भारताला शिक्षित व विकसित बनवण्यात एमआयटी-एडीटीचा मोलाचा हातभार

सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ पद्मभूषण डाॅ. बी. एन. सुरेश यांचे प्रतिपादन

एमआयटी-एडीटीत उत्साहात पार पडला आठवा `इंडक्शन प्रोग्राम`


पुणे : कुठल्याही देशाला विकसित देशांच्या यादीत स्थान प्राप्त करायचे असेल, तर शिक्षण आणि कौशल्याचा प्रसार अत्यंत महत्वाचा आहे, असे खुद्द भारताचे दिवंगत राष्ट्रपती एपीजे अब्दूल कलाम म्हणायचे. एमायटी-एडीटी विद्यापीठ आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षण आणि कौशल्याचे नवनवीन तंत्रज्ञान शिकवून तसेच विद्यार्थ्यांमधील संशोधक वृत्तीला चालना देऊन डाॅ. कलाम यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे महत्कार्य करीत आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ तथा इंडियन इंस्टीट्यूट आॅफ स्पेस साइंस अॅण्ड टेक्नोलाॅजीचे चान्सलर, पद्मभूषण डाॅ. बी. एन. सुरेश केले.

एमआयटी-एडीटी विद्यापीठात नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी सोमवार 7 आॅगस्ट रोजी भव्य इंडक्शन प्रोग्राम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात डाॅ. सुरेश बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माईर्स-एमआयटीचे संस्थापक विश्वधर्मी प्रा. डाॅ. विश्वनाथ दा. कराड हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून आर्मामेंट अॅण्ड काॅम्बॅट इंजीनियरिंग सिस्टीमचे सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ प्रा. डाॅ. शैलेंद्र गाडे,  एमआयटी-एडीटीचे कार्यकारी अध्यक्ष डाॅ. मंगेश कराड, प्रो-व्हाइस चान्सलर डाॅ. अनंत चक्रदेव, मिटकाॅमच्या डायरेक्टर प्रा. डाॅ. सुनीता कराड, रजिस्ट्रार महेश चोपडे, एमआयटी स्कूल आॅफ कम्प्युटिंगचे डीन रामचंद्र पुजेरी, डीन डाॅ. सुदर्शन सानप उपस्थित होते. 

दीपप्रज्वलन व विश्व शांती प्रार्थनेने इंडक्शन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. अनंत चक्रदेव यांनी प्रास्ताविक करताना एमआयटी-एडीटीच्या अनोख्या उपक्रमांसंदर्भात सविस्तर माहिती दिली. 

डाॅ. सुरेश विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देताना म्हणाले की, गेल्या काही वर्षांमध्ये भारताने अवकाश संसोधन आणि अणुऊर्जा क्षेत्रात प्रचंड प्रगती केली आहे. त्याला कारण म्हणजे आमच्या देशातील संशोधकांची मेहनत. आम्ही आज विदेशात अजस्ज्ञ अशी संरक्षण सामग्री निर्यात करीत आहोत. या संशोधन कार्याला आता एमआयटी-एडीटीच्या विद्यार्थ्यांना पुढे न्यायचे आहे. एमआयटी-एडीटीमध्ये भविष्यातील मोठे शास्त्रज्ञ व संशोधक निर्माण होतील आणि ते भारताला जगात आणखी सक्षम बनवतील, असा मला विश्वास आहे.

या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देताना प्रा. डाॅ. विश्वनाथ कराड म्हणाले की, एमआयटी आपल्या विद्यार्थ्यांना बौद्धिक व मानसिकदृष्ट्या उन्नत करण्याचे काम करीतच असते, परंतु त्यासोबतच विद्यार्थ्यांचे आध्यात्मिक उन्नयनदेखील करीत असते. कारण हेच आध्यात्मिक उन्नयन त्यांच्या व्यक्तिमत्वात आदर्शवादाची पायाभरणी करीत असते आणि त्यातून आदर्श नागरिक व आदर्श देश तयार होत असतो. स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातील युवकांना घडवण्यासाठी एमआयटी सुरवातीपासूनच प्रयत्न करीत आलेले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी येथे शिक्षण घेत असताना याची पदोपदी जाण ठेवावी. भारत संपूर्ण जगाला विज्ञान व आध्यात्मिकतेचा संगम घडवून सुख, समाधान व  विश्वशांतीचा संदेश देत आहे. हा संदेश आजच्या भारतीय युवकांनी जगभरात पोहोचवण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. तेच काम एमआयटी देशभरात करीत आहे, असेही ते म्हणाले.

डाॅ. मंगेश कराड म्हणाले की, आमच्या विद्यापीठात येणारा प्रत्येक विद्यार्थी हा एक स्वप्न घेऊन आलेला असतो. त्याच्या स्वप्नांना शिक्षणाचे मजबूत पंख देऊन त्याला प्रगतीच्या आकाशात भरारी घेण्यास एमआयटी-एडीटी सर्वांगाने मार्गदर्शन देत असते. पूर्वी काॅलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वप्न असायचे की, त्याला मल्टीनॅशनल कंपनीत नोकरी मिळावी. परंतु गेल्या काही वर्षांत युवकांच्या महत्वाकांक्षांनी मोठी झेप घेतली आणि आज अनेक मल्टीनॅशनल कंपन्यांचे सीईओ भारतीय तरुण बनले आहेत. हा बदल अत्यंत क्रांतिकारी असून, .या बदलामध्ये एमआयटी-एडीटी नेहमीच युवा विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते. एमआयटी-एडीटी आपल्या विद्यार्थ्यांना केवळ नोकरी मागवणारे बनवण्यापेक्षा नोकरी देणारे बनवण्याचे काम करते. त्यामुळेच एमायटी-एडीटीतून शिकून गेलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी स्वतःचे स्टार्टअप सुरू केले आणि अनेकांना रोजगार देण्याचे काम ते करीत आहेत.

डाॅ. सुदर्शन सानप यांनी उपस्थितांचे आभार प्रकट केले.

------------------

Post a Comment

0 Comments