कंपनीचे डायरेक्टर संजय वारके यांची पत्रकार परिषदेत माहिती
आपल्या सामाजिक उत्तरदायित्वाचे भान ठेवून मूकबधिरांसाठी कंपनीचा अनोखा प्रयोग
पुणे : देशातल्या पेट्रोलियम कंपन्यांमध्ये अग्रणी असलेल्या शेल इंडियाने मूकबधिर लोकांसाठी अनोखा पुढाकार घेतला आहे. कंपनीच्या वतीने पुण्यातील सेनापती बापट रोडवर असलेल्या पेट्रोल पंपावर मूकबधिर कर्मचाऱ्यांची भर्ती केली आहे. मूकबधिरांच्या सामाजिक विकासासाठी आम्ही हा पुढाकरा घेतला आहे, अशी माहिती शेल इंडिया कंपनीचे डायरेक्टर संजय वारके यांनी दिली.
या उपक्रमासंदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत संजय वारके बोलत होते. या वेळी या पेट्रोल पंपावर कार्यरत मूकबधिर कर्मचारीदेखील उपस्थित होते. या वेळी बोलताना वारके म्हणाले की, समाजातील मूकबधिर लोक हे समाजाचा हिस्सा आहेत. त्यांच्यातही बुद्धिमत्ता आणि प्रतिभा असते. त्यामुळे त्यांच्यातील या व्यंगामुळे ते मागे राहू नयेत, हा आमचा मुख्य उद्देश्य आहे. त्यामुळे आम्ही आमच्या या पेट्रोल पंपावर मूकबधिरांना कर्मचारी म्हणून ठेवण्याचा निर्णय घेतला. हे सर्व कर्मचारी अत्यंत प्रामाणिकपणे या ठिकाणी नोकरी करून कंपनीच्या विकासाला हातभार लावत आहेत.
वारके पुढे म्हणाले की, या उपक्रमासाठी आम्हाला काही सामाजिक संघटनांचे मोलाचे सहकार्य लाभले. आमच्या या निर्णयाचे समाजाकडून मोठ्या प्रमाणात स्वागत होत आहे. येथे पेट्रोल-डीझेल भरण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांकडूनही आमच्या कार्याचे कौतुक होत आहे. सोबतच या मूकबधिर कर्मचाऱ्यांना एक रोजगाराचे मुख्य साधन प्राप्त झाले आहे. या ठिकाणी काम करणाऱ्या सर्व मूकबधिर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी आम्ही घेतो आहोत, तसेच त्यांना यासंदर्भातील पूर्ण प्रशिक्षण दिलेले आहे.
यापुढील काळात शेल कंपनीच्या विविध ठिकाणच्या पेट्रोल पंपांवर हाच प्रयोग करण्याचा आमचा मानस आहे. या उपक्रमात समाजानेही आम्हाला योग्य ते सहकार्य करावे, तसेच आमचा या उपक्रमाचे इतर कंपन्यांनीही अनुकरण करावे व मूकबधिरांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून रोजगारसंपन्न बनवावे, असे आवाहन वारके यांनी केले.
या वेळी पेट्रोल पंपाव काम करणारा मूकबधिर असलेला कस्टमर सर्व्हिस चॅम्पीयन विजय अलगडे याने आपल्या अनोख्या भाषेत सांगितले की, तो आधी फोटोग्राफीचा व्यवसाय करायचा. परंतु तेथे त्याचे मन रमले नाही. परंतु त्याला आता शेल कंपनीच्या पेट्रोल पंपावर काम करण्यात खूप आनंद होत आहे. या ठिकाणी विविध लोकांशी दररोज संपर्क येतो आणि लोक खूप सहकार्य करतात, असे त्याने सांगितले. भविष्यात मी आणखीही मूकबधिर लोकांना या कामात आणून त्यांना रोजगार देण्याचा प्रयत्न करेन, अशी प्रतिक्रिया विजय याने दिली.
0 Comments