वैद्यकीय ज्ञान सतत अद्ययावत झाले पाहिजे : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हंकारे

भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल येथे शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन


पुणे :  वैद्यकीय संशोधनात सतत नवनवीन बदल होत असतात. हे अद्ययावत ज्ञान डॉक्टरांनी घेत राहिले पाहिजे. असे मत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे यांनी व्यक्त केले. 

भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल येथे जिल्हा परिषद पुणे, पुणे व पिंप्री चिंचवड महानगरपालिका सेवेतील सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी कार्यशाळेचे (सीएमई) आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी ते बोलत होते.

 यावेळी पुणे महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, पिंप्री चिंचवडचे डॉ. पवन साळवे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. नागनाथ यमपल्ले, भारती विद्यापीठ आरोग्य विज्ञान विभागाच्या संचालिका डॉ. अस्मिता जगताप, भारती मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. मंदार करमरकर, भारती हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्टर डॉ. संजय ललवाणी हे उपस्थित होते. 

डॉ. अस्मिता जगताप म्हणाल्या प्रत्येक दिवशी नवीन काहीतरी शिकले पाहिजे. अशा कार्यशाळा वैद्यकीय ज्ञान अद्ययावत ठेवण्यासाठी महत्वपूर्ण ठरतात.

डॉ. पवार म्हणाले मेडिकल कॉलेज व सरकारी वैद्यकीय यंत्रणा यांच्या एकत्रित सहभागातून नागरिकांना चांगल्या आरोग्य सेवा देणे शक्य होईल. अशा प्रकारचे उपक्रम हा सहभाग वाढवण्यास मदत करतील. 

शासकीय वैद्यकीय अधिकारी हे सार्वजनिक आरोग्य सेवेचा कणा आहेत. वैद्यकीय ज्ञान अद्ययावत राहावे त्याचा फायदा समाजाला व्हावा हा हेतू ठेवून ही कार्यशाळा आयोजित केलेली होती. यावेळी तज्ञ डॉक्टरांनी विविध विषयावर मार्गदर्शन केले. या  कार्यशाळेसाठी पुणे जिल्ह्यातून १८० डॉक्टरांनी सहभाग नोंदवला.

Post a Comment

0 Comments