१३ व्या वार्षिक आंतरराष्ट्रीय बेस्ट ऑफ ब्रुसेल्स परिषदेत तज्ञांनी केली
यूटीआयवरील प्रभावी उपचार पर्यायांवर चर्चा
पुणे: पुण्यात आयोजित १३ व्या वार्षिक आंतरराष्ट्रीय बेस्ट ऑफ ब्रुसेल्स परिषदेतमध्ये, देशातील आघाडीच्या तज्ञांनी भारतातील यूटीआय आणि एएमआरच्या वाढत्या प्रमाणावर चर्चा करत प्रभावी उपचार पर्यायांची आवश्यकता अधोरेखित केली. जेव्हा बॅक्टेरिया आणि फंगसचा औषधांनी नायनाट करणं कठीण होतं तेव्हा अँटिमायक्रोबिअल रेझिस्टन्सची स्थिती उद्भवते. याठिकाणी नागरिकांनी अँटीबायोटिक्सच्या अतिरेकी वापरावर मर्यादा आणण्याचा सल्ला देण्यात आला. या परिषदेची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत तज्ज्ञ डॉ. कपिल झिरपे, डॉ. शिरीष प्रयाग, डॉ. सुभल दीक्षित, डॉ. दीपक गोविल आणि डॉ. बालाजी आदी मान्यवर मंडळी सहभागी झाले होते.
भारतातील वाढत्या मूत्रमार्गाच्या संसर्गाबाबत बोलताना बेस्ट ऑफ ब्रुसेल्स परिषदेचे आयोजन अध्यक्ष डॉ. शिरीष प्रयाग यांनी संगितले की, गंभीर मूत्रमार्गाचे संक्रमण हे भारतातील सर्वात सामान्य जिवाणू संसर्ग आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) आकडेवारीनुसार, बॅक्टेरियातील एएमआरमुळे जगभरात ४९.५ लाख मृत्यू झाले आहेत आणि १२.७ लाख मृत्यूंसाठी ते थेट जबाबदार असल्याचे आढळून आले आहे.
गुंतागुंतीच्या मूत्रमार्गाच्या संसर्गासाठी ई कोलाई आणि क्लेब्सिएला न्यूमोनिया ही सर्वात सामान्य कारणे आहेत. गंभीर मूत्रमार्गाच्या संसर्ग असलेल्या रुग्णांना शस्त्रक्रिया, मूत्रपिंड प्रत्यारोपण, आयसीयूमध्ये दाखल करुन विशेष काळजी घेणे आणि कधीकधी व्हेंटिलेशनची आवश्यकता भासते. एएमआरच्या वाढत्या प्रसारासह गंभीर युटीआयवर प्रकरणांवर उपचार करणे अत्यंत आव्हानात्मक ठरत आहे, त्यामुळे रुग्णाला जास्त काळ रुग्णालयात राहावे लागते.
ते पुढे सांगतात की, अँटीबायोटिक औषधांचा अतिवापर आणि दुरूपयोग यामुळे विशेषत: बॅक्टेरिआंमध्ये Antimicrobial resistance (AMR) म्हणजेच अँटी-बायोटिक्सना प्रतिकार करण्याची क्षमता झपाट्याने वाढत आहे. अँटी-बायोटिक्सची खरोखर गरज आहे का ते सर्वप्रथम चेक करा. अँटी-बायोटिक्सचा डोस योग्य आहे की नाही याची खात्री करून घ्यावी.
भारतातील एमबीबीएस शिक्षणातील तफावत अधोरेखित करताना, डॉ. शिरीष प्रयाग सांगतात की, एमबीबीएस अभ्यासक्रमात सुधार करणे गरजेचे आहे जेणेकरून सध्याचे एएमआरविषयीची माहिती देखील यामध्ये समाविष्ट असेल. प्रत्येक प्रदेशानुसार प्रतिकार करण्याची पद्धतही वेगवेगळी असू शकते. जसे वेल्लोरमध्ये जी समस्या आढळते ती पुणे किंवा दिल्लीसारखी असू शकत नाही. म्हणून, नवीन डॉक्टरांनी स्थानिकरित्या प्रतिकार क्षमता आणि संवेदनशीलतेबद्दल पुरेशी माहिती प्राप्त केली पाहिजे. सरकारने अँटीबायोटिक विक्रीवर काटेकोरपणे लक्ष ठेवले पाहिजे.
वाढत्या प्रतिकार पातळीवर भर देताना,बेस्ट ऑफ ब्रुसेल्स परिषदेचे आयोजन सचिव डॉ. कपिल झिरपे सांगतात की, जेव्हा एखादी व्यक्ती ई कोलाई आणि कार्बापेनेम सारख्या इतर संसर्गविरोधी विषाणूंना प्रतिरोधक बनतात, तेव्हा त्याला कार्बापेनेम प्रतिरोधक एन्टरोबॅक्टेरेल्स (सीआरई) असे म्हणतात. भारतात, सीआरई संसर्गाशी संबंधित मृत्युदर २०% ते ५४.३% पर्यंत अधिक आहे, ज्यामुळे नवीन उपचार पर्यायांची आवश्यकता आहे.
बेस्ट ऑफ ब्रुसेल्स परिषदेचे आयोजन सचिव डॉ. सुभल दीक्षित सांगतात की, वाढत्या प्रतिकारामुळे उपचार गुंतागुंतीचे होतात. शक्य असल्यास कल्चर आणि औषधांची सेन्सिटिव्हिटी टेस्ट करण्यावर भर द्या. गरज असेल तरच अँटीबायोटिक्सचा वापर केला पाहिजे. अनेक रुग्णालयांमध्ये याबाबत जागरूकता कार्यक्रम राबविले जात आहेत, परंतु याबरोबरच प्रशिक्षण कार्यक्रम देखील आवश्यक आहेत. अँटीबायोटिक्सचा वापर नेहमीच काळजीपूर्वक केला पाहिजे.
डॉ. दीपक गोविल(संचालक - क्रिटिकल केअर मेडिसिन, मेदांता इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअर अँड अॅनेस्थेसियोलॉजी) सांगतात की, एएमआरच्या वाढीला तोंड देण्यासाठी तसेच गंभीर यूटीआयचा वाढत्या प्रसाराला तोंड देण्यासाठी टार्गेटेड अँटीमायक्रोबियल थेरपी सक्षम करण्यासाठी भविष्यात खास संशोधन देखील केले पाहिजे. भारतात एएमआर प्रभावीपणे हाताळण्यासाठी बहुआयामी दृष्टिकोन असणे आवश्यक आहे. यामध्ये वाढती जागरूकता, नवीन उपचार पर्याय, स्वच्छता सुधारणे आणि अँटीबायोटिक प्रतिरोधक समस्येचे समग्रपणे निराकरण करणे समाविष्ट आहे.
डॉ. व्ही. बालाजी(प्रोफेसर, क्लिनिकल मायक्रोबायोलॉजी, सीएमसी वेल्लोर आणि प्रमुख सदस्य) सांगतात की, गंभीर युटीआय उपचारांवर अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स (AMR)चा संबंध आम्हाला आढळून आला आहे. आतापर्यंत भारतात यावर कोणतेही नवीन औषध सापडलेले नाही मग ते कर्करोग, उच्च रक्तदाब, मधुमेह किंवा अगदी अँटीबायोटिक्ससाठी असो. पण पहिल्यांदाच, चेन्नईच्या एका वैद्यकीय रसायनशास्त्रज्ञाने सेफेपाइम एन्मेटाझोबॅक्टम नावाचे एक नवीन अँटीबायोटिक शोधून काढले आहे.
ही एक मोठी गोष्ट आहे कारण सहसा, जेव्हा परदेशात औषध शोधले जाते तेव्हा ते भारतात पोहोचण्यास किमान 5 ते 6 वर्षांचा कालावधी जातो. प्रथम, त्यांची स्वतःची मागणी पूर्ण केली जाते आणि नंतर ते निर्यात केले जाते. आणि जेव्हा ते भारतात येते तेव्हा ते 3 ते 5 पटीने महाग असते. पण यावेळी, औषध भारतात बनवले जात असल्याने या गोष्टी टाळता येतील.
हे अत्यंत प्रभावी आणि परवडणाऱ्यादरात उपलब्ध असून, विशेषतः गंभीर मूत्रमार्गाच्या संसर्गावर उपचार करण्यासाठी हे फायदेशीर ठरते. गेल्या वर्षभरात घडलेले हे खरोखरच एक उल्लेखनीय आणि सकारात्मक असे पाऊल आहे आणि याचा आपल्या सर्वांना अभिमान आहे. पुण्यात झालेल्या बेस्ट ऑफ ब्रुसेल्स परिषदेच्या १३ व्या आवृत्तीत ७०० हून अधिक क्रिटिकल केअर विभागात कार्यरत डॉक्टर्स उपस्थित होते.
0 Comments