सिंबायोसिस ओपन एज्युकेशन सोसायटीचा १६वा स्थापना दिवस उत्साहात संपन्न


पुणे : शैक्षणिक क्षेत्रातील अग्रेसर असलेले  सिंबायोसिस ओपन एज्युकेशन सोसायटीचा (एसओइएस)  चा १६वा स्थापना दिवस नुकताच किवळे येथील सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या (एसएसपीयु) सभागृहात पार पडला.

एसओइएस संचालित महाराष्ट्रातील पहिले कौशल्याधारित विद्यापीठ असलेल्या सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचा ७वा वर्धापनदिनसुद्धा या वेळी उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंग हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच सिंबायोसिसचे संस्थापक अध्यक्ष  डॉ. एस. बी . मुजुमदार हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

यावेळी सिंबायोसिस ओपन एज्युकेशनच्या प्रधान संचालिका डॉ. स्वाती मुजुमदार, सिंबायोसिस ओपन एज्युकेशन सोसायटीच्या मॅनेजिंग ट्रस्टी संजीवनी मुजुमदार ,सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या प्रभारी कुलगुरू डॉ . गौरी शिऊरकर यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.या कार्यक्रमाची सुरुवात विद्यपीठातील अशोक स्तंभाचे उदघाटन करून झाली.

यानंतर एसएसपीयुमधील स्कूल ऑफ आर्किटेक्टरचे विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी केलेल्या जी २० च्या 'वसुधैव कुटुंबकं' या संकल्पनेवर आधारित इंदोर येथे केलेल्या शिल्पांचे लघु प्रात्यक्षिके ( मॉडेल्स)  प्रदर्शित करण्यात आली.   स्थापना दिवस आणि वर्धापनदिनाच्या निम्मिताने विविध कार्यक्रमांचा समावेश करण्यात आला होता.याप्रसंगी एसओइएसमध्ये प्रदीर्घकाळ योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. त्याचप्रमाणे एसओइएसच्या कर्मचाऱ्यांनी विविध कलागुणात्मक कार्यक्रम सादर करत या कार्यक्रमाची शोभा वाढवली.


सिंबायोसिसचे संस्थापक अध्यक्ष  डॉ. एस. बी . मुजुमदार आपल्या संभाषणात म्हणाले की बेरोजगारी ही भारतासाठी अतिशय गंभीर  समस्या आहे. बेरोजगारी कमी करण्यास कौशल्यपूर्ण शिक्षणपद्धत तसेच उद्योग आणि विद्यापीठांनी एकत्रित  येऊन विद्यार्थ्यांच्या उज्जवल भविष्यासाठी  काम करणे ही काळाची गरज आहे. एसएसपीयु हे कौशल्य अभ्यासक्रम उपलब्ध करून देणारे अशा प्रकारचे  पहिलेच  विद्यापीठ आहे जे कौशल्याधारित शिक्षण पद्धतीचा अवलंब करत आत्मनिर्भर भारतास प्रोत्साहित करते.    

सिंबायोसिस ओपन एज्युकेशनच्या प्रधान  संचालिका आणि एसएसपीयुच्या प्र-कुलपती डॉ. स्वाती मुजुमदार म्हणाल्या की सिंबायोसिस नेहमीच नाविन्यपूर्ण शिक्षणपद्धतीचा अवलंब करते.एसएसपीयु हे  विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण अभ्यासक्रम शिकवते. लवकरच विद्यापीठात नवीन  इन्क्युबेशन सेंटरची स्थापना करण्यात येत आहे. यातून विद्यार्थ्यांच्या विचारांना, संकल्पनांना, स्टार्टअप्सला आम्ही  प्रोत्साहन देऊ. 

या कार्यक्रमाप्रसंगी पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्री.शेखर सिंग यांनी शिक्षण क्षेत्रात आधुनिक प्रयोग असलेल्या एसएसपीयुचे कौतुक करत म्हणाले की, सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेअंतर्गत राबवण्यात आलेल्या 'उमेद जागर' या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळाला असून ही अत्यंत आशादायी बाब आहे.  भविष्यात येणाऱ्या अशा विविध उपक्रमासांसाठी आम्ही इच्छुक आहोत.

Post a Comment

0 Comments