औद्योगिक क्रांतिनंतर भांडवलशाहीतून झालेली भरभराट आणि त्या भरभराटीत टाकल्या गेलेले साम्राज्यवाद आणि वसाहतवादाचे तूप यामुळे यूरोपातील अनेक देशांमध्ये गेल्या दोन-तीन शतकांमध्ये सधनतेचा अविरत झरा वाहत होता. वास्तविकतः या संपन्नतेच्या सिंचनासाठी जगभरातील अप्रगत देशांच्या रक्ताचा बेदरकारपणे वापर या देशांनी केला होता. यातूनच इंग्लंड, फ्रान्स, स्पेन, जर्मनी या देशांच्या मजबूत साम्राज्यवादी तटबंदी उभ्या झाल्या होत्या.
मात्र कोरोना व्हायरसच्या संक्रमणनाने या मजबूत तटबंद्यांना असा काही सुरुंग लावला की, त्याला मोठमोठे तडे जाऊ लागले आहेत. या तड्यांमुळे हे मजबूत तटबंदी असलेले किल्ले कधी ढासळून जमीनदोस्त/होतील, याचीही शाश्वती आता देता येत नाही.
चीनमध्ये उत्पन्न झालेला कोरोना नावाच्या राक्षसाने पाहता-पाहता संपूर्ण जगाला आपल्या खूनी कवेत घेतलेले आहे. श्रीमती आणि सधनतेच्या नशेमध्ये मदांध असलेल्या यूरोपमधल्या देशांनी सुरवातीला या संकटाला गांभीर्याने घेतलेच नाही. दुस-या महायुद्धानंतरच्या गेल्या 70-75 वर्षांमध्ये यूरोपमधील राष्ट्रांनी कधी अशाप्रकारचे संकट अनुभवले नाही.
एक वेळ होती, जेंव्हा विसाव्या शतकातील दोन्ही महायुद्धांच्या भीषण आगीत संपूर्ण यूरोप होरपळून निघाला होता. त्या भीषण महासंकटावर मात करून यूरोपमधील देशांनी दमदार वाटचाल सुरू केली होती. राखेतून ज्याप्रमामे फिनिक्स पक्षी आकाशात भरारी घेतो, त्या प्रमाणे युरोपीय देशांनी उत्तुंग प्रगती केली. या बाबतीत युरोपीय देशातील लोकांना मार्क द्यावेच लागतील.
ज्या साम्राज्यवाद आणि वसाहतवादाच्या स्तंभांवर यूरोपची संपन्नता अवलंबून होती, त्यातील एक खांब म्हणजे वसाहतवाद दुस-या महायुद्धानंतर पुरता कोलमडून पडला होता. मात्र सुंभ जळाला तरी युरोपीय देशांचा साम्राज्यवादाचा पीळ मात्र कायम राहिला होता. त्यामुळे त्यांनी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवून तसेच अखंड मेहनतीच्या जोरावर परत विकसित देशांच्या यादीत स्वतःला स्थापित केले.
दुस-या महायुद्धानंतर म्हणावे तसे संकट कधी युरोप वर घोंघावलेच नाही. अमेरिका आणि रशिया या दोन देशांच्या चार दशकांहून अधिक काळ चाललेल्या शीतयुद्धा दरम्यान अख्ख्या युरोप वर सातत्याने युद्धाचेे ढग घोंघावत राहिले. परंतु तरीही त्यांनी या शीतयुद्धाचा फायदा घेऊन आपला विकास साध्य केला
गेल्या सुमारे 70-75 वर्षांमध्ये युरोप वर कोणतेही मोठे संकट ओढावले नव्हते. 1990 साली सोव्हिएत रशियाचे पतन झाल्यानंतर तर युरोपमधील काही बलाढ्य आणि संपन्न राष्ट्रांची मिजास आणखीनच वाढली होती. त्यामुळे या देशांमध्ये एक प्रकारची बेफिकिरी आली होती. तीच बेफिकिरी सध्या युरोपचा घास घेऊ पाहत आहे.
कोरोनाच्या संकटाची चाहूल लागल्यानंतर सुरवातीला युरोपमधल्या जवळपास सर्वच देशांनी याकडे दुर्लक्ष केले. ज्या उपाययोजना तात्काळ करायला पाहिजे होत्या त्या करण्यात त्यांनी फारच उशीर केला. युरोपमधील जवळपास सर्वच देशांमधील सरकारे आणि जनता अधिक लीबरल आणि तेथील समाज खुला समजला जातो. व्यक्तिस्वातंत्र्याला त्यांच्या देशात सर्वात पहिले प्राधान्य असते.
त्यामुळे जनतेवर तेथील सरकारे कुठल्या ही प्रकारचे प्रतिबंध लावताना फार विचार करतात. लोकांची मते घेतली जातात. मात्र हाच लीबरलनेस या देशांच्या अंगलट आला. आज इटलीसारख्या देशात कोरोनाच्या विषाणूने 10 हजार लोकांचा बळी घेतला आहे. त्या पाठोपाठ स्पेनमध्येही सहा हजार लोकांचे आयुष्य काळाच्या उदरात गडप झाले आहेत. फ्रान्स, ब्रीटन, जर्मनी, स्वीत्झर्लंड, बेल्जियम, पोर्तुगाल, आॅस्ट्रिया, नाॅर्वे, आयर्लंड, डेन्मार्क, पोलंड, रुमानिया, ग्रीस यासारख्या देशांमध्ये मृत्यूचे तांडव नृत्यु सुरूच आहे.
या गंभीर संकटामुळे एकीकडे युरोपमधील लोकांना सजग राहण्याची सूचना केली, तर दूसरीकडे स्वतःची साम्राज्यवादी भूमिका सोडून देण्यासाठी एक संधीदेखील दिली आहे. मात्र या संधीचा ते खरंच योग्य तो उपयोग करतील की नाही ते सांगता येत नाही. त्यांच्या लेखी या गोष्टी आहेत की नाही देखील सध्या कोणी सांगू शकणार नाही. मात्र याबाबत त्यांनी गंभीर विचार करणे गरजेचे आहे.
या महाभयंकर संकटातून सावरताना युरोपमधील जनतेने यापासून बोध घेतला नाही तर येणा-या काळातदेखील अशाप्रकारच्या संंकटांपासून वाचण्यासाठीचा बेफिकिरपणा गेला नाही असेच म्हणावे लागेल. असे झाल्यास युरोपच्या या साम्राज्यवादी तटबंदींना केवळ तडेच गेले आहेत. भविष्यात या तटबंदी संपूर्णपणे ढासळल्याशिवाय राहणार नाही.

0 Comments