श्रीमद् गणेश गीता - प्रथम अध्याय निरुपण सोहळ्याचा श्रीगणेशा
पुणे : अस्तित्व हा आपल्या प्रत्येकाचा स्वभाव आहे. आनंद ही आपली स्वाभाविक प्रवृत्ती आहे. मात्र, आज आपण ती गमावून बसलो आहोत. दु:ख ही माणसाच्या जीवनात येणारी गोष्ट आहे, हे त्रिवार सत्य आहे. परंतु भगवंताच्या कृपेने दु:ख ही मानवी जीवनातील टिकाऊ गोष्ट नाही, असे विद्यावाचस्पती स्वानंद पुंड शास्त्री यांनी सांगितले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे श्रीमद् गणेश गीता प्रथम अध्याय निरुपण सोहळ्याचे आयोजन बाजीराव रस्त्यावरील नू.म.वि.प्रशालेमध्ये करण्यात आले आहे. दिनांक २० मे पर्यंत दररोज सायंकाळी ६.३० ते ८ यावेळेत हा निरूपण कार्यक्रम होणार असून सर्वांना विनामूल्य प्रवेश आहे.
स्वानंद पुंड शास्त्री म्हणाले, जगातील कितीही मोठे दु:ख असले, तरी ते काहीच दिवस टिकते. जीवनात आपण नेहमी हसत राहू शकतो कारण हास्याला भगवंताचे अनुष्ठान आहे. जगातील सर्व प्राण्यांना रडता येते. मात्र, मनुष्य हा एकमेव प्राणी आहे, ज्याला हसता येते. आपण मनुष्य आहोत, हे सिद्ध करण्याकरिता तरी किमान आपण हसत राहिले पाहिजे. जीवन हास्य, आनंदाचे आहे. मोरया आनंदरूपी आहे, त्यामुळे आपण मोरयाचे भक्त असलात, तर आपण आनंदी असलोच पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण म्हणाले, श्रीमद् भगवद््गीतेमध्ये १८ अध्याय ७०० श्लोक आहेत. त्यावर माऊली ज्ञानदेवांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी ९०३३ ओव्यांची आहे. तर, श्री गणेश गीतेमध्ये ११ अध्याय, केवळ ४१३ श्लोक आहेत. त्यावर भगवान गणेश योगींद्राचार्य महाराजांनी लिहिलेली योगेश्वरी टीका आहे ती तब्बल १००३१ ओव्यांची. यातून आपल्याला गणेश गीतेच्या अपार गूढार्थ पूर्णतेचा अंदाज येऊ शकेल. त्यामुळे श्रीमद् गणेश गीतेच्या निरुपण सोहळ्याला सर्वांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.
0 Comments