पुण्यात पार पडला अनोखा व्रतबंध सोहळा; विविध समाजाच्या २७ मुले व ५ मुलींवर व्रतबंध संस्कार

स्वानंद चॅरिटेबल ट्रस्टच्या 'मी सावरकर' उपक्रमांतर्गत संपन्न झाला हिंदू धर्मातील

विविध समजाच्या मुला-मुलींचा व्रतबंध सोहळा 


पुणे : मंगल वाद्यांचे सूर, सजवलेले सभागृह, 'बट्वाचार्य शुभं भवतु' असे आशीर्वचन देताना भारावलेले पालक आणि आनंदित बटुंचा चमू, असे अनोखे दृश्य रविवारी सकाळी कर्वे रस्त्यावरील अश्वमेध मंगल कार्यालयात उपस्थित असणाऱ्यांनी अनुभवले. निमित्त होते, स्वानंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित सकल हिंदू सामुदायिक व्रतबंध कार्यक्रमाचे.

स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून ट्रस्टच्या 'मी सावरकर' उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेला हा सामुदायिक व्रतबंध संस्कार सोहळा मंगलमय वातावरणात संपन्न झाला. उपक्रमाचे हे सलग दुसरे वर्ष आहे.

यावेळी पद्मश्री गिरीश प्रभुणे, इंदोर येथील श्रीपाद अवधूत स्वामी, अभिनेते शरद पोंक्षे, डॉ पराग काळकर, डॉ. नितीन करमाळकर, योगीराज व अप्पासाहेब खिलारे पाटील, स्वानंद चॅरिटेबल ट्रस्टचे प्रतिनिधी रवींद्र ढवळीकर, सीए धनंजय बर्वे, सीए रणजीत नातू, प्रवीण गोखले, शैलेश काळकर, अमेय कुंटे आदी मान्यवर उपस्थित होते.

उपक्रमाविषयी बोलताना सीए रणजीत नातू म्हणाले, "हिंदू संकृतीमधील १६ संस्कारांपैकी महत्वाचा मानला जाणारा व्रतबंध हा संस्कार काही विशिष्ट समाजामध्ये केला जातो. परंतु स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सामाजिक समानतेचा पुरस्कार करून काही सामाजिक सुधारणा घडवून आणण्यास सुरुवात केली. 

यातूनच प्रेरणा घेत स्वानंद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सदर संस्कार हिंदू धर्मियांमधील सर्व समाजातील मुला - मुलींसाठी करण्यास गेल्या वर्षी पासून सुरुवात करण्यात आली. या वर्षी २७ मुले व ५ मुलींचा व्रतबंध संस्कार करण्यात आला. यात हिंदू धर्मातील मराठा, माळी, कुणबी, धनगर, मेहतर, पारधी, मातंग, ब्राह्मण आदी समाजातील मुले व मुली यांचा व्रतबंध संस्कार करण्यात आला. गेल्या वर्षी ही संख्या २१ होती."

सुमारे ६ ते १२ या वयोगटातील या बटुंचा व्रतबंध संस्कार करण्यासाठी महेश पांडे गुरुजी आणि त्यांचे १० सहायक गुरुजी उपस्थित होते. बटुंचे मातापित्या सह आगमन झाल्यावर गणेश पूजन, पुण्याहवाचन करून चौल संस्कार (केस कापण्याचा विधी) करण्यात आला.

मग परंपरेनुसार मातृभोजन झाले. त्यानंतर पितृवंदन करून सर्व बटूंना गायत्री मंत्राचा संस्कार सुपूर्द करण्यात आला. बटूंना दर्भाचा मेखला, दंड देण्यात आला. उपदेश नियमावली सांगितल्यावर भोजन समारंभ पार पडला. अखेरीस सर्व बटुंची सहकुटुंब भिक्षावळ मिरवणूक अमृतेश्वर मंदिरापर्यंत काढण्यात आली. व्रतबंध संस्कार उपक्रमात सहभागी झालेल्या पालकांनी 'स्वानंद चॅरिटेबल ट्रस्ट 'च्या या कार्याचे कौतुक केले.

Post a Comment

0 Comments