पुणे : "आपल्या मुलांचे अपराध पोटात घेणारी, संकटाच्या वेळी त्यांना साथ देत कुशीत घेणारी आणि त्यांच्या प्रगतीसाठी झटणारी आई साक्षात परमेश्वराचे दुसरे रूप असते. 'आई' या दोन अक्षरी शब्दात प्रेम, वात्सल्य असे अनेक भाव दडले आहेत. मुलांना घडवणारी ती संस्काराची शाळा आहे," अशी भावना सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या उपाध्यक्षा व सचिव आणि संस्थेचा मातृचेहरा असलेल्या सुषमा चोरडिया यांनी व्यक्त केल्या.
सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्युट्सचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या संकल्पनेतून संस्थेच्या बावधन कॅम्पसमधील बन्सीरत्न सभागृहात अनोख्या पद्धतीने ‘मदर्स डे’ निमित्त मातृ सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी 'सूर्यदत्त'च्या सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, मुख्य विकास अधिकारी सिद्धांत चोरडिया, अक्षित कुशल, प्रशांत पितालिया, मनीषा कुंभार आदी उपस्थित होते.
आईबद्दल केवळ मातृदिनी भरभरून न बोलता तिचा सन्मान रोज व्हायला हवा, अशी अपेक्षाही सुषमा चोरडिया यांनी व्यक्त केली. विद्यार्थी व प्राध्यापक यांनी उस्फूर्तपणे सहभाग घेत 'आई' या विषयावर विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. 'आई'वरील कविता व गाण्यांना उपस्थितांनी दाद दिली. मातृदिनानिमित्त विशेष नृत्याचेही आयोजन केले होते. कार्यक्रमाचे संयोजन किरण राव, वंदना पांडे यांनी केले. सायली देशपांडे यांनी आभार मानले.
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, "कारुण्य, प्रेम, वात्सल्य, माया जिथे-जिथे आहे, तिथे आईचे अस्तित्व असते म्हणूनच ‘आई’ ही संकल्पना केवळ स्त्रीत्वाशी निगडित नाही. आई असणे ही एक भावना आहे, त्यासाठी बाई असलेच पाहिजे असे नाही.
विश्वासाठी पसायदान मागणारे ज्ञानेश्वर, असंख्य विद्यार्थ्यांना मातृत्वाने वाढवणारे कर्मवीर भाऊराव पाटील हेही अनेकांसाठी आईच असते. सर्वसामान्य माणसांच्या माता अनेक प्रकारचे त्याग करून आपल्या मुलांना वाढवत असतात म्हणून त्याही वंदनीय आहेत. अशा आईला वंदन करण्याचा संस्कार सूर्यदत्त संस्थेने नेहमीच दिला आहे."
0 Comments