गुरुनानक फाउंडेशनला डिजिटल सोनोग्राफी आणि स्ट्रेस टेस्ट मशीनची देणगी

सामाजिक सेवेसाठी सुप्रसिद्ध मुकुल माधव फाऊंडेशनचा पुढाकार


पुणे : फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि मुकुल माधव फाउंडेशन यांच्यातर्फे सीएसआर अंतर्गत गुरुनानक मेडिकल फाऊंडेशनला डिजिटल सोनोग्राफी मशीन आणि स्ट्रेस टेस्ट मशीनची देणगी देण्यात आली.

राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष इकबाल सिंग लालपुरा यांच्या हस्ते या दोन्ही मशीन पुणे कॅम्पातील गुरुद्वारा गुरुनानक दरबार येथे सुपूर्द करण्यात आल्या. मोहिनी प्रल्हाद छाब्रिया यांच्या जयंतीनिमित्त या दोन्ही मशीन देण्यात आल्या.

यावेळी फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे व्यवस्थापकीय संचालक अनिल वाबी, उपाध्यक्ष बी. आर. मेहता, मुकुल माधव फाऊंडेशनचे सचिन कुलकर्णी, इंदिरा बजाज, गुरुद्वारा गुरुनानक दरबारचे चरणजीत सिंह सहानी, संतसिंग मोखा, सुरिंदर धुपाल, राजपाल सिंह मारवाह आदी उपस्थित होते.

गुरुनानक मेडिकल फाउंडेशनच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या आरोग्य केंद्रात अत्याधुनिक व प्रगत तपासण्या व उपचार केले जातात. सर्व समाजातील रुग्णांना अल्पदरात ही सुविधा पुरविण्यात येते. मुकुल माधव फाउंडेशनने दिलेल्या या सोनोग्राफी व स्ट्रेस टेस्ट मशीनमुळे रुग्णांना दर्जेदार, विश्वासार्ह तपासणी सुविधा मिळणार आहे.

इकबाल सिंग लालपुरा म्हणाले, "रुग्णसेवा ही ईश्वरसेवा आहे. आरोग्य सुविधा सक्षम करण्यासाठी मुकुल माधव फाउंडेशनने घेतलेला पुढाकार कौतुकास्पद आहे. समाजाच्या, देशाच्या विकासात 'सीएसआर'चे योगदान महत्वाचे आहे.

आपले सामाजिक दायित्व ओळखून मुकुल माधव फाउंडेशनप्रमाणे इतर संस्थांनीही पुढाकार घेतला, तर आरोग्यासह शिक्षा, पर्यावरण, महिला सक्षमीकरण होण्यास मदत होईल. दिवा तेवत राहण्यासाठी जसा तेलाचा प्रत्येक थेंब महत्वाचा असतो, त्याचप्रमाणे प्रत्येक दानशूराचे योगदान मोलाचे असते."

"शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, महिला सक्षमीकरण या क्षेत्रात मुकुल माधव फाउंडेशन भरीव योगदान देत आहे. आरोग्य सुविधा सक्षम करण्यासाठी ससून सर्वोपचार रुग्णालय, केईएम रुग्णालय, भारती हॉस्पिटल, कमांड हॉस्पिटल यासह इतर अनेक संस्थांमध्ये अत्याधुनिक उपचार व तपासण्याची यंत्रणा कार्यान्वित करत आहे. 

पुण्यासह बाहेरच्या जिल्ह्यातही आरोग्य व शिक्षण क्षेत्राला सक्षम बनविण्याचे कार्य मुकुल माधव फाउंडेशन करत आहे."- रितू प्रकाश छाब्रिया, व्यवस्थापकीय विश्वस्त, मुकुल माधव फाउंडेशन

Post a Comment

0 Comments