सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार प्रकाशन
पुणे : 'तुम्ही-आम्ही पालक' मासिकाच्या शंभराव्या अंकाचे प्रकाशन व लेखकांच्या सन्मान सोहळ्याचे येत्या शनिवारी (दि. ५ ऑगस्ट २०२३) सकाळी ११.३० वाजता घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक केंद्रात आयोजन करण्यात आले आहे.
राज्याचे वने व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते हा सोहळा होणार असून, यावेळी बीव्हीजी उद्योग समूहाचे संस्थापक हनुमंतराव गायकवाड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षणतज्ञ आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे असणार आहेत, अशी माहिती 'तुम्ही-आम्ही पालक'चे संस्थापक संपादक हरीश बुटले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हरीश बुटले म्हणाले, "केजी टू पीजी शिकणाऱ्या प्रत्येक पाल्याच्या पालकांचे पालकत्व परिपूर्ण व्हावे, यासाठी गेल्या १० वर्षांपासून 'तुम्ही-आम्ही पालक' हा अंक दर्जेदार साहित्य देत आहेत. शंभराव्या अंकाचे प्रकाशन व या प्रवासात मोलाचे योगदान दिलेल्या लेखकांचा सन्मान, डीपर व महाएक्झाम परीक्षेतील राज्यात अव्वल आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा आणि संस्थांचा सन्मान, तसेच साद माणुसकीची फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांचा सन्मान यावेळी मान्यवरांच्या हस्ते केला जाणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे."
पहिल्या अंकाचे उद्घाटन तत्कालीन सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे यांच्या हस्ते झाले होते. आता शंभराव्या अंकाचे प्रकाशन विद्यमान सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होत आहे, याचा आनंद आहे. या मासिकातून शिक्षण व सामाजिक तसेच इतर अनेक क्षेत्रातील दिग्गज अशा लेखकांनी लेखन केलेले आहे.
या मासिकामध्ये अनेक अंकातून वडील व मुलाने आणि पती पत्नीनेही लिहिलेले आहे. पहिले दोन वर्षे सुजाण पालकत्व, त्यांनंतरचे दोन वर्षे शिक्षकाने पालकाच्या भूमिकेत कसे यावे यावर शैक्षणिक पालकत्व, त्यापुढील दोन वर्ष ग्रामविकास, ग्रामीण पालकत्व, व त्यापुढील चार वर्षे समाजाचे पालकत्व अशा विविध विषयांवर आजवर ९९ अंक प्रकाशित झाले आहेत. प्रत्येक अंक एका सामाजिक विषयावर सर्व बाजूने चर्चा करणारा असतो. केवळ एका वर्षाचा अपवाद वगळता संपूर्ण १० वर्षे विनाजाहिरात अंक सुरु आहे. पहिली सात वर्षे रंगीत अंक छापला जात असे. त्यानंतरचे तीन वर्ष कृष्णधवल अंक सुरू आहे, हे या अंकाचे वैशिष्ट्य असल्याचे हरीश बुटले म्हणाले.
या मासिकातर्फे मानाचा 'महापालक' सन्मान सात वर्ष प्रदान करण्यात आला. पहिली पाच वर्ष राज्य पातळीवर आणि त्यानंतरची दोन वर्ष तो राष्ट्रीय सन्मान म्हणून अतिशय नामवंत अशा सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांना प्रदान करण्यात आला. हा सन्मान जुलैच्या चौथ्या रविवारी राष्ट्रीय पालक दिनाच्या दिवशी प्रदान करण्यात येतो. कोरोनाच्या कालखंडात हा सन्मान प्रदान करण्यात आला नाही.
"प्रत्येक अंक हा गुणवत्तेच्या दृष्टीने उत्तम आणि संग्रही प्रसिद्ध झाला असला, तरी वाचन संस्कृतीच्या दिवसेंदिवस होत चाललेल्या ऱ्हासामुळे अंक सुरु ठेवणे जिकिरीचे काम आहे, असे वाटते. अशा स्थितीतही एक तप हा अंक चालविण्यासाठी वचनबद्ध आहोत. यातील कोणतेही लेखक मानधन घेत नाहीत. तसेच मासिकातून कोणताही नफा मिळवला जात नाही.
शिक्षण, सामाजिक आणि ग्रामविकासाच्या दृष्टीने आणि समाज प्रबोधनाच्या उद्देशाने हा अंक चालवला जात आहे. सध्या हे मासिक छापील आणि डिजिटल अशा दोन्ही स्वरुपात उपलब्ध आहे. अनेक नामवंत मासिके बंद पडण्याच्या काळात 'तुम्ही-आम्ही पालक' मासिक शंभरी पूर्ण करत आहे, याचे समाधान वाटते," असे मासिकाचे संपादक हरीश बुटले यांनी नमूद केले.
0 Comments