अभिनेता प्रसाद सुर्वे याने पुणे न्यायालयात अॅड. सत्यजीत कराळे-पाटील
यांच्या मार्फत केला दावा दाखल
पुणे : मराठी सिनेमे व मालिकांमधील अभिनेता प्रसाद सुर्वे याने महाराष्ट्रातील एक प्रमुख वृत्तवाहिनी एबीपी माझाच्या विरोधात तब्बल १० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. प्रसाद याने आपले वकील अॅड. सत्यजीत कराळे-पाटील यांच्या मार्फत पुणे जिल्हा न्यायालयात हा दावा दाखल केला आहे.
यासंदर्भात माहिती देताना अभिनेता प्रसाद सुर्वे यांचे वकील अॅड.. कराळे-पाटील यांनी सांगितले की, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ या संस्थेला मुंबई उच्च न्यायालयाने पुणे येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमामध्ये १० लाख ७८ हजार रुपयांची अफरातफर केल्या प्रकरणी दंड ठोठावला होता.
पुण्यात झालेल्या मानाचा मुजरा या कार्यक्रमासंदर्भात ही अफरातफर केल्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने महामंडळाचे माजी अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांच्यासह संचालक अलका कुबल, प्रिया बेर्डे यांना हा दंड ठोठावला होता.
या संदर्भातील बातमी अनेक वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्यांवर प्रकाशित झाली होती. दरम्यान, राज्यातील एक मराठी अग्रगण्य वाहिनी एबीपी माझा ने ही बातमी दाखवताना दंड ठोठावला गेलेले चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष यांचा फोटो दाखवण्याऐवजी युवा अभिनेता प्रसाद विलास सुर्वे यांचा फोटो दाखवला होता. विशेष म्हणजे ही बातमी दिवसभर प्रसारित करण्यात आली. या प्रकारामुळे माझ्या अशिलाला प्रचंड मानसिक धक्का बसला. त्यांची नाहक प्रचंड बदनामी झाली. तसेच त्यांच्या हातातील काही सिनेमा व टीव्ही मालिकांचे प्रोजेक्ट निसटून गेले. यातून त्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले.
अॅड. कराळे-पाटील पुढे म्हणाले की, दरम्यान, प्रसाद सुर्वे यांनी विमानतळ पोलिस स्टेशनला याबाबत तक्रार दिली, तसेच एबीपी माझाचे एडिटर राजीव खांडेकर यांना लीगल नोटिसदेखील पाठवली. परंतु एबीपी माझाकडून नोटिसीला कोणतेही अधिकृत उत्तर देण्यात आलेले नाही, तसेच चुकीचे वृत्त दिल्याबद्दल चॅनेलने कोणतीही दिलगिरी व्यक्त केली नाही. या प्रकारामुळे प्रसाद सुर्वे यांना जो काही मानसिक, आर्थिक त्रास झाला व समाजात त्यांची नाहक बदनामी झाली, त्याविरोधात आम्ही एबीपी माझाच्या विरोधात १० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.
यासंदर्भात अभिनेता प्रसाद सुर्वे म्हणाला की, या बातमीत एबीपी माझाने चुकून माझा फोटो दाखवल्याब्ददल मला प्रचंड मानसिक त्रास झालेला आहे. शिवाय माझ्या हातातील सिनेमांचे काही प्रोजेक्टदेखील गेले आहेत. या घटनेने माझी व माझ्या कुटुंबाची बदनामी झाली आहे. या बातमीमुळे माझ्या करियरला सुरवातीलाच ब्रेक लागला आहे. विशेष म्हणजे एबीपी माझाने यासंदर्भात आजवर दिलगिरीदेखील व्यक्त केली नाही. त्यामुळे आम्ही जिल्हा न्यायालयात आज हा खटला दाखल केला असून, लवकरच त्याची सुनावणी होईल व न्यायालयाकडून मला योग्य तो न्याय मिळेल, अशी अपेक्षा प्रसाद ने व्यक्त केली.
0 Comments