जेबीजी सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये अनंत गावकर, वृषाली उत्तेकर ठरले विजेते


 पुणे : सातारा रनर्स फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेली जेबीजी सातारा हिल हाफ मॅराथॉन (जेबीजी एसएचएचएम) ३ सप्टेंबर, २०२३ रोजी पुन्हा एकदा यशस्वीरित्या पार पडली.

सातारा रनर्स फाउंडेशन या ना-नफा तत्त्वावरील संस्थेने पुन्हा देशभरातील धावण्याची आवड असलेल्यांना एकत्र आणले आणि त्यांना एक थरारक व आव्हानात्मक अनुभव दिला. ही मॅराथॉन ‘आउट अँड बॅक (जेथून सुरुवात केली, तेथेच परत येणे)’ पद्धतीने घेण्यात आली. रविवारी सकाळी ६:३० वाजता सातारा येथील पोलीस ग्राउंड येथून मॅराथॉन सुरू झाली.

साताऱ्याचे खासदार श्री. उदयनराजे भोसले, साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र दुदी व जय बालाजी ग्रुपचे संचालक गौरव जाजोदिया यांनी मॅराथॉनला हिरवा झेंडा दाखवला. ‘सर्वे धावक: कुटुंबकम (सर्व धावपटू एका कुटुंबासारखे आहेत)’ हे यंदाच्या मॅराथॉनचे सूत्र होते. सहभागी सदस्यांमध्ये एकता व सहकार्याची भावना जोपासण्यासाठी हे सूत्र स्वीकारण्यात आले होते.

भारतातील या तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वांत मोठ्या तसेच देशातील सर्वांत लोकप्रिय हाफ मॅराथॉन्सपैकी एक असलेल्या या मॅराथॉनसाठी ७५०० हून अधिक नोंदण्या झाल्या होत्या, तर ५९८५ धावपटूंनी प्रत्यक्ष भाग घेतला. १२वी जेबीजी सातारा हिल हाफ मॅराथॉन ही जय बालाजी ग्रुपने शीर्षक प्रायोजक म्हणून मोठ्या अभिमानाने प्रस्तुत केली. स्केचर्सचे पाठबळ या कार्यक्रमाला लाभले.

या मॅराथॉनमध्ये उत्कृष्ट दर्जाच्या धावपटूंचा सहभाग होता. ४,१९१ जणांनी ब्राँझपदके पटकावली, तर १,४०६ जणांनी रौप्यपदके व ३८८ धावपटूंनी सुवर्णपदके प्राप्त केली. खुल्या पदक प्रवर्गात अनंत गावकर हे मॅराथॉनचे विजेते ठरले. त्यांनी केवळ १ तास, १४ मिनिटे व १४ सेकंदात ही मॅराथॉन पूर्ण केली.

खुल्या महिला प्रवर्गात वृषाली उत्तेकर यांनी पहिले स्थान प्राप्त केले. त्यांनी १ तास, ३६ मिनिटे व १९ सेकंदात ही शर्यत धावून पूर्ण केली. खुल्या पुरुष गटात मोहित सिंग यांनी, तर खुल्या महिला गटात नव्या वड्डे दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यांनी अनुक्रमे १ तास, १४ मिनिटे व २० सेकंद आणि १ तास ३७ मिनिटे, ४२ सेकंदांमध्ये शर्यत धावून पूर्ण केली. विशाल कांबिरे व मनीषा जोशी यांनी आपापल्या प्रवर्गांमध्ये तिसरे स्थान प्राप्त केले.

त्यांनी ही शर्यत अनुक्रमे १ तास, १४ मिनिटे व ३२ सेकंद आणि १ तास ४१ मिनिटे व ३३ सेकंदांत पूर्ण केली. महिला व पुरुष दोन्ही गटांतील पहिल्या तीन स्थानांवरील विजेत्यांना अनुक्रमे ₹ ५०,०००, ₹ ३०,००० आणि ₹ २०,००० अशी बक्षिसे देण्यात आली. शिवाय विजेत्याची ट्रॉफी व प्रमाणपत्रेही प्रदान करण्यात आली.

अतिरिक्त पोलीस महासंचालक रवींदर सिंघल, पोलीस महानिरीक्षक कृष्ण प्रकाश, साताऱ्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या उपस्थितीने ह्या साहसी शर्यतीचा दिमाख वाढला. मॅराथॉनमध्ये तब्बल १०३४ महिलांचा सहभाग होता. देशात आजवर झालेल्या हाफ मॅराथॉन्स मधील महिला धावपटूंच्या सहभागाची ही दुसऱ्या क्रमांकाची मोठी संख्या ठरली आहे.

सातारा रनर्स फाउंडेशनचे संस्थापक डॉ. संदीप काटे यांनी मॅराथॉनबद्दल उत्साह व कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, सर्व सहभागी धावपटूंचा उदंड प्रतिसाद आणि स्वयंसेवक व प्रायोजकांचे समर्पण बघून आमचा उत्साह वाढला आहे. या सर्वांच्या योगदानाने १२वी सातारा हिल हाफ मॅराथॉन यशस्वी ठरली आहे. हा सोहळा नेहमीच केवळ धावण्याच्या शर्यतीपलीकडील असतो. तंदुरुस्ती व स्वास्थ्यावर विश्वास असलेल्या उत्साही व्यक्तींची समुदाय बांधण्याचा हा प्रयत्न आहे. आम्ही या सक्रिय सहभागाबद्दल प्रत्येकाचे मनापासून आभार मानतो.”

शीर्षक प्रायोजक जय बालाजी ग्रुपचे संचालक गौरव जाजोदिया यांनीही या सोहळ्यातील सहभागाबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, “सातारा हिल हाफ मॅराथॉनशी जोडले जाणे हा सन्मान आहे. या कार्यक्रमातून आमची स्वस्थ व क्रियाशील जीवनशैलीप्रती बांधिलकी दिसून येते. सहभागी धावपटूंचे समर्पण व चैतन्य बघून आम्हाला खूप आनंद झाला. त्यांना अशा प्रकारे सातत्याने पाठिंबा देण्यास आम्ही उत्सुक आहोत.

२०१२ मध्ये सुरू झालेली जेबीजी सातारा हिल हाफ मॅराथॉन भारतातील सर्वांत मोठ्या समुदाय-आयोजित मॅराथॉन्सपैकी एक आहे. ‘एका माउंटन रनमध्ये सर्वाधिक लोकांच्या सहभागाचा’ गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड या हाफ मॅराथॉनच्या नावावर आहे. समृद्ध वारशासह जेबीएम एसएचएचएम ही भारतातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वांत मोठी मॅराथॉन आहे. टाटा मुंबई मॅराथॉन आणि वेदांता दिल्ली हाफ मॅराथॉननंतर ह्याच मॅराथॉनचा क्रमांक लागतो. 

जेबीएम एसएचएचएममधून मिळणारे उत्पन्न सहभागी सदस्यांना अधिक चांगला अनुभव देण्याच्या दृष्टीने खर्च केले जाते. यात १६ आठवड्यांचा एक प्रशिक्षण कार्यक्रम व सोहळ्याचे स्मरण करून देणाऱ्या वस्तूंचा (मेमोराबिलिया) समावेश होतो. शिवाय, सातारा रनर्स फाउंडेशनने १ व २ सप्टेंबर २०२३ या दोन दिवसांत एक समारंभपूर्व जेबीजी एसएचएचएम एक्स्पो आयोजित केला होता.

यामध्ये स्थानिक व बाहेरील शहरांतून आलेल्या धावपटूंना त्यांची रेस किट्स/बीआयबी ताब्यात घेण्यासाठी एक व्यासपीठ पुरवण्यात आले. या उपक्रमाद्वारे सातारा शहरात खुल्या व्यायामशाळा (जिम्स) व स्ट्रीट वर्कआउट स्टेशन्स स्थापन करण्यासाठीही योगदान देण्यात आले आहे. त्याद्वारे तंदुरुस्ती व स्वास्थ्याची संस्कृती जोपासली जाते. नोंदणीच्या कालावधीत उपक्रमाच्या वेबसाइटला ३५,००० हून अधिक जणांनी भेट दिली आणि ६०० हून अधिक सदस्य व स्वयंसेवकांनी या कार्यक्रमासाठी मदत केली.

Post a Comment

0 Comments