अभिनेते अशोक कुलकर्णी यांच्या हस्ते झाले `कला स्पंदन आर्ट फेअर`चे उद्घाटन

कला स्पंदन आर्ट फेअरमध्ये देशभरातील तब्बल १०० चित्रकारांच्या

१५०० हून अधिक कलाकृती अनुभविण्याची पुणेकरांना संधी


पुणे : अॅबस्ट्रक्ट पेंटिंग्ज, अल्कोहोल इंक आर्ट, ऑईल, वॉटर, अॅक्रेलिक कलर पेंटिंग्ज, मिक्स मिडीयम पेंटिंग्ज, रेझीन आर्ट, सिरॅमिक आर्ट, डेकोरेटिव्ह आर्ट्स, व्हिएतनामी शेल आर्ट यांबरोबरच पारंपरिक कला, कलाकृतींपासून ते डिझायनर संकल्पनांपर्यंत एकाहून एक सरस कलाकृती एकाच छताखाली अनुभविण्याची संधी पुणेकर कलारसिकांना मिळते आहे.

निमित्त आहे इंडियन आर्ट प्रमोटर्स यांच्या संकल्पनेमधून आयोजित करण्यात आलेल्या ‘कला स्पंदन आर्ट फेअर’चे. येत्या रविवार दिनांक १६ एप्रिल पर्यंत सकाळी ११ ते रात्री ८ या वेळेत एरंडवणे येथील डी पी रस्त्यावरील सिद्धी बँक्वेट्स या ठिकाणी हा आर्ट फेअर सर्व रसिकांसाठी विनामूल्य खुला आहे.


कला स्पंदन आर्ट फेअरचे औपचारिक उद्घाटन आज हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते अशोक कुलकर्णी यांच्या हस्ते संपन्न झाले. वास्तुविशारद शिरीष दसनूरकर यांची विशेष उपस्थिती यावेळी होती. सदर प्रदर्शनात सहभागी असणारे प्रमुख कलाकार रामजी शर्मा, राम थोरात आणि आर्ट फेअरचे आयोजक व इंडियन आर्ट प्रमोटर्सचे संस्थापक सुदीप चक्रबर्ती, रथिन दत्ता आदी मान्यवर देखील यावेळी उपस्थित होते.

या आर्ट फेअरला मी याआधी मुंबईमध्ये भेट दिली असून एक नियोजनबद्ध आर्ट फेअर असे याचे वर्णन मी करेल. कलाकारांना एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा हा प्रयत्न कौतुकास्पद आहे, असे अशोक कुलकर्णी म्हणाले.  

आर्ट फेअरचे वैशिष्ट्य म्हणजे देशभरातील १०० हून अधिक कलाकार आणि कलादालनांचा समावेश यामध्ये आहे. कला रसिकांना थेट कलाकारांशी संवाद साधत, त्यांची कला समजून घेता यावी या उद्देशाने आम्ही हे उपक्रम सुरु केले आहेत. प्रतिथयश व नवोदित कलाकार यांमध्ये संवाद व्हावा या दृष्टीने सदर आर्ट फेअर महत्त्वपूर्ण आहे, असे सुदीप चक्रबर्ती यांनी आवर्जून नमूद केले.

आर्ट फेअरमध्ये सहभागी झालेल्या संभाजीनगरच्या उर्मिला घाणेकर यांनी व्हिएतनामी शेल आर्टची ओळख पुणेकरांना करून दिली. पक्षांच्या अंड्यांच्या टरफलाचा वापर करत त्यांनी या कलाकृती साकारल्या आहेत. ही कला व्हिएतनाममध्ये शेल आर्ट म्हणून ओळखली जाते याचे मोठमोठे कारखाने तेथे आहेत आणि दैनंदिन जीवनातील व आजूबाजूच्या परिसरातील वस्तूंचे रेखाटन अंड्यांच्या टरफलाचा वापर करीत तेथे केले जाते असे घाणेकर यांनी सांगितले. उर्मिला घाणेकर यांनी गौतम बुद्ध, व्हिएतनामी मुलगी, फ्लॉवर पॉट आपल्या या शेल आर्टद्वारे साकारले आहेत.


पॉटरी, स्टेन्ड ग्लास आणि मोजाईकद्वारे कलाकृती साकारणाऱ्या राजश्री दादरकर म्हणाल्या, टेराकोटापासून कलाकृती बनविण्याचा छंद मी गेली ४० वर्षे जोपासत आहे. यामध्ये अतिउष्ण तापमानावर माती भाजली जातात आणि त्यापासून आम्ही गिफ्ट आर्टिकल्स, फ्रेम्स बनवितो. याबरोबरच कॉपर फॉईल पद्धतीचा वापर करत आम्ही स्टेन्ड ग्लासच्या कलाकृती देखील बनवितो.

यामध्ये कलाकृतीचा प्रत्येक भाग हा वेगवेगळा बनविला जातो आणि तो सोल्डर करून त्यापासून एक अखंड कलाकृती बनते. कला स्पंदन आर्ट फेअरमध्ये देशभरातील कलाकार सहभागी होत असल्याने त्यांची कला पाहण्याची संधी आम्हाला मिळत असल्याचा आनंद राजश्री दादरकर यांनी व्यक्त केला.

मोठ मोठ्या गॅलरीजमध्ये इतर कलाकारांना आपली कला प्रदर्शित करण्यासाठी अनेक महिने तात्कळत राहावे लागते. आमच्या कलेचा सन्मान व्हावा, तिला व्यासपीठ मिळावे हीच कोणत्याही कलाकाराची इच्छा असते. त्यामुळे या देशभरातील कलाकारांसाठी तयार केलेले कला स्पंदन आर्ट फेअरचे हे व्यासपीठाने आमच्यासाठी महत्त्वाचे आहे.

Post a Comment

0 Comments