सृजनशीलता आणि चित्रकौशल्य आत्मसात केलेल्या व्यक्तीबद्दल आकर्षण निर्माण होणं साहजिकच आहे. पण हे कुतूहल, कौतुक, करत असताना प्रत्येकाला स्वतःचा भूतकाळ आठवतो, “लहान असताना मीही छान चित्र काढायचो, मलाही बरीच बक्षीस मिळाली होती. मलाही असच यशस्वी कलाकार होता आलं असत” वगैरे असे अनेकदा आपल्या ऐकण्यात असेल. पण पुढे प्रश्न येतो कि कौशल्य आणि क्षमता दोन्ही होते तर अडलं कुठे?
त्याचं बहुतेक वेळा सर्वसामान्यपणे उत्तर असं मिळत कि, `आम्हाला कला क्षेत्रातही करिअर घडवता आलं असतं, परंतु यासंबंधी माहिती आणि योग्य मार्गदर्शन मिळालं नाही`. हीच खरी शोकांतिका आहे. योग्य वेळी मार्गदर्शन मिळाल्यास तुमच्यातील कलागुणांना न्याय मिळू शकतो. कलाक्षेत्रातही यशस्वी होण्याकरिता नेमकी काय आणि कशी तयारी करावी यावर प्रकाश टाकण्याचा हा प्रयत्न आपल्याला नक्कीच सहाय्यक ठरेल. साधारणतः सातवी आठवीत असतानाच विद्यार्थ्यांना कलेविषयी असलेल्या गोडीचा अंदाज यायला लागतो.
कला संचालनालयाने घेतलेल्या एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट सारख्या परीक्षांमध्ये भाग घेण्यास विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन चित्रकलेतील प्रगती आणि कौशल्य पालकांना मार्गदर्शक ठरेल. पुढे बारावी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर बी.एफ.ए. म्हणजेच “बॅचलर ऑफ फाईन आर्ट” या शिक्षणाकरिता महाराष्ट्र शासनाच्या सीईटी सेलमार्फत MHAAC CET ऍप्टिट्यूड टेस्ट होतात. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना शासन मान्यता प्राप्त तसेच प्रायव्हेट युनिव्हर्सिटीच्या महाविद्यालयांमध्ये पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रवेश मिळू शकतो.
जे. जे. उपयोजित कला, जेजे स्कूल ऑफ फाईन आर्ट्स, चित्रकला महाविद्यालय नागपूर, चित्रकला महाविद्यालय औरंगाबाद, हे शासनाच्या मार्फत चालवले जाणारे कॉलेजेस आहेत त्या व्यतिरिक्त पुणे, मुंबई औरंगाबाद या युनिव्हर्सिटी निगडित कॉलेजेस तसेच एमआयटी आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी पुणे, भारती विद्यापीठ अशा काही प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये देखील बी.एफ.ए डिग्री कोर्सेस उपलब्ध आहेत.
बी.एफ.ए अभ्यासक्रमांतर्गत फाईन आर्टस् आणि अप्लाइड आर्टस् असे दोन मुख्य विभाग असून या विषयांची आणि त्यासंबंधी करिअर बद्दल माहिती घेऊया. आपल्या शास्त्रात चौसष्ट कला सांगितल्या आहेत. जाहिरातकला हि पासष्टावी कला म्हणून बघितली जाते. जाहिरात कलेचे प्रशिक्षण अप्लाइड आर्ट अंतर्गत दिले जाते. क्रिएटिव्ह आणि नाविन्यपूर्ण चित्रांचा वापर जाहिरातीत प्रभावीपणे केला जातो.
हातानी किंवा डिजिटल मध्यमाद्वारे काढलेले चित्र, फोटोग्राफी, कॉपी रायटिंग, यांच्या संयोगाने एक यशस्वी जाहिरात साकारता येणे शक्य होते. त्याचबरोबर ब्रँड विषयक लोगो, सिम्बॉल्स ,कॉर्पोरेट आयडेंटिटी डिझाईन चे कोर्सेस असतात शिवाय पॅकेजिंग डिझाईन, टायपोग्राफी, इलस्ट्रेशन्स, कॅलिग्राफी पब्लिकेशन डिझाईन, एग्जीबिशन अँड डिस्प्ले डिझाईन हे विषय हि या अभ्यासक्रमांतर्गत शिकविले जातात. मार्केटमधील मागणीनुसार प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमधील अप्लाइड आर्टस् च्या सुधारित अभ्यासक्रमामध्ये आपण माहिती तंत्रज्ञान
आणि कम्प्युटर विषयक म्हणजेच, युजर एक्सपिरीयन्स अँड यूजर इंटरफेस डिझाईन, मोबाईल ॲप्लिकेशन डिझाईन अभ्यासक्रमाचा समावेश केला आहे. चार वर्षांचा डिग्री कोर्स केल्यानंतर ऍनिमेशन क्षेत्रात, जाहिरात संस्थेमध्ये, पब्लिकेशन पॅकेजिंग, प्रिंटिंग इंडस्ट्रीज, वेब डिझाईनिंग अँड डेव्हलपर्स इंडस्ट्रीज मध्ये क्रिएटिव्ह डायरेक्टर किंवा व्हिज्युअलायझर म्हणून अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत.
फाईन आर्टस् म्हणजेच ललित कला अभ्यासक्रमांतर्गत पोर्ट्रेट पेंटिंग, क्रिएटिव्ह पेंटिंग, शिल्पकला, कंजर्वेशन ऑफ आर्ट्स, हिस्टरी ऑफ आर्ट्स हे विषय प्रामुख्याने शिकवले जातात. अप्लाइड आणि फाईन आर्ट्स हे अभ्यासक्रम प्रामुख्याने ए.आय.सी.टी.इ म्हणजेच “ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन” अंतर्गत येतात, त्यामुळे त्याची गुणवत्ता निकषानुसार राखली जाते.
चार वर्षांच्या अभ्यासक्रमात सुरुवातीची दोन वर्ष ही कौशल्य आधारित असतात. तिसऱ्या वर्षात विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या विषयांमध्ये प्राविण्य प्राप्त करता येतं. शेवटच्या चौथ्या वर्षात त्यांना प्रत्यक्ष मार्केटमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळते. इंटर्नशिप केल्यामुळे विद्यार्थी मार्केटमधल्या विविध प्रकारच्या कामांकरिता तयार झालेला असतो.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यादृष्टीने कम्युनिकेशन आणि प्रेझेंटेशन स्किल्स कडेही प्रामुख्याने लक्ष दिले जाते . योग्य मार्गदर्शन आणि सातत्याने कलासाधना केल्यास या क्षेत्रात यशस्वी होणे सहज शक्य आहे. अशा नाविन्यपूर्ण कलाक्षेत्रात उज्वल भविष्य घडवण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या समस्त विद्यार्थी आणि पालकांना अनेक शुभेच्छा.
प्रो. डॉ . मिलिंद ढोबळे
अधिष्ठाता, फाईन आर्टस् आणि परफॉर्मिंग आर्टस्
एमआयटी-आर्ट डिझाईन अँड टेक्नोलॉजी, पुणे
0 Comments