‘श्रीराम लागू रंग – अवकाश’चा रावल यांच्या उपस्थितीत कार्यारंभ
ब्लॅक बॉक्स संकल्पनेवर आधारित आधुनिक सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या रंगमंचाची उभारणी सुरु
पुणे : मराठी भाषेतील साहित्य, कलाकार, लेखक हे करीत असलेले काम उच्च दर्जाचे आहे, मी जर आज मराठी रंगभूमीत काम करीत असतो, माझे मराठी रंगभूमी, कलाकार यांबरोबर आणखी आदानप्रदान असते तर एक अभिनेता, एक नाट्यकर्मी म्हणून माझ्या आज असलेल्या क्षमता नक्कीच वाढल्या असत्या, मी आणखी अनुभवसंपन्न झालो असतो. अशा भावना राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे अध्यक्ष आणि सुप्रसिद्ध अभिनेते पद्मश्री परेश रावल यांनी व्यक्त केल्या.
महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या वतीने टिळक रस्त्यावरील हिराबाग चौक येथील ज्योत्स्ना भोळे सभागृह संकुल याठिकाणी ‘श्रीराम लागू रंग – अवकाश’चा कार्यारंभ आज रावल यांच्या उपस्थितीत संपन्न झाला, त्या वेळी ते बोलत होते. महाराष्ट्र कल्चरल सेंटरचे अध्यक्ष डॉ मोहन आगाशे, कार्याध्यक्ष एस पी कुलकर्णी, श्रीमती दीपा लागू, शुभांगी दामले, राजेश देशमुख, सेंटरचे सभासद व अनेक कलाकार यावेळी आवर्जून उपस्थित होते.
मराठीमध्ये जास्तीत जास्त चांगली नाटके यावीत, याची आम्ही गुजराथी लोक वाट पाहत असतो. कारण इथे चांगली नाटक आली की आमचीही ताकद वाढते. महाराष्ट्र कल्चरल सेंटरशी माझे नाते गेले अनेक वर्षे जुडलेले आहे. सेंटरचे ‘काटकोन त्रिकोण’ हे नाटक मी गुजराथीमध्ये केलं होत अशी आठवण देखील रावल यांनी यावेळी सांगितली.
यावेळी बोलताना रावल पुढे म्हणाले की, “नाटकांच्या तिकिटांवर जीएसटी लागला तर नाटक संस्कृती लयाला जाईल असे आम्हाला वाटत होते. यावर मी दिल्लीत असताना अनेकदा आवाज उठविला. या संदर्भात तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेटही घेतली. एक दिवस अजित भुरे, अशोक हांडे ही मंडळी दिल्लीत होती. आम्ही शरद पवार यांकडे गेलो ते आमच्या सोबत अरुण जेटली यांकडे यायला तयार झाले.
वेळेच्या आधीच आम्ही अरुण जेटली यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. त्या भेटीत १५ ते २० सेकंदात जीएसटीचा मुद्दा निघाला आणि अरुण जेटली यांनी नाटकांच्या तिकिटावर जीएसटी लावला जाणार नसल्याचा आदेश काढलाही. बाहेर आल्यानंतर उत्सुकतेपोटी मी पवारांना विचारले की, ही तुमची व्होट बँक नसताना तुम्ही असा पुढाकार का घेतला त्यावेळा शरद पवार मला म्हणाले, की हा विषय कला आणि संस्कृतीचा विषय आहे.
मुंबईतील कला- संस्कृती मराठी माणसामुळे टिकली आहे, आणि ती पुढेही टिकवायची असेल तर प्रयत्न करणे गरजेचे आहे. कला संस्कृती टिकविण्यासाठी मराठी लोकच काम करू शकतात. आज गुजराथमध्ये बडोदा हे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते. येथे मराठी माणसांची संख्या मोठी आहे. त्यामुळे हे काम मराठी माणूसच करू शकतो.”
भारतात आज 'ब्लॅक बॉक्स' ही संकल्पना नवीन आहे. जसा विकास जरुरी आहे तशी ‘श्रीराम लागू रंग – अवकाश’ सारख्या सांस्कृतिक जागा ही समाजाची गरज आहे. अशा ‘स्पेसेस’मधून कलाकार, दिग्दर्शक, लेखक यांच्य कक्षा तर रुंदावतीलच शिवाय प्रेक्षकांनाही याचा फायदा होईल, असे रावल यावेळी म्हणाले. अशा जागा कलाकारांनी चालवल्या तर त्याचे सोनं होतं, सरकारच्या हातात गेल्या तर कलाकार आणि प्रेक्षकांची निराशा होते, असेही रावल यांनी नमूद केले.
रंगभूमीच्या रूढ मर्यादांना काटशाह देत दिग्दर्शकाला आपली कलाकृती सादर करण्याचे स्वातंत्र या रंग -अवकाशात त्यांना मिळावे, रंगभूमीच्या मर्यादा यामध्ये आडव्या येऊ नयेत या उदेशाने आम्ही हा रंग अवकाश उभारत आहोत. सादरीकरणावेळी कलाकारांना येणाऱ्या मर्यादांचा आम्ही येथे अगोदरच विचार केला असून, सादरकर्त्याला सादरीकरणासाठी मोकळीक मिळावी हाच आमचा हेतू असल्याची माहिती या रंग- अवकाशाचे वास्तुरचनाकार माधव हुंडेकर यांनी दिली.
ज्योत्स्ना भोळे सभागृह संकुल परिसरात उभारण्यात येत असलेले हे ‘श्रीराम लागू रंग – अवकाश’ ब्लॅक बॉक्स संकल्पनेवर आधारलेले असून कलाकार, दिग्दर्शकाला आधुनिक दर्जाच्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत. चार विविध पद्धतीने रंगमंचाची रचना करीत एका वेळी २०० नागरिकांना याठिकाणी नाटके, कार्यशाळा, सांस्कृतिक व कला विषयक कार्यक्रमांचा आस्वाद घेता येणार आहे.
प्रामुख्याने कार्यक्रम, नाटकासाठी हवी तशी रचना करण्याची सोय, त्यासाठी सुयोग्य अशी प्रकाश व्यवस्था (विशेष लाईटची ग्रीड), ध्वनिशास्त्राचा विचार करून डिझाईन केलेली ध्वनी यंत्रणा आदींचा समावेश असेल. शहराच्या मध्यवर्ती भागात उभारण्यात येत असलेल्या या रंग अवकाशात पार्किंगची उत्तम सोय असणार आहे हे याचे आणखी एक वैशिष्ट्य आहे.
उत्तम सादरीकरण करायचे असेल तर प्रत्यकाला एक ‘स्पेस’ लागते थिएटर तुम्हाला तुमची ती स्पेस देत असते. ब्लॅक बॉक्स ही संकल्पना भारतात नवीन असली तरी ती रुळेल असे आम्हाला वाटते. याद्वारे जाणकार कलाकार आणि रसिक घडतील. पुण्यात सादरीकरणाच्या अशा जागा वाढत असल्या तरी त्यासोबतच अनेक नवी आव्हाने उभी राहत आहे. ती असली तरी, रंगमंच टिकेल हा विश्वास आम्हाला आहे, असे मत डॉ मोहन आगाशे यांनी मांडले.
डॉ श्रीराम लागू यांचे आत्मकथन असलेली ‘लमाण’ या पुस्तकातील काही भागाचे अभिवाचन अभिनेते गिरीश कुलकर्णी यांनी केले. राजेश देशमुख यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाराष्ट्र कल्चरल सेंटरचा २० वर्षांचा आढावा घेणारी चित्रफित दाखविण्यात आली.
0 Comments