केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांचे विचार-
एमआयटी डब्ल्यूपीयूचा ६ वा दीक्षांत समारंभ, ५४७८ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान
पुणे : सतत नवे ज्ञान आत्मसात करणे, आव्हानांचा सामना करणे, कठिण परिश्रम आणि सतत पुढे जाण्याची जिद्द हेच गुण विद्यार्थी जीवनाचा माईल स्टोन असेल. कॉर्पोरेट जगात पाऊल ठेवताना स्वतःला सिद्ध करा आणि आपल्या गुणांच्या आधारे कुटुंब व संस्थेची प्रतिष्ठा वाढविण्याचे कार्य करावे.” असे विचार केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी व्यक्त केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचा ६ वा दीक्षांत समारंभ शनिवारी विश्व सभामंडप, विश्वराजबाग, लोणी-काळभोर, पुणे येथे पार पडला. यावेळी विद्यापीठाच्या ५४७८ विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. त्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
विज्ञान क्षेत्रात आयुष्यभर केलेल्या अतुलनीय कार्याबद्दल प्रसिद्ध शास्त्रज्ञ भारत सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार पद्मश्री डॉ. कृष्णस्वामी विजय राघवन यांना "एमआयटी डब्ल्यूपीयू विज्ञान महर्षी सन्मान ” देऊन गौरविण्यात आले. सन्मानपत्र, सरस्वतीची मुर्ती व ५ लक्ष रूपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
यावेळी प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय व्यावसायिक सल्लागार प्रा. रामचरण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरु डॉ. आर. एम. चिटणीस, सीईओ डॉ. संजय कामतेकर, कुलसचिव प्रा. गणेश पोकळे आणि परीक्षा नियंत्रक डॉ. राहुल जोशी, तसेच विद्यापीठाचे अधिष्ठाता व संचालक हे सर्व उपस्थित होते.
या प्रसंगी विद्यार्थी अभिजीत पवार याला ‘फाउंडर प्रेसिडेंट मेडल’ व विद्यार्थिनी अनुश्री कुलकर्णी हिला ‘एक्झिक्युटिव्ह प्रेसिडेंट मेडल’ ने गौरविण्यात आले. तसेच १२२ विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक, ८५ रौप्य व ८५ कास्य पदक असे एकूण २९५ विद्यार्थ्यांना मेडल बहाल करण्यात आले. तसेच २६ विद्यार्थ्यांना पी.एचडी देण्यात आली. यामध्ये ४३५ विद्यार्थी मेरीट लिस्ट मधील आहेत.
अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, कम्प्यूटर सायन्स अॅण्ड इंजीनियरिंग, रामचरण स्कूल ऑफ लिडरशीप बिझनेस, ईकॉनॉमिक्स अॅण्ड कॉमर्स, स्कूल ऑफ गर्व्हनमेंट, हेल्थ सायन्य अँड टेक्नॉलॉजी, सायन्स अँड एन्व्हायरमेंटल स्टडीज, डिझाइन, लिबरल ऑर्टस, लॉ आणि कॉन्शसनेस या व्यतिरिक्त अन्य शाखेतील विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.
गजेंद्रसिंह शेखावत म्हणाले," तंत्रज्ञानाच्या काळात ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या आहेत. हजारो वर्षाचे ज्ञान गेल्या १०० वर्षात कित्येक पटीने वाढले आहे. तसेच गेल्या १० वर्षात नवे प्रयोग व नवे ज्ञान समोर येत आहे. अशावेळेस विद्यार्थ्यांनी सतत शिकत रहावे आणि ज्ञान आत्मसात करावे. आज माहिती तंत्रज्ञानामुळे आपल्या बोटांमध्ये संपूर्ण जगाचे ज्ञान आले आहे. वर्तमान काळात मानव जीवनाला समृध्द करण्यासाठी सर्व समस्यां सोडविण्यावर भर दिला जावा.”
21 व्या शतकाला सामोरे जाताना विद्यार्थ्यांनी कृतीशील शिक्षणाकडे वळताना संकल्पनात्मक शिक्षणाची कास धरली पाहिजे. विद्यार्थ्यांनी आपल्यामधील सुप्त कौशल्य गुणांचा शोध घेवून त्यांचा विकास करणे ही आजच्या काळाची गरज बनली आहे. असेही केंद्रीय मंत्री शेखावत यांनी सांगितले.
डॉ. कृष्णस्वामी विजय राघवन म्हणाले," गेल्या १५ वर्षात सृष्टीवर पर्यावरण, वातावरण बरोबर आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. अशा वेळेस विद्यार्थ्यांनी वर्गापेक्षा बाहेरच्या जगाला समजून घेणे गरजेचे आहे. समाजातील सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी आपली दिशा निश्चित करावी.”
प्रा. रामचरण म्हणाले," विद्यार्थ्यांना यशासाठी संपूर्ण आकाश उघडे आहे. देशाची आर्थिक स्थिती उत्तम असतांना आपण डिग्री घेतली आहे. त्यामुळे हा आपल्यासाठी गोल्डन इरा आहे. या काळात देशाची जीडीपी वृद्धी होत आहे. विद्यार्थ्यांच्या कल्पना या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. पदोपदी ज्ञान उपलब्ध आहे त्याचा लाभ घ्यावा. वाढते सोशल नेटवर्क आणि सर्वात महत्वाचे विद्यार्थ्यांना आपले ध्येय लक्ष निर्धारित करून यश मिळविता येते.”
प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले," भारतीय संस्कृती, परंपरा आणि तत्वज्ञान ही तत्व जीवनात शांती निर्माण करतात. आज संपूर्ण भारताला भगवान गौतम बुद्ध आणि म. गांधी यांच्या नावाने ओळखले जाते. विद्यार्थ्यांनी शिस्त आणि वचन बद्धतेचे पालन करावे. तसेच धर्म आणि स्वतःच्या कर्तव्याला ओळखावे. भविष्यात सुख-समाधान आणि शांतीचा मार्ग दाखविण्याचे दायित्व भारताचे आहे.”
राहुल कराड म्हणाले," आम्ही समाजाचा एक महत्वपूर्ण भाग आहोत. अशा वेळेस येथील संविधान हे अत्यंत महत्वपूर्ण असल्यामुळे समाजातील सर्व समस्यांचे समाधान करणे विद्यार्थी व आमची जवाबदारी आहे. हे विद्यापीठ जागतिक स्तरावरील ज्ञानाबरोबरच आध्यात्मिक ज्ञान देऊन विद्यार्थ्यांना घडविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करते. परिवर्तनीय भारतासाठी विद्यार्थ्यांची महत्वाची भूमिका असेल.”
ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्हिडीओच्या माध्यमातून संदेश दिला. कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस यांनी प्रस्ताविक व स्वागतपर भाषण केले. प्रा. डॉ. शालिनी टोंपे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. राहुल जोशी यांनी आभार मानले.
0 Comments