जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटस्तर्फे १० बाय १५ फूट आकारातील भव्य रंगावली;
लोकमान्य टिळकांच्या १०३ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजन
पुणे : स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करणा-या लोकमान्य टिळकांना रंगावलीतून अभिवादन करण्यात आले.
लोकमान्य टिळकांच्या १०३ व्या पुण्यतिथीच्यानिमित्ताने १०३ दीप प्रज्वलित करुन त्यांच्या कार्याचे स्मरण देखील उपस्थितांनी केले. लोकमान्यांचे रंगावलीतील रेखाचित्र संस्थेतील विद्यार्थ्यांसह सामान्य नागरिकांनी देखील पाहण्याकरिता गर्दी केली.
निमित्त होते, जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटस्, न-हे तर्फे लोकमान्य टिळक यांच्या १०३ व्या पुण्यतिथीनिमित्त साकारलेल्या भव्य रंगावलीचे. टिळकांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू सांगणारी ही रंगावली १० बाय १५ फूट आकारामध्ये साकारण्यात आली.
जाधवर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष अॅड. शार्दुल जाधवर, सुरेखा जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. रंगावलीकार प्रतिक पानसरे यांनी दोन तासांमध्ये ही रंगावली साकारली.
अॅड.शार्दुल जाधवर म्हणाले, शिवजयंती आणि गणेशोत्सवातून समाजाला एकत्र करण्याचे काम लोकमान्य टिळकांनी केले. त्यातून स्वातंत्र्याचा लढा उभारता येतो, अशी प्रेरणा सामान्यांना दिली. त्यामुळे रंगावलीच्या माध्यमातून आणि १०३ दीप प्रज्वलित करुन त्यांना मानवंदना देण्यात आली.
0 Comments