महाराष्ट राज्य पर्यटन महामंडळ, विवेक व्यासपीठ आणि संस्कार भारती, पुणे महानगर
यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन; १२ तासांत २५ कलाकारांनी साकारल्या रांगोळ्या
पुणे : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी भारतमातेप्रती केलेले जीवन समर्पण...स्वातंत्र्यलढयातील सक्रिय सहभागापासून समाजसुधारणेपर्यंत केलेले अतुलनीय कार्य आणि ब्रिटीशांविरुद्ध लढा देत समाज जागृतीसह युवा क्रांतिकारी घडविण्याकरिता घेतलेला पुढाकार असे विविध पैलू असलेल्या सावरकरांच्या जीवनातील क्रांतिपर्वाचे दर्शन रंगावलीतून पुणेकरांना घडले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरतीपासून ते वंचितांसोबत केलेल्या स्नेहभोजनाच्या घटनांना रंगावलीतून चितारलेला रेखीव आढावा यानिमित्ताने घेण्यात आला.
महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळ, विवेक व्यासपीठ आणि संस्कार भारती, पुणे महानगर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्यवीर सावरकर वीरभूमी परिक्रमा सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत शास्त्री रस्त्यावरील धर्मवीर संभाजी विद्यालयाच्या सभागृहात 'सावरकर जीवनदर्शन रांगोळी' प्रदर्शन भरविण्यात आले.
प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ रंगावलीकार जगदीश चव्हाण व धीरज घाटे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रदर्शन संयोजक सविता गोटूरकर, ज्ञानेश्वर सोमलवार, नरेश डोंगरे, माधुरी देशपांडे, मीनल आंबेकर आदी उपस्थित होते.
सावरकरांचे भारतमातेप्रती असलेले प्रेम व्यक्त करणारी भव्य रंगावली सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. यासोबतच त्यांनी केलेली विदेशी कपडयांची होळी, अभिनव भारत संघटनेच्या माध्यमातून केलेले देशकार्य, १८५७ चे स्वातंत्र्यसमर सारख्या विविध ग्रंथांचे लेखन, पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात केलेली शिवरायांची आरती,
मदनलाल धिंग्रा व अनंत कान्हेरे यांना सावरकरांकडून मिळालेली प्रेरणा, अंदमान मधील शिक्षा भोगत असताना घडलेले कटू प्रसंग, वंचितांसोबत केलेले स्नेहभोजन, हळदी-कुंकू समारंभ अशा अनेक घटना रंगावलीतून साकारण्यात आल्या.
अश्विनी जमदाडे (वाई), गौरी कळसैत (निरा), शितल कोरडे (तरडगाव), विश्वास सोनावणे (वाई), योगेश हेदाऊ (नागपूर), लीना बावीस्कर, आर्या आंबेकर, मीनल आंबेकर, आदिती आमराळे यांच्यासह २५ कलाकारांनी रंगावल्या साकारल्या.
रविवार, दिनांक २८ मे पर्यंत शास्त्री रस्त्यावरील धर्मवीर संभाजी विद्यालयाच्या सभागृहात सकाळी १० ते सायंकाळी ७ यावेळेत रांगोळी प्रदर्शन विनामूल्य पाहता येणार आहे. तरी पुणेकरांनी मोठया संख्येने भेट द्यावी, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
0 Comments