लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात १२६ वा गुरुपौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा

प्रविण मसाले चे चेअरमन राजकुमार चोरडिया यांच्या हस्ते माध्यान्ह आरती        


पुणे : दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा... गुरुदेव दत्त... च्या जयघोषाने बुधवार पेठेतील श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिराच्या परिसर दुमदुमून गेला. दत्तमंदिर ट्रस्टच्या १२६ व्या वर्षी गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्ताने मंदिरात व मंदिर परिसरात विविधरंगी फुलांची आकर्षक आरास व नयनरम्य विद्युतरोषणाई करण्यात आली होती. सकाळपासून भाविकांनी दर्शनाकरिता मंदिरात मोठया प्रमाणात गर्दी केली होती.

गुरुपौर्णिमेची माध्यान्ह आरती प्रविण मसाले चे चेअरमन राजकुमार चोरडिया व कुटुंबियांच्या हस्ते झाली. याप्रसंगी श्री बालाजी सोसायटी व अभिमत विद्यापीठाचे बालसुब्रमन्यम परनधामन व त्यांच्या पत्नी चेंदूरवर्धिनी उपस्थित होत्या. तसेच दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष युवराज गाडवे, कार्यकारी विश्वस्त डॉ.पराग काळकर, खजिनदार अ‍ॅड.रजनी उकरंडे, उत्सवप्रमुख अक्षय हलवाई,

उत्सव उप प्रमुख सुनिल रुकारी, विश्वस्त अ‍ॅड.प्रताप परदेशी, महेंद्र पिसाळ, अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार, राजू बलकवडे आदी उपस्थित होते. संपूर्ण मंदिरावर देखील आकर्षक पुष्परचना करण्यात आली होती. त्यामध्ये गुरु-शिष्याचे चित्र फुलांमध्ये साकारण्यात आले. कळसापर्यंत करण्यात आलेली फुलांची आरास भाविकांचे लक्ष वेधून घेत होती.  


सोमवारी पहाटे ६.३० वाजता ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त डॉ.पराग व अंजली काळकर यांच्या हस्ते लघुरुद्र झाला. त्यानंतर प्रथमेश व मीनल गाडवे यांच्या हस्ते श्री दत्तयाग संपन्न झाला. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी सपत्नीक दर्शन घेऊन आरती केली.

तर सकाळी आमदार रवींद्र धंगेकर व प्रतिभा धंगेकर यांच्या हस्ते प्रात:आरती पार पडली. संपूर्ण दिवसभर मंदिरासमोरील उत्सव मंडपात भाविकांनी स्वहस्ते अभिषेकाचा देखील लाभ घेतला. सायंकाळी डॉ.अनघा राजवाडे यांचा गुरु साक्षात परब्रह्म हा गायन सेवेचा कार्यक्रम देखील झाला.


 उत्सवात आयोजिलेल्या कीर्तन महोत्सवात ह.भ.प. रामनाथ अय्यर, मानसी बडवे, रेशीम खेडकर, नम्रता निमकर, शेखर व्यास, वासुदेव बुरसे, विश्वास कुलकर्णी, हर्षद जोगळेकर या दिग्गज कीर्तनकारांचे कीर्तन झाले. त्यांना हार्मोनियमवर कौस्तुभ परांजपे, चिंतामणी निमकर आणि तबल्यावर सोहम जोशी यांनी साथसंगत केली. गुरु-शिष्य परंपरेची संकल्पना घेऊन विविध सांप्रदायातील गुरु-शिष्यांच्या आख्यानांवर कीर्तन झाले.

सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये लुई ब्रेल अंध अपंग संस्थेचा कार्यक्रम, हटके म्युझिकल ग्रुपतर्फे गीतरामायण आणि आरव पुणे निर्मित नाम रंगी रंगुनी हा कार्यक्रम झाला. तसेच दररोज सकाळी मंदिरामध्ये श्री गुरुचरित्र पारायण, उत्सव मंडपात दुपारच्या वेळेत विविध भजनी मंडळांतर्फे भजनाचे कार्यक्रम आणि रात्री सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. ओम ब्लड बँकेच्या सहयोगाने रक्तदान शिबीराचे आयोजन देखील करण्यात आले होते.

Post a Comment

0 Comments