विद्यापीठात नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांना दिली क्लबच्या कार्याची माहिती
पुणे - एमआयटी-एडीटी विद्यापीठात नव्याने प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या विविध 70 क्लबची माहिती होण्यासाठी भव्य अशा क्लब बाजारचे आयोजन करण्यात आले. या क्लब बाजारला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. सुमारे 3 हजार विद्यार्थ्यांनी क्लब बाजारला उपस्थिती लावून त्याचा लाभ घेतला.
क्लब बाजारचे उद्घाटन एमआयटी स्कूल आॅफ कम्प्यूटिंगचे डायरेक्टर डाॅ. रजनीश कौर सचदेव, प्रा. एच. कुमार व्यास चेअरचे प्रोफेसर धीमंत पांचाळ, प्रा. डाॅ. अतुल पाटील, प्रा. डाॅ. निरजा जैन, प्रा. सुजित धर्मपात्रे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या क्लब बाजारचे संयोजन स्टुडंट अफेयर विभागाचे प्रमुख प्रा. डाॅ. सुराज भोयर यांनी केले.
या प्रसंगी बोलताना डाॅ. रजनीश कौर यांनी सांगितले की, एमआयटी-एडीटी विद्यापीठात प्रवेश घेतलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला उच्च शिक्षण देण्यासोबतच विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांचा विकास करण्यासाठी विविध प्रकारचे क्लब स्थापन करण्यात आलेले आहेत. या क्लबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या अभ्यासाच्या माहितीसह विद्यार्थ्यांच्या विविध कला, कौशल्यांचा विकास साधण्याचा प्रयत्न केला जातो.
एमआयटी-एडीटीचे कार्यकारी अध्यक्ष डाॅ. मंगेश कराड यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना म्हणाले की, एमआयटी-एडीटी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून, विद्यार्थ्यांनी एमआयटीच्या विविध क्लबमध्ये सामिल होण्याचे आवाहन त्यांनी केले.
प्रा. धीमंत पांचाळ म्हणाले की, एनसीसी, एनएसस, क्लाउड कम्प्यूटिंग, आर्टिफिशियल इंटेलिजेन्स, मशीन लर्निंग, सायबर सिक्युरिटी, ब्लाॅकचेन टेक्नोलाॅजी याची माहिती देण्याचे काम हे क्लब करतात. याशिवाय संगीत, नृत्य, शिल्पकला, चित्रकला अशा विविध अंगभूत कलांच्या विकासासाठीदेखील विविध प्रकारचे क्लब या ठिकाणी आहेत. विद्यापीठाच्या विविध महाविद्यालायंमधील वेगवेगळ्या शाखांमध्ये शिकणारे विद्यार्थी आपल्या आवडीप्रमाणे या क्लबमध्ये सामिल होऊन आपला व्यक्तिमत्व विकासदेखील साधत असतात.
प्रा. डाॅ. सुराज भोयर म्हणाले की, एमआयटी-एडीटी विद्यापीठ विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील असते. त्यामुळेच या ठिकाणी जेव्हढ्या उच्च दर्जाचे अभ्यासक्रम शिकवले जातात, तेव्हढ्याच पोटतिडकीने विद्यार्थ्यांच्या बौद्धिक व कलात्मक सर्वांगीण विकासासाठीही प्रयत्न केले जातात. त्याचाच एक भाग म्हणून हे सर्व क्लब काम करीत असतात.
क्लब बाजारला भेट दिल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. या क्लब बाजार उपक्रमासाठी विद्यार्थी अथर्व निंबाळकर आणि पलकेश लढ्ढा यांनी परिश्रम घेतले.
0 Comments