महिला सक्षमीकरणासाठी SSPUआणि PCMC मध्ये सामंजस्य करार

सिंबायोसिसतर्फे इंडस्ट्री ४. ० वर आधारित नव्या पदविका अभ्यासक्रमाची रचना



पुणे :  उत्पादन क्षेत्रात युवतींचा सहभाग वाढावा या उद्देशाने  सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (एसएसपीयु) किवळे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्यामध्ये नुकताच  सामंजस्य करार  करण्यात आला आहे.

याप्रसंगी सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या प्र- कुलपती  डॉ. स्वाती मुजुमदार, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्री. शेखर सिंह,पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री. प्रदीप जांभळे पाटील, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उपायुक्त श्री. अजय चारठणकर, सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या प्रभारी कुलगुरू डॉ. गौरी शिऊरकर आणि सिंबायोसिस कंसल्टंसी सर्व्हिसेसचे संचालक श्रवण कडवेकर उपस्थित होते.

कौशल्य शिक्षणाला प्राधान्य देत महिलांना कौशल्य शिक्षण देऊन स्वावलंबी बनविणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. या कराराअंतर्गत  समाजातील गरजू  महिलांना  कौशल्य प्रशिक्षण देण्यात येईल. तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका ह्या उपक्रमासाठी समाजातील वंचित घटकातील गरजू ५५ मुलींच्या   प्रशिक्षणासाठी योगदान देणार आहे.

ह्या अनोख्या उपक्रमाअंतर्गत  सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीने मॅन्युफॅकचारिंग एक्सलेन्स आणि ऑटोमेशनमधील अभ्यासक्रम बनविला आहे. ह्या अभ्यासक्रमाचे संपूर्ण प्रशिक्षण युवतींना पदविका प्रदान केली जाते. यामार्फ़त महिलांना   मॅन्युफॅक्चरिंग, इंजिनीअरिंग, ऑटोमोबाईल, ऑटोकॉम्प यांसारख्या नानाविध क्षेत्रामध्ये रोजगार उपलब्ध होण्यास मदत होते.

सदरील प्रशिक्षण हे निवासी असून याचा कालावधी २ वर्षांचा आहे. हे प्रशिक्षण लेखी आणि प्रात्यक्षिक स्वरूपात असून युवतींना विद्यापीठात  आणि प्रत्येक सत्रात कारखान्यांमध्ये प्रत्यक्ष मशीनवर मार्दर्शन करण्यात येते. आजवर सिंबायोसिस कौशल्य विद्यापीठातर्फे १०० हून अधिक युवतींना कौशल्य प्रशिक्षण दिले आहे.  तसेच  देशभरातील विविध कंपन्यांमध्ये नोकरीसाठी मार्गदर्शन तसेच  १०० टक्के नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या आहेत.

सदरील  कौशल्य प्रशिक्षणाच्या अभ्यासक्रमाची रचना ही  पूर्णतः इंडस्ट्री ४. ० वर आधारित करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सिंबायोसिस कौशल्य विद्यापीठ हे विविध  मोफत कौशल्य प्रशिक्षणाचे वर्ग चालवत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या प्र- कुलपती  डॉ. स्वाती मुजुमदार म्हणाल्या की महिला सक्षमीकरण हे साक्षरतेचे पहिले पाऊल आहे.हा उपक्रम शैक्षणिक क्षेत्रामध्ये नक्कीच एक नवीन क्रांती घडवून आणेल. सिंबायोसिस नेहमीच नाविन्यपूर्ण शिक्षणपद्धतीचा अवलंब करते अशा कौशल्य प्रशिक्षणाद्वारे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढीस लागून त्या रोजगारक्षम बनतात. यामार्फत उद्योगांना देखील कुशल मनुष्यबळ मिळण्यास मदत होत आहे.

पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह म्हणाले की,सिंबायोसिस स्किल्स अँड युनिव्हर्सिटीतर्फे राबवण्यात येत असलेले  विविध कौशल्य प्रशिक्षणाचे उपक्रम हे अत्यंत कौतुकास्पद  आहे. सिंबायोसिस बरोबर आम्ही या आधीही उपक्रम राबविला होता आणि मला खात्री आहे ह्या उपक्रमाला देखील चांगला प्रतिसाद मिळेल. या उपक्रमाअंतर्गत शिकण्याची जिद्द, आकांक्षा बाळगणाऱ्या महिला  ह्या  कुशल बनतील आणि त्यातून त्या सक्षम बनतील.   

मागील ४ वर्षांपासून सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीतर्फे मोफत कौशल्य प्रशिक्षणाचे उपक्रम राबविण्यात येत आहेत. समाजातील सर्व स्तरातील घटकांपर्यंत कौशल्य अभ्यासक्रम पोहचविण्याच्या उद्दिष्टांसाठी आणि कौशल्य शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी एसएसपीयु  कार्यरत आहे.

Post a Comment

0 Comments