पोलीस काकांसोबत रंगल्या चिमुकल्यांच्या गप्पा

मामाच्या गावची सफर ; शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळाचा अनोखा उपक्रम


पुणे : पोलीस काका चोरांना कसे पकडतात...बंदूक कसे चालवतात...बंदूक कशी असते अशा विविध प्रश्नांची उत्तरे विचारत पोलिसांबाबत असणारी भिती आणि उत्सुकता मुलांच्या बोलण्यातून जाणवत होती. मामाच्या गावची सफर या उपक्रमांतर्गत वंचित विशेष मुलांनी खडक पोलीस स्टेशनला भेट देत पोलिसांबरोबर मनमोकळ््या गप्पा मारल्या.

शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळातर्फे दरवर्षी मामाच्या गावची सफर हा उपक्रम आयोजित केला जातो. या उपक्रमांतर्गत मुलांनी शुक्रवार पेठेतील खडक पोलीस स्टेशनला भेट दिली. यावेळी फरासखाना विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त  सतीश गोवेकर, खडक पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता यादव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संपतराव राऊत, सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश जाधव, पोलीस नाईक नामदेव गायकवाड , सचिन माळी उपस्थित होते. 


मंडळाचे शिरीष मोहिते म्हणाले, लहान मुलांमधील पोलिसांविषयी असेलेली भीती दूर होवून त्यांच्याबरोबर मैत्री व्हावी, म्हणून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी बंदूक जवळून पाहण्यासोबतच मुलांनी पोलीसांशी मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. 

मुलांसाठी जादूचे प्रयोग, कठपुतली शोचे आयोजन करण्यात आले होते. यासोबत पावनखिंड सिनेमा देखील मुलांनी पाहिला. कृष्णाई वाॅटर पार्क मध्ये देखील मुलांनी खेळण्याचा आनंद लुटला. लाल महाल दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, दत्त मंदिर येथे मुलांनी भेट दिली. मुलांसाठी वेशभूषा स्पर्धा देखील घेण्यात आली.

Post a Comment

0 Comments