७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित रक्तदान महाशिबिराला अभूतपूर्व प्रतिसाद
पुणे : 'नसे केवळ हे रक्तदान, जीवनदानाचे हे पुण्य काम' हा विचार घेऊन सुरेंद्र पठारे फाउंडेशनने ७५ व्या प्रजासत्ताकदिनी आयोजिलेल्या रक्तदान महाशिबीरात विक्रमी ३६७१ रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले. तरुण-तरुणी, महिला-पुरुष अशा सर्वांनीच दिलेल्या उदंड आणि अभूतपूर्व प्रतिसादात झालेल्या रक्तदान महाशिबीराने गेल्या तीन वर्षांचा विक्रम मोडीत काढला.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सुरेंद्र पठारे फाऊंडेशनतर्फे खराडी गावातील राजाराम भिकू पठारे इनडोअर स्टेडियममध्ये आयोजित या महाशिबिराला जत्रेचे स्वरूप आले होते. सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेत उत्साहात झालेल्या या शिबिराला सकाळपासूनच परिसरातील नागरिकांनी रक्तदान करण्यास गर्दी केली.
आरोग्य तपासणी करून पात्र दात्यांना रक्तदानासाठी सोडण्यात आले. रक्तदात्यांची योग्य काळजी घेतली जात होती. त्यामुळे प्रत्येक रक्तदात्यांकडून फाउंडेशचे आभार व्यक्त होत होते. प्रत्येक रक्तदात्याला प्रमाणपत्र व अल्पोपहार देऊन त्याचे रक्तदान केल्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले. ससून सर्वोपचार रुग्णालय रक्तपेढी, रेडप्लस रक्तपेढी व अक्षय ब्लड बँक यांच्या सहकार्याने रक्तसंकलन करण्यात आले.
या रक्तदान शिबीराचे उद्घाटन वडगावशेरी मतदारसंघाचे माजी आमदार बापूसाहेब पठारे व सुरेंद्र पठारे फाऊंडेशनचे अध्यक्ष सुरेंद्र पठारे यांच्या हस्ते झाले. कसबा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर, शिरूर मतदारसंघाचे आमदार अशोकबापू पवार,
माजी आमदार जगदीश मुळीक, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, चंदननगर पोलीस निरीक्षक मनीषा पाटील यांच्यासह परिसरातील सर्वपक्षीय नेत्यांनी, प्रतिष्ठित नागरिकांनी शिबिराला भेट देत फाउंडेशनचे व पठारे यांचे अभिनंदन केले.
सुरेंद्र पठारे म्हणाले, "समाजातील प्रत्येक घटकाला सक्षम करण्याच्या उद्देशाने फाउंडेशनची सुरुवात झाली. राज्यात रक्ताची कमतरता प्रकर्षाने जाणवत असते. शासन, तसेच अनेक संस्था वारंवार रक्तदान करण्याबाबत आवाहन करत असतात.
हीच बाब लक्षात घेऊन आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नांना हातभार लावावा, तसेच प्रजासत्ताक दिनी राष्ट्राला वंदन करावे, या विचारातून २०२१ पासून रक्तदान शिबिराचे आयोजन केले जात आहे. दरवर्षी रक्तसंकलनाचा नवा विक्रम स्थापित होत आहे. पहिल्या वर्षी १६४४, दुसऱ्या वर्षी ३४५३, तर तिसऱ्या वर्षी ३५९३ रक्तपिशव्यांचे संकलन झाले होते. यंदा विक्रमी ३६७१ रक्तपिशव्या संकलित झाल्या आहेत."
"रक्तदात्यांच्या अभूतपूर्व प्रतिसादात हे शिबीर पार पडते आहे, याचा आनंद होतो आहे. मागील तीन वर्षांच्या रक्तसंकलानाचा विक्रम यावेळी मोडीत निघाला. हे महाशिबीर यशस्वी करण्यासाठी झटणारे सर्व डॉक्टर, आरोग्य कर्मचारी तसेच अनेक दिवसांपासून अहोरात्र मेहनत घेणारे सुरेंद्र पठारे फाऊंडेशनचे सर्व कार्यकर्ते व रक्तदानाचे महान कार्य करत भरभरून प्रतिसाद देणाऱ्या सर्व नागरिक बंधू-भगिनींचे आभार व्यक्त करतो. तसेच, येणाऱ्या काळातही प्रजासत्ताक दिनानिमित्त फाऊंडेशनच्या माध्यमातून हे रक्तदान महाशिबीर भरवण्यात येईल," असा विश्वास यांनी व्यक्त केला.
0 Comments