अनोख्या, अद्वितीय रुपात सादर होणार ‘वाल्मिकी रामायण’

वेदिक कॉसमॉस प्रकाशन संस्थेने तयार केलेल्या या रामायणात मूळ संस्कृत 

श्लोकांसोबतच असेल हिंदी व इंग्रजी भाषांतर


पुणे : भारतीय परंपरेत अतिशय महत्वाचे स्थान असलेले ‘वाल्मिकी रामायण’ हे आतापर्यंत पुस्तक, गाणी, दृकश्राव्य, टीव्ही मालिका, नाटक, चित्रपट, अॅनिमेशन अशा विविध रुपात आपल्या समोर आले आहे. परंतु आता प्रथमच हे 'वाल्मिकी रामायण' एका अनोख्या पुस्तक संचाच्या रुपात आपल्यासमोर येत आहे.

एकूण दहा पुस्तकांचा संच असलेल्या या ग्रंथाच्या निर्मितीसाठी पर्यावरणपूरक आणि उच्च प्रतीच्या साधनांचा वापर करण्यात आला आहे. त्याचबरोबर पुस्तक संचासाठी डिझाईन करण्यात आलेला विशेष लाकडी बॉक्स, रामायणातील महत्वाच्या प्रसंगावर आधारित २०० हून अधिक उत्कृष्ट चित्रे आणि मौल्यवान स्वरोस्की क्रिस्टल्सची सजावट ही या ग्रंथाची काही महत्वाची वैशिष्ट्ये असल्याची माहिती वेदिक कॉसमॉस प्रकाशन संस्थेचे हेमंत शेठ यांनी आज पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. 

यावेळी वेदिक कॉसमॉस प्रकाशन संस्थेच्या भारती झव्हेरी आणि व्हीनस ट्रेडर्सचे सुरेंद्र करमचंदानी उपस्थित होते. महत्वाचे म्हणजे या अनोख्या रामायणाची किंमत भारतात तब्बल १.६५ लाख रुपये इतकी असून परदेशात ती २,५०० अमेरिकी डॉलर्स इतकी असणार आहे. पिढ्यान्पिढ्या जतन करता येण्या योग्य अशी ही वाल्मिकी रामायणाची अद्वितीय कलाकृती आहे, असे शेठ यांनी आवर्जून नमूद केले.

या विशेष रुपात सादर होणाऱ्या रामायणाचे प्रकाशन भारतात पहिल्यांदाच पुणे शहरात होणार आहे. सदर प्रकाशन समारंभ शुक्रवार दि. २१ एप्रिल रोजी सायं ५ वाजता कोथरूड येथील एमआयटी विश्वशांती विद्यापीठाच्या संत ज्ञानेश्वर सभागृह येथे संपन्न होईल.

श्री रामजन्मभूमी न्यासाचे खजिनदार स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या हस्ते आणि एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत या अनोख्या रामायणाचे प्रकाशन होईल. पुण्यातील व्हिनस ट्रेडर्सच्या सर्व शाखांमध्ये यापुढे हा ग्रंथ उपलब्ध असेल.      

या पुस्तकसंचाबाबत बोलताना वेदिक कॉसमॉस प्रकाशन संस्थेचे हेमंत शेठ म्हणाले, “वाल्मिकी रामायणाच्या सात खंडातील २४,००० मूळ संस्कृत श्लोकांबरोबरच हिंदी आणि इंग्रजीतील भाषांतर देखील देण्यात आले आहे. ही पुस्तके पाम वृक्षाच्या पानापासून प्रेरित असून, ग्रंथाचे मुखपृष्ठ हे स्वरोस्की क्रिस्टल्सने सजवण्यात आले आहे.

त्याचबरोबर त्याला सुरेख काठ देखील आहेत. हे रामायण संग्रहित करण्यासाठी अक्रोड, मेपल आणि सेपिल या तीन वृक्षांच्या लाकडाचा वापर करून हाताने तयार केलेल्या एका विशेष बॉक्सचा वापर करण्यात आला आहे. तसेच यामध्ये रामायणातील महत्वाच्या प्रसंगावर आधारित २०० हून अधिक उत्कृष्ट चित्रांचा अंतर्भाव करण्यात आला असून ही चित्रे मौल्यवान स्वरोस्की क्रिस्टल्स वापरून अधिक देखणी करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

या ग्रंथाच्या निर्मितीसाठी ५ वर्षे इतका कालावधी लागला असून, पहिल्या टप्प्यात ३ हजार प्रती छापल्या जाणार आहेत. या ग्रंथाचे एकूण वजन (बॉक्स सहित) ४५ किलो इतके आहे."

या पुस्तकासाठी फॉरेस्ट स्टुवर्डशिप कौन्सिल (एफएससी) या जागतिक दर्जाच्या संस्थेने प्रमाणित केलेला पर्यावरणपूरक कागद आणि खास नैसर्गिक घटकांच्या वापरातून तयार करण्यात आलेली शाई वापरण्यात आली आहे. त्याचबरोबर सदर ग्रंथाच्या निर्मितीत अत्यंत महत्वाचा भाग असेलेला ग्लू अर्थात डिंक किंवा खळ ही देखील पूर्णतः रसायने विरहित असून फक्त नैसर्गिक साहित्याच्या वापरातूनच तयार करण्यात आली आहे. सदर खळ ही जर्मनी येथून मागवण्यात आली आहे, असेही यावेळी भारती झवेरी यांनी सागितले.

Post a Comment

0 Comments