क्रीप्टो करन्सीचा वाद पोचला विकोपाला
पुणे : आभासी चलन अर्थात क्रीप्टो करन्सीच्या गुंतवणुकीतून इच्छित परतावा न मिळाल्याने एका तरुणाचे स्थानिक जंगली महाराज रस्ता परिसरातून अपहरण करण्यात आले. या प्रकरणी आता डेक्कन पोलिसांनी अपहरण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
यासंदर्भात पोलिसांनी अजिंक्य प्रताप कदम, वैभव भारत कदम, श्रेयस कदम, राहुल निंबाळकर, मनोज भगत, अभिमन्यू घनवट (सर्व रा. फलटण, जिल्हा सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या अपहरण प्रकरणी समीर दस्तगीर काझी (वय ४०, रा. श्रीनाथ सोसायटी, थेरगाव, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाबाबत पोलिसांनी सांगितले की, संशयित आरोपींनी जर्मनी स्थित `प्लॅटीन वर्ल्ड` या कंपनीच्या क्रीप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केली होती. कंपनीतर्फे सांगितल्याप्रमाणे संगणकीय प्रणालीद्वारे महिन्याचा परतावा आभासी चलनात जमा होत होता.
दरम्यान, कंपनीच्या प्रणालीत काही तांत्रिक बिघाड झाल्याने आभासी चलन भारतीय चलनात रुपांतरित होण्यास वेळ लागत होता. त्यामुळे आरोपींचा काझी यांच्याशी जोरदार वाद झाला. आरोपींनी जंगली महाराज रस्त्यावरील एका हॉटेलमधून काझी यांचे अपहरण केले. त्यानंतर त्यांना फलटण येथे एका लॉजमध्ये डांबून ठेवले ६५ लाख रुपयांची मागणी केली.
आरोपींनी आपल्या पैशांच्या वसुलीसाठी मला धमकावून जमिनीचे खरेदीखतदेखील करून घेतले, असे काझी यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीनंतर डेक्कन पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.
दरम्यान, या घटनेमुळे पुन्हा एकदा आभासी चलनाचा वाढता व्यवसाय आणि त्यातून उद्भवणाऱ्या समस्या याचे हे एक जीवंत उदाहरण आहे. आभासी चलनात पैसा गुंतवणूक करताना लोकांनी खूप सावधगिरी बाळगावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
0 Comments