग) हे स्वतः सहभागी झाले होते.
गुरुवारी (दि. 23) रोजी सकाळी 9 वाजता 22 चाकी ट्रकमधून 16 टन वजनाचा व 5 एव्हीए क्षमतेचा नवीन पॉवर ट्रान्सफॉर्मर या उपकेंद्रात आणल्या गेला. त्यानंतर दोन क्रेनच्या सहाय्याने जुना 24 टन वजनाचा पॉवर ट्रान्सफॉर्मर काढणे व त्याऐवजी नवीन बसविणे व कार्यान्वित करण्यासाठी विविध तांत्रिक कामे सुरु करण्यात आली.
सलग 24 तासांनंतर शुक्रवारी (दि. 24) सकाळी 9.10 वाजता ही कामे पूर्ण झाली. एरवी पॉवर ट्रान्सफॉर्मर बदलण्यासाठी साधारणतः 8 ते 10 दिवसांचा कालावधी लागतो. मात्र कोरोनाचे सावट असल्याने महावितरणकडून जलदगतीने कार्यवाही करीत केवळ 24 तासांत नवीन पॉवर ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आला व वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला.
या कामामध्ये अतिरिक्त कार्यकारी अभियंता सचिन माने, उपकार्यकारी अभियंता नितीन महाजन, विक्रम चव्हाण, सहाय्यक अभियंता अमोल खंडागळे, रजनीकांत चांदगुडे, यतीराज राजमाने, पप्पू पिसाळ आदींसह सुमारे 40 कर्मचारी सहभागी झाले होते. कार्यकारी अभियंत्यांसह सर्व अभियंते व कर्मचारी काम पूर्ण झाल्यानंतरच 24 तासांनी घरी परतले.
0 Comments